
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर लवकरच सोन्याचा कळस शोभणार आहे. गोव्यातील एका भाविकाने सुमारे अडीच कोटी रुपयांचा, दीड किलोहून अधिक सोन्याचा वापर करून तयार केलेला हा कळस मंदिराला अर्पण केला आहे. अधिक महिन्यानिमित्त शुक्रवारी हा कळस मंदिरावर बसविण्याचा मानस असल्याची माहिती मिळत आहे.
देशातील ५१ शक्तीपीठांपैकी प्रमुख असलेल्या करवीरच्या अंबाबाईला वर्षभरात ५० लाखांहून अधिक भाविक दर्शनाला येतात. या भक्तांपैकीच गोव्यातील एका भाविकाने आपली श्रद्धा सोन्याच्या रूपाने अर्पण करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही त्यांनी देवीला सोन्याचे अलंकार अर्पण केले होते. मागील महिन्यात दर्शनासाठी आले असता कळसाच्या जीर्णोद्धाराचा विषय समजताच त्यांनी तत्काळ सोन्याचा कळस बनवण्याची इच्छा व्यक्त केली.
हा कळस मेंगलोर येथील कारागिराने बनवला असून त्यासाठी प्रथम २०० किलो तांब्याचे मॉडेल तयार करून मूळ कळसाचे माप घेण्यात आले. तांब्याचा कळस बनवण्यास एक महिना, तर सोन्याचा पत्रा चढवण्यास १० ते १२ दिवस लागले. कळस ६ फुटांचा तर डेरा साडेसात फुटांचा आहे.
अधिक महिन्यानिमित्त येत्या शुक्रवारी हा सोन्याचा कळस मंदिरावर बसवण्याचा मानस असल्याचे देवस्थान समितीचे प्रभारी सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. शिखरावरील दगडी बांधकामातून पाणी झिरपून झाडे उगवण्याच्या समस्येवर उपाय म्हणून धातूचे कव्हर करण्याचा विचार सुरू होता, त्यातूनच या भव्य कल्पनेला जन्म झाला.