नैनिताल येथे हनिमूनला सोबत कुटुंबाला नेल्याने पत्नीने मागितला घटस्फोट

सुखी संसाराची स्वप्ने राहिली अधुरी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
नैनिताल येथे हनिमूनला सोबत कुटुंबाला नेल्याने पत्नीने मागितला घटस्फोट

मेरठ : लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी हनिमून जाणे एका दाम्पत्यासाठी वादाचे कारण ठरला आहे. पतीने नैनिताल येथे हनिमूनला आई-वडील आणि भावंडांना सोबत नेल्याने नाराज झालेल्या पत्नीने आता घटस्फोटाची मागणी केली आहे. (A honeymoon has turned into a bitter dispute, with a wife seeking divorce after her husband brought his family along.)

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील रामराज परिसरातील तरुणी आणि दिल्लीतील पटेल नगर येथील तरुणाचा विवाह मॅट्रिमोनियल वेबसाइटद्वारे झाला होता. लग्नानंतर दोघेही नैनितालला हनिमूनसाठी गेले होते. मात्र, पत्नीच्या अपेक्षेप्रमाणे हा प्रवास केवळ दोघांसाठी खासगी न राहता, पतीने आपल्या कुटुंबीयांनाही सोबत नेले.

पतीचे आई-वडील, बहीण आणि भाऊ सोबत असल्याने दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता आला नाही, अशी तक्रार पत्नीने केली. नैनितालहून परतल्यानंतर याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

पतीने मात्र आपल्या निर्णयाचे समर्थन करत, कुटुंबातील सर्वांना आनंद मिळावा म्हणून त्यांना सोबत नेल्याचे सांगितले. त्यांच्या मते यात काही चुकीचे नव्हते. मात्र, पत्नीला ही गोष्ट मान्य झाली नाही.

वाद वाढल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरल्याने प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवण्यात आले.

समुपदेशन केंद्रात पती-पत्नीचे तीन वेळा समुपदेशन करण्यात आले. दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या. मात्र दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यानंतरही तोडगा निघू न शकल्याने अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय कायम ठेवला. हनिमूनमधील एका निर्णयाने सुरू झालेला वाद आता घटस्फोटापर्यंत पोहोचल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.

हेही वाचा