जुंता हाऊसच्या जागी बहुमजली पार्किंग सुविधा उभारा : जॅक सुखीजा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
59 mins ago
जुंता हाऊसच्या जागी बहुमजली पार्किंग सुविधा उभारा : जॅक सुखीजा

पणजी : पणजीतील ऐतिहासिक 'जुंता हाऊस'ची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी कॅसिनो आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने या ऐतिहासिक इमारतीचा कोणताही व्यावसायिक वापर करण्याऐवजी, त्या ठिकाणी बहुमजली पार्किंग सुविधा उभारावी, अशी मागणी पणजी महानगरपालिकेचे वॉर्ड १७ चे नगरसेवक जॅक सुखीजा यांनी केली आहे.

जुंता हाऊस इमारतीसमोर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नगरसेवक सुखीजा म्हणाले की, १९६० च्या दशकात उभारण्यात आलेली जुंता हाऊस ही एक ऐतिहासिक वास्तू असून, ती पणजी शहरातील दुसरी मोठी इमारत होती. सन २००० पर्यंत राज्यातील बहुतांश महत्त्वाची सरकारी कार्यालये आणि खाती याच इमारतीतून कार्यरत होती. एवढेच नव्हे तर, याच इमारतीमध्ये एक सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळाही सुरू होती.

सध्या या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वास्तविक पाहता ही एक सार्वजनिक मालमत्ता आहे, असे असतानाही तिथे एक हॉटेल, कॅसिनो आणि छतावर स्विमिंग पूल बांधून या इमारतीचे संपूर्णपणे व्यावसायिकीकरण केले जात आहे. शहरातील अनेक नागरिकांनी या प्रकल्पाला आधीच विरोध दर्शवला असून, या इमारतीचा वापर केवळ सार्वजनिक कामांसाठीच मर्यादित ठेवावा अशी मागणी केली आहे. ही इमारत पणजी शहराच्या अगदी मध्यभागी असल्याने, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिचे बहुमजली पार्किंग प्लाझामध्ये रूपांतर करणे अधिक फायदेशीर ठरेल, असे सुखीजा यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पासंदर्भात नागरिकांकडून अनेक महत्त्वपूर्ण सूचना आल्याचे त्यांनी नमूद केले. यामध्ये इमारतीचा ८० टक्के भाग पार्किंगसाठी राखीव ठेवावा, वरच्या मजल्यावर हँगिंग गार्डन (हरित इमारत) उभारून तिथे इव्हेंट स्पेस तयार करावी आणि एक खुले कृषी केंद्र सुरू करावे, अशा मागण्यांचा समावेश आहे. मात्र, या ठिकाणी कोणताही व्यावसायिक विकास न करता संपूर्ण जागा केवळ बहुमजली पार्किंगसाठीच वापरली जावी, या मतावर बहुतांश स्थानिक नागरिक ठाम असल्याचे सुखीजा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आम्ही या प्रस्तावित इमारत प्रकल्पाचा आराखडा (प्लॅन) पाहिला आहे. त्यानुसार या ठिकाणी खोल्यांसह आठ मजल्यांचे भव्य हॉटेल उभारण्यात येणार असून, एका मजल्यावर कॅसिनो सुरू केला जाणार आहे. आराखड्यात इमारतीच्या बाजूला काही कार्यालये दाखवण्यात आली आहेत; परंतु ती सरकारी खात्यांसाठी असतील की नाही, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.


हेही वाचा