अॅड. राधाराव ग्रॅसिअस यांची काँग्रेसवर टीका

मडगाव : जे नेते किंवा व्यक्ती काँग्रेससोबत कधीच नव्हत्या, त्यांना केवळ निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेऊन तिकीट देण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून तिकिटांची विक्री झाल्यास, निवडून आल्यानंतर पुन्हा पक्षांतराची भीती कायम राहणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मूळ आणि निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनाच तिकीट मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राधाराव ग्रॅसिअस यांनी केली आहे.
मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. ग्रॅसिअस यांनी काँग्रेसच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली, तसेच पक्षाच्या अंतर्गत निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रभारी असलेल्या नेत्यांविरोधात तेथील खासदार ज्योती मणी यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली होती. निवडणुकीत जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आणि या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय त्यांनी पत्रात व्यक्त केला होता. गोव्यातही काँग्रेसने अशाच चुकीच्या पद्धती दुरुस्त करणे गरजेचे आहे.
अॅड. राधाराव यांनी पुढे बोलताना लोकसभेचा दाखला दिला. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना जनतेचा मोठा पाठिंबा होता. काँग्रेसने एका योग्य उमेदवाराला संधी दिल्यामुळेच ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. गोव्यातील राजकीय स्थितीत जर खरोखरच बदल घडवून आणायचा असेल, तर काँग्रेसला आपल्या संघटनात्मक रचनेत आणि कार्यपद्धतीत तातडीने बदल करण्याची गरज आहे. काँग्रेस सध्या पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याच्या स्पर्धेत असतानाही, अंतर्गत गटबाजी आणि चुकीच्या निर्णयांमुळे काहीच करत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, तामिळनाडू आणि पाँडिचेरी (पुद्दुचेरी) निवडणुकीच्या वेळी सोशल मीडिया मोहिमेचे कंत्राट बाहेरील एजन्सीला देण्यात आले होते. तिथल्या स्थानिक परिस्थितीची कोणतीही माहिती नसलेल्या गोव्यातील कंपनीला साडेचार कोटी रुपयांचे हे कंत्राट देण्यात आले. पक्षाच्या अंतर्गत केवळ एक 'रॅकेट' सुरू असून, राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता आपल्याच पक्षातील या गोंधळाच्या आणि संशयास्पद कारभाराविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणुका जवळ आल्यानंतर काँग्रेसची तिकिटे जुन्या कार्यकर्त्यांऐवजी नव्याने पक्षात येणाऱ्या संधीसाधूंना मिळण्याची शक्यता अॅड. राधाराव यांनी वर्तवली. पक्षासाठी अहोरात्र राटणाऱ्या कार्यकर्त्यांना सध्या योग्य सन्मान मिळत नाही आणि त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले जात नाही. पैशांची देवाणघेवाण होऊनच तिकिटे दिली जात आहेत, अशी सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे. काँग्रेसने या जनभावनांचा आदर राखून वेळीच पावले उचलावीत, असे अॅड. राधाराव ग्रॅसिअस यांनी शेवटी स्पष्ट केले.