इंटरनेट वापरात गोव्यातील महिलांचे प्रमाण देशात सर्वाधिक

राष्ट्रीय सरासरीपेक्षा मोठी आघाडी : १५ ते ४९ वयोगटातील ९४ टक्के महिलांनी केला इंटरनेटचा वापर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th June, 11:56 pm
इंटरनेट वापरात गोव्यातील महिलांचे प्रमाण देशात सर्वाधिक

पणजी : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण (एनएफएचएस) अहवालानुसार इंटरनेट वापराच्या बाबतीत गोव्यातील महिला देशात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील १५ ते ४९ वयोगटातील तब्बल ९४ टक्के महिलांनी कधी ना कधी इंटरनेटचा वापर केल्याची नोंद करण्यात आली आहे. ही टक्केवारी राष्ट्रीय सरासरी ६४.३ टक्के यापेक्षा खूपच जास्त आहे.
अहवालानुसार, मागील दोन वर्षांत गोव्यात महिलांच्या इंटरनेट वापरात २०.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यात महिलांचा इंटरनेट वापर पुरुषांच्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी अधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण ९०.९ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे.
ग्रामीण भागात ९२.४ टक्के महिलांनी इंटरनेट वापर केला असून शहरी भागात हे प्रमाण ९५.२ टक्के इतके आहे. पुरुषांच्या बाबतीत ग्रामीण भागात ९६ टक्के आणि शहरी भागात ८७.४ टक्के इंटरनेट वापर नोंदवला गेला आहे.
इतर राज्यांशी तुलना
देशात सिक्कीम (९०.३ टक्के), केरळ (८७.३ टक्के) आणि मिझोरम (८२.५ टक्के) ही राज्येही महिलांच्या इंटरनेट वापरात आघाडीवर आहेत. तर त्रिपुरा (४८.८ टक्के), ओडिशा (५१ टक्के), कर्नाटक (५७.९ टक्के) आणि पश्चिम बंगाल (५९ टक्के) या राज्यांमध्ये हे प्रमाण तुलनेने कमी आहे. या तुलनेत गोवा स्पष्टपणे अव्वल ठरले आहे.
सर्वेक्षणात महिला सबलीकरणाशी संबंधित पाच प्रमुख निकषांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये गोव्यातील महिला राष्ट्रीय सरासरीपेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे.
राज्यात कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग ९२.५ टक्के इतका आहे. यामध्ये घरगुती खरेदी, आरोग्यविषयक निर्णय आणि नातेवाईकांना भेटण्याचे निर्णय यांचा समावेश आहे. या बाबतीत राष्ट्रीय सरासरी ८९ टक्के आहे.
गोव्यातील ९१.१ टक्के महिलांकडे स्वतःचे बँक खाते असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे प्रमाण आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने सकारात्मक मानले जात आहे.
एकूणच हा अहवाल गोव्यातील महिलांचे वाढते डिजिटल सक्षमीकरण, तंत्रज्ञानाचा व्यापक वापर आणि सामाजिक-आर्थिक निर्णय प्रक्रियेत वाढता सहभाग स्पष्टपणे दर्शवतो.
स्वतःचा मोबाईल असण्याचे प्रमाण ८९ टक्के
अहवालानुसार, गोव्यातील ८९.९ टक्के महिलांकडे स्वतःचे मोबाईल असून त्यांचा वापर त्या स्वतःसाठीच करतात. याची राष्ट्रीय सरासरी ६३.६ टक्के आहे. राज्यातील शहरी भागातील ९२ टक्के तर ग्रामीण भागातील ८७.१ टक्के महिलांकडे स्वतःचे मोबाईल आहेत.                               

हेही वाचा