Home >> देश -परदेश >> ‘झुरळांं’नी झुकवले

‘झुरळांं’नी झुकवले

‘नीट’ पेपरफुटीविरोधात एकवटली ‘जेन-झी’ : नेटकऱ्यांंचा संंताप, उपोषण, अन् ३६ दिवसांंचे जनआंंदोलन

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
26th July, 11:45 pm

नवी दिल्ली : देशात अलीकडेच गाजलेल्या नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनाला एका ऐतिहासिक क्रांतीचे रूप देण्यामागे कॉक्रोच जनता पार्टीचे महत्त्वपूर्ण योगदान रा​हिले आहे. सरन्यायाधीशांच्या एका वादग्रस्त वक्त्यवरून सुरू झालेली ही ठिणगी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मोठ्या जनआंदोलनात कशी बदलली, याचा हा गोषवारा.
मे महिन्यात सरन्यायाधीशांची एका सुनावणीदरम्यानची ‘झुरळ’ या संदर्भातील टिप्पणी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर, झुरळ म्हणवून हिणवण्यात येणारे तरुण एकत्र आले तर काय होईल? असा सवाल करत मोहीम सुरू केली. काही दिवसांतच त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) ची स्थापना केली. इन्स्टाग्रामवर त्यांचे २ कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आणि या पक्षाने पेपरफुटीच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि युद्धाच्या पातळीवर उभी राहिलेली यंत्रणा यामुळे अवघ्या ७० दिवसांतच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.
या संपूर्ण आंदोलनाला यशस्वी मुशीत घडवण्यात खालील चार जणांची भूमिका महत्त्वाची ठरली.
अभिजीत दीपके (डिजिटल बळावर जमिनीवरील यंत्रणा):
बोस्टन विद्यापीठातून मास्टर्स केलेल्या अभिजीत दीपके यांनी ऑनलाइन संतापाला दिशा दिली. डिजिटल समर्थनाच्या जोरावर त्यांनी जमिनीवरील मजबूत यंत्रणा उभी केली आणि आंदोलनाचे व्यवस्थापन शिस्तबद्ध ठेवले.
सोनम वांगचुक (नैतिक कमांडर आणि दिशा):
प्रसिद्ध शिक्षण सुधारक सोनम वांगचुक या आंदोलनाचे ‘नैतिक कमांडर’ बनले. आंदोलनाच्या सुरुवातीला विखुरलेली गर्दी त्यांच्या उपस्थितीमुळे एका केंद्रावर आली. ६ जूनपासून सुरू झालेल्या त्यांच्या उपोषणामुळे आंदोलनाला एक प्रभावी नैतिक प्रतीक मिळाले.
सौरभ दास (माहिती नियंत्रण कक्ष आणि संवाद)
शोध पत्रकार सौरभ दास यांनी मुख्य प्रवक्त्याची भूमिका पार पाडली. त्यांनी आंदोलनकर्ते, सरकार आणि मीडिया यांच्यातील दुवा म्हणून काम करत मागण्या स्पष्ट केल्या. तसेच, अफवा आणि हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवत योग्य माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली.
आशुतोष रांका (अजेंडा नियंत्रण आणि राजकीय हस्तक्षेपापासून बचाव)
आयआयटीचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांनी आंदोलनाचा मूळ अजेंडा सांभाळला. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे या मागण्यांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी राजकीय पक्षांना आंदोलनावर वर्चस्व गाजवू दिले नाही.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
या आंदोलनात तंत्रज्ञानाचा अभिनव वापर पाहायला मिळाला. सीजेपीने वेबसाईट आणि गुगल फॉर्मच्या साहाय्याने कार्यकर्ते व विद्यार्थ्यांची मोट बांधली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ठिकाण आणि कार्यक्रमांची माहिती तत्काळ पोहोचवली गेली. विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान इंटरनेट सेवा खंडित झाल्यावर आंदोलकांनी ‘बिटचॅट’ या ॲपचा वापर करून सुरळीत संवाद कायम ठेवला.

पेपरफुटीविरोधातील सीजेपीचे आंदोलन संपूर्ण घटनाक्रम
१६ मे २०२६: अभिजीत दीपके यांनी ऑनलाईन व्यंग्यात्मक मंच म्हणून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची (सीजेपी) स्थापना केली. काही दिवसांतच इन्स्टाग्राम आणि ‘एक्स’ (ट्विटर) वर लाखो तरुण या मोहिमेत सहभागी झाले.
६ जून: अमेरिकेतून परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवर ६ तासांचे पहिले आंदोलन केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झाले.
७ ते १९ जून: सीजेपीने डिजिटल मोहिमेसह ठिकठिकाणी धरणे आंदोलने करत जनजागृतीचा उपक्रम राबवला.
२० ते २७ जून: सीजेपीने जंतर-मंतरवर ठिय्या आंदोलन सुरू केले. २१ जून रोजी री-एग्जाम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन दीपके यांनी केले. हळूहळू शेकडो आंदोलक दररोज पोहोचू लागले.
२८ जून: प्रसिद्ध शिक्षण सुधारक सोनम वांगचुक जंतर-मंतरवर पोहोचले आणि त्यांनी ६ विद्यार्थ्यांसह उपोषण सुरू केले. त्यामुळे आंदोलनाला मुख्य केंद्र मिळाले.
३० जून ते १७ जुलै: सीजेपीने आंदोलन अधिक तीव्र केले. दररोज जंतर-मंतरवर समर्थकांची संख्या वाढू लागली.
१८ जुलै: पोलिसांनी पहाटे छापा टाकून सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेच्या निषेधार्थ राहुल गांधी यांनी वांगचुक यांना पाठिंबा दिला, तर अभिजीत दीपके यांनी स्वतः उपोषणाची घोषणा केली.
१९ जुलै: संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदेवर मोर्चा काढण्यासाठी हजारो आंदोलक जंतर-मंतरवर जमा झाले.
२० जुलै: ५० हजारांहून अधिक आंदोलकांनी नवी दिल्लीचा ताबा घेतला. पोलिसांनी अश्रूधूर आणि लाठीचार्ज केला. या संघर्षात १०० हून अधिक आंदोलक व पोलीस जखमी झाले. सीजेपी प्रतिनिधी सौरभ दास व आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
२१ ते २५ जुलै: आंदोलनाचा वणवा देशभरात पसरला. शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, डिंपल यादव यांसारख्या प्रमुख विरोधी नेत्यांनी जंतर-मंतरला भेट दिली. राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा कारणास्तव दिल्ली मेट्रोची १२ हून अधिक स्थानके बंद करण्यात आली.
२३-२४ जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा देशवासीयांना संबोधित करत पेपरफुटीविरोधात कडक कायद्याचे आश्वासन दिले. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले. सीजेपी प्रतिनिधींनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम दिला.
२५ जुलै: जंतर-मंतरवर अथांग जनसागर लोटला. दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला.
पुढील रणनीती लवकरच सांगू, थोडा वेळ द्या : अभिजीत दिपके
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दिपके म्हणाले, पुढील रणनीती लवकरच जाहीर करू. पेपरफुटीविरोधातील आंदोलन शनिवारी संपले आहे. कृपया आम्हाला थोडा वेळ द्या.
जेव्हा त्यांना पंजाबमधील पेपरफुटीबाबत त्यांची रणनीती काय असेल असे विचारण्यात आले, तेव्हा दीपके यांनी उत्तर दिले की, त्यावरही चर्चा करू. आम्ही सध्या यासाठी नियोजन करत आहोत. सरकारसोबतच्या चर्चेवर ते म्हणाले की, जे खटले दाखल केले आहेत, त्याबद्दल बोलणी सुरू आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याविरुद्ध कोणताही खटला दाखल केला जाऊ नये.
विशेष म्हणजे, कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली २० जूनपासून जंतर-मंतरवर ३६ दिवस चाललेले आंदोलन २५ जुलै रोजी शिक्षणमंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने संपले.
कपिल सिब्बल यांना भेटले दिपके
अभिजीत दीपके रविवारी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. तिथून बाहेर पडताना त्यांनी सांगितले की, सरकारशी चर्चा सुरू आहे की कोणत्याही विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करू नये. अभिजीत आणि कपिल सिब्बल यांची भेट, त्यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेण्यासाठी म्हणून पाहिली जात आहे. सिब्बल यांची गणना भारतातील सर्वांत ज्येष्ठ वकिलांमध्ये केली जाते आणि ते गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा