मंगळूरमधील हत्येच्या गुन्ह्यातील संशयिताला मडगाव रेल्वे स्थानकात अटक

कोकण रेल्वे पोलिसांनी सापळा रचून बिहारमधील संशयिताला काही तासांतच घेतले ताब्यात.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
मंगळूरमधील हत्येच्या गुन्ह्यातील संशयिताला मडगाव रेल्वे स्थानकात अटक

मडगाव : कोकण रेल्वे पोलिसांनी जलद कारवाई करत, शेजारील कर्नाटक राज्यातील मंगळूर येथील हत्येच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला काही तासांतच मडगाव रेल्वे स्थानकावर अटक केली. प्रशांत कुमार (वय ३६ वर्षे, रा. शिवाजी नगर, दरभंगा, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.




१० जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कारवार पोलिसांकडून कोकण रेल्वे पोलिसांना या संदर्भातील माहिती मिळाली. मंगळूर येथील पणम्बूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका हत्येच्या गुन्ह्यातील प्रशांत नावाचा संशयित आरोपी 'हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस'ने गोव्याच्या दिशेने येत असल्याचे कारवार पोलिसांनी सांगितले होते.



माहिती मिळताच कोकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गावडे, पोलीस काँस्टेबल वसीम शेख, मंजुनाथ दोडमणी आणि संजय गावकर यांचा समावेश होता. या पथकाने मडगाव रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी सापळा रचला. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित प्रशांत कुमार याला मडगाव स्थानकावरून शिताफीने ताब्यात घेतले.


संशयिताला रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या अटकेची माहिती पणम्बूर (मंगळूर) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहम्मद सलीम यांना देण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी संशयिताला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरू आहे. सध्या संशयित कोकण रेल्वे पोलिसांच्या कोठडीत आहे. ही संपूर्ण कामगिरी कोकण रेल्वेचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम नाईक, पोलीस उपअधीक्षक हिरू कावळेकर यांनी पार पाडली. 

हेही वाचा