मुख्यमंत्र्यांकडून पत्राद्वारे पंतप्रधानांचे अभिनंदन, आभार

पणजी : केंद्राकडून मिळालेली ३० हजार कोटींहून अधिक मदत व कल्याणकारी योजनांमुळे १२ वर्षांत गोव्याने अभूतपूर्व प्रगती केली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. १२ वर्षांच्या कारकिर्दीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांतर्फे त्यांचे अभिनंदन केले आहे.
गोव्यातील जनतेच्या वतीने देशाचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून १२ ऐतिहासिक वर्षे पूर्ण केल्याबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो. ही १२ वर्षे एका ‘युग-परिवर्तना’पेक्षा कमी नाहीत. राष्ट्र प्रथम हा मंत्र कोट्यवधी भारतीयांचा जिवंत संकल्प बनला आहे. आपल्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ‘आयुष्मान भारत’, ‘पीएम गरीब कल्याण योजना’, ‘जन धन’ आणि ‘पीएम किसान’ यांसारख्या जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांनी कोट्यवधी कुटुंबांना सन्मान आणि आर्थिक सुरक्षा प्रदान केली आहे. कलम ३७० रद्द करण्यापासून ते राम मंदिराच्या उभारणीपर्यंतचे अनेक प्रलंबित राष्ट्रीय संकल्प पूर्ण झाले आहेत. ज्या गोष्टींची स्वप्ने केवळ पिढ्यानपिढ्या पाहिल्या जात होत्या, त्या आपल्या सरकारने प्रत्यक्षात आणल्या. या परिवर्तनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे भाग्य गोव्याला लाभले आहे. ३०,००० कोटींहून अधिक केंद्रीय मदतीमुळे, राज्याने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे. यामध्ये मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, नवीन जुवारी पूल, मडगाव वेस्टर्न बायपास, २९९ किमीहून अधिक राष्ट्रीय महामार्ग आणि दोन वंदे भारत मार्गांचा समावेश आहे.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे आपले स्वप्न संपूर्ण गोव्यात दिसून येते. यात ४,५०० हून अधिक स्वयं-सहायता गटांमधील ५७,००० हून अधिक महिला, ४,३८७ ‘लखपती दीदी’ आणि ‘मुद्रा’ कर्जाद्वारे सक्षम झालेले ४ लाखांहून अधिक नागरिक यांचा समावेश आहे. ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत १०० टक्के उद्दिष्ट साध्य करणारे गोवा हे भारतातील पहिले राज्य बनले आहे, तसेच हे राज्य ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’मुक्त घोषित करण्यात आले आहे. याशिवाय पीएमजीकेएवाय, भारत नेट आणि पीएम ग्राम सडक योजना यांसारख्या प्रमुख योजनांमध्ये राज्याने १०० टक्के व्याप्ती गाठली आहे. विकासाच्या या राष्ट्रीय महायज्ञात एक महत्त्वपूर्ण भागीदार बनण्याचा आम्ही संकल्प करतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.
बालमृत्यू दरात गोवा द्वितीय
आज गोवा हे पूर्ण साक्षर राज्य म्हणून ओळखले जाते, जिथे सर्वांत कमी बालमृत्यू दर देशात दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि दरडोई उत्पन्न २०१४-१५ मधील ३.१९ लाख रुपयांवरून वाढून २०२५-२६ पर्यंत ७ लाख रुपयांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याच्या आपल्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन गोवा राज्य २०३७ पर्यंत ‘विकसित राज्य’ बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.