इंटर्न डॉक्टरने आत्महत्या केल्याचा संशय

शवचिकित्सा पूर्ण : मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
19 mins ago
इंटर्न डॉक्टरने आत्महत्या केल्याचा संशय

पणजी : दोनापावला येथील हवाई समुद्र किनाऱ्यावर मृतदेह सापडलेल्या युवतीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तिच्याकडे एक सीरींज मिळाली असून, डिप्रेशनसाठी ती औषधे घेत होती, अशी माहिती मिळाली आहे. यापूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्या शरीरावर जखमा नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शवचिकित्सा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. तिचा व्हिसेरा (अंतर्गत अवयव) अधिक तपासासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.  

इंटर्न डॉक्टर युवतीच्या मृतदेहाची चिकित्सा पूर्ण झाली आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे (Goa Medical College)  वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी दिली. इस्पितळात तपास केला तेव्हा तेथून सीरींज कमी झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे तिने सिरींज बाहेरून खरेदी केल्याचा संशय असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

मूळ केरळच्या (Kerala) गौरी नारायण या युवतीची इंटर्नशीप आणखी दोन दिवसांनी पू्र्ण होणार होती. मात्र, बुधवारी तिचा मृतदेह दोनापावला समुद्र किनाऱ्यावर मिळाला. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी इंटर्न डॉक्टर युवतीच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  

हवाई समुद्र किनाऱ्यावर युवतीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी घटना स्थळावर जाऊन पंचनामा केला. नंतर मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवला होता.

हेही वाचा