भाजपच्या उमेदवारीवर ठरणार मांद्रे मतदारसंघातील गणिते

आमदार जीत आरोलकर यांच्या भूमिकेकडे लक्ष : लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद सोपटे एकत्र आल्यास लढत रंगतदार

Story: निवृत्ती शिरोडकर |
41 mins ago
भाजपच्या उमेदवारीवर ठरणार मांद्रे मतदारसंघातील गणिते

गोवन वार्ता
पेडणे : मांद्रे हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. आजच्या घडीला मगोचे जीत आरोलकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमी​वर त्यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी आमदार दयानंद सोपटे एकत्र आले आहेत. आपल्यापैकी कोणी तरी एक जण निवडणूक लढवणार, असे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र आमदार आरोलकर भाजपच्या उमेदवारीवर आगामी निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपसोबत युती झाली, तर मगो पक्षाची भूमिका काय असणार ? पार्सेकर, सोपटे काय निर्णय घेतात ? विरोधकांची अाघाडी झाली, तर उमेदवार कोण असेल, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.
मांद्रे मतदारसंघातील निवडणूक ही सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची ठरत असते. इथले राजकीय चित्र कधी बदलेल सांगता येत नाही. काही महिन्यांपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते गावागावांत संपर्क वाढवत आहेत. मतदारांमध्ये विकासकामे, रोजगार, पर्यटन, वाहतूक, पर्यावरण आणि स्थानिकांना न्याय या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यामुळे २०२७ ची निवडणूक केवळ राजकीय नसून स्थानिक प्रश्नावर लढली जाण्याची शक्यता काही जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत. सध्या मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गावागावात बैठका, सामाजिक कार्यक्रम होत आहेत. आगामी काळात अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मतदारसंघात मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार दयानंद सोपटे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
मांद्रे मतदारसंघ गोव्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा आणि अनपेक्षित कलाटणी देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. २०२२ च्या निवडणुकीत मगोचे जीत आरोलकर यांनी भाजपच्या दयानंद सोपटे यांचा ७१५ मते एवढ्या अत्यंत कमी फरकाने पराभव केला होता. जीत आरोलकर सध्या भाजप आघाडी सरकारला पाठिंबा देऊन सक्रिय आहेत. आगामी निवडणुकीत तिकीट वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत महायुती आणि विरोधकांमध्ये तिकीट वाटपावरून मोठे राजकीय नाट्य घडण्याची शक्यता आहे. भाजप मगो युतीमधील जीत आरोलकर सध्या तरी सत्ताधारी भाजप सरकारला पाठिंबा देऊन आमदार म्हणून सक्रिय आहेत. विद्यमान आमदार म्हणून तिकिटावर त्यांचा पहिला दावा असेल. पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मांद्रेचे माजी सरपंच अमित सावंत, माजी सरपंच बाळा ऊर्फ प्रशांत नाईक हे निवडणुकीची तयारी करत अाहेत.
जीत आरोलकर यांची जमेची बाजू
सध्या आमदार जीत आरोलकर यांच्याविरोधात राजकीय विरोधकांचे सक्रिय चित्र दिसत नसल्यामुळे आमदारही खूश आहेत.
मतदारसंघात विकासकामांबरोबरच आरोग्य शिबिरे, महिला मेळावे, युवकांशी संवाद, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दर महिन्याला मोठे इव्हेंट करण्यावर आमदार जीत आरोलकर यांनी भर दिला आहे.
रस्ते रुंदीकरण आणि पायाभूत सुविधांच्या कामाचे भूमिपूजन करून विकासकामांना प्राधान्य दिले आहे.
पाणी, रस्ते, पूल, आरोग्य सेवा या विषयांवरही ते वेळोवेळी भर देत आहेत.
समस्या ठरणार आमदारांची डोकेदुखी
मांद्रे हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. मोरजी, मांद्रे, हरमल, आश्वे, केरी या किनारी भागातील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या, स्थानिकांना रोजगार, पर्यटन व्यवसायातील असंतुलन आणि पर्यावरण संवर्धन हे विषय आगामी निवडणुकीत महत्त्वाचे ठरू शकतात. मोपा विमानतळ आणि पेडणे परिसरातील विकासकामांमुळे निर्माण झालेले रोजगाराचे प्रश्न, जमीन आणि निसर्ग संवर्धन, अनिर्बंध वाढणारी बांधकामे, पर्यावरणाचा ऱ्हास आणि टीसीपी कायद्यावरून जनतेत काही प्रमाणात असंतोष आहे.
इच्छुकांचा वैयक्तिक संपर्कावर भर
आगामी निवडणूक केवळ पक्षीय राहणार नसून जनसंपर्क महत्त्वाचा ठरणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. माजी मंत्री, सामाजिक कार्यकर्ते आणि काही नवीन चेहरे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय होतात का, हे काही महिन्यांनंतर दिसून येणार आहे. काही नेते गावागावांत बैठका घेत आहेत. काही इच्छुक उमेदवार युवक आणि महिलांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सध्या तरी अस्पष्ट दिसत आहे.
राजकीय पक्षांची स्थिती
काँग्रेस पारंपरिक मतपेटी मजबूत करण्यासाठी नवे आणि जुन्या कार्यकर्त्यांची सांगड कशी घालते, यावर बरेच काही अवलंबून आहे. गेल्या निवडणुकीत आरजीने लक्षणीय मते घेतली होती. पूर्वी हा मतदारसंघ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा गड मानला जायचा. नंतर तो काँग्रेस आणि भाजपकडे गेला. २०२२ मध्ये पुन्हा मगोने बाजी मारली. भाजप मगोची युती होणार का ? युतीतून आमदार जीत आरोलकर यांना पुन्हा संधी मिळणार का की भाजप स्वतंत्र उमेदवार उतरवणार ? हा उत्सुकतेचा विषय ठरत आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर किंवा दयानंद सोपटे यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.
भाजपसमोर अंतर्गत गटबाजी मोडण्याचे आव्हान
दयानंद सोपटे २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपची पारंपरिक मतपेढी त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे ते तिकीट सोडण्यास सहजासहजी तयार होणार नाहीत. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मागील निवडणुकीत भाजपचे तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. भाजपमधील नेते अंतर्गत नाराजी दूर करून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय भूमिका घेतात, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.
विरोधकांची भूमिका महत्त्वाची
गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसची इथली पकड कमी झाली आहे. या निवडणुकीत गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर, काँग्रेसचे नारायण रेडकर या नेत्यांकडेही मतदारांचे लक्ष लागून आहे. काँग्रेस, आरजीपी, गोवा फॉरवर्ड यांची युती झाली तर उमेदवारी कोणाला मिळेल ? या उमेदवारासाठी कोण इच्छुक आहे ? हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे.


हेही वाचा