मध्यपूर्वेत तणाव शिगेला; इंधन पुरवठा, किमतीवर परिणाम शक्य

तेहरान : अमेरिकेने इराणवर नव्या हवाई कारवाया सुरू केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणविरोधातील लष्करी कारवाई तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz ) बंद करण्याची घोषणा केली आहे.
इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जहाजांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतूक आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकन लष्कराने बुधवारी रात्री इराणमधील काही ठिकाणांवर नव्याने हवाई हल्ले सुरू केल्याचे जाहीर केले. त्यानंतर दक्षिण इराणातील बंदर अब्बास (Bandar Abbas) बंदर शहर, केश्म बेट (Qeshm Island), मिनाब आणि सिरिक परिसरात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. हे सर्व भाग होर्मुझ सामुद्रधुनीजवळ असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील इराणचे राजदूत अमीर सईद इरावणी (Amir Saeid Iravani) यांनी अमेरिकेच्या दबावाच्या धोरणावर टीका केली आहे. "धमक्या, दबाव किंवा लष्करी शक्तीच्या वापरातून कोणताही टिकाऊ करार होऊ शकत नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
इराणचा खाडीतील देशांना इशारा
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही खाडीतील शेजारी देशांना इशारा देत अमेरिकेला किंवा इस्रायलला त्यांच्या भूमीचा अथवा लष्करी सुविधांचा वापर इराणविरोधी कारवायांसाठी करू देऊ नये, असे म्हटले आहे. अशा कारवायांना आळा घालण्याची "कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी" संबंधित देशांवर असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले.
इंधनाच्या किमतींवर परिणामाची शक्यता
अमेरिका-इराण संघर्ष तीव्र होत असताना होर्मुझ सामुद्रधुनीतील हालचालींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जागतिक तेल व्यापाराचा मोठा हिस्सा या मार्गातून होत असल्याने या भागातील अस्थिरतेचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर आणि इंधनाच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.