
आजच्या पिढीला कदाचित या किड्याबद्दल फारशी माहिती नसेल, पण ३०-४० वर्षांपूर्वीच्या पिढीसाठी हा किडा म्हणजे बालपणातील एका सुंदर खेळाचा सोबती होता. ग्रामीण भागात तर या किड्याला 'पावसाचा दूत' मानले जायचे. पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्या की काळ्या मातीतून, नव्याने उगवलेल्या हिरव्या गवतावर एक छोटासा लालसर तुकडा तुरुतुरु चालताना दिसायचा. तो म्हणजेच आपला लाडका मृगाचा किडा!

दिसायला जितका मोहक, तितकीच त्याची नावेही विविध आहेत. मराठीत याला 'मृगाचा किडा' आणि शरीरावरचे मऊ केस पाहून 'मखमली किडा' म्हणतात. बोलीभाषेत भगव्या-लाल रंगामुळे 'गोसावी किडा' किंवा 'बोवा' तर जव्हार-तलासरीच्या आदिवासी बांधव प्रेमाने 'देवगाय' किंवा 'गोगलगाय' म्हणतात. इंग्रजीत याला 'रेड वेल्वेट माईट' म्हणतात. इतकेच नव्हे, तर वाल्मिकी रामायणातही याचा उल्लेख 'इन्द्रगोप' या नावाने आढळतो. वर्षावर्णन करताना रामायणकारांनी हिरव्या गवतावर चमकत असलेल्या या किड्यांचे जे वर्णन केले आहे, ते आजही डोळ्यांसमोर उभे राहते.
किडा आकाराने फक्त ३ ते १० मिलिमीटर इतका लहान असतो. संपूर्ण शरीर मऊ, मखमली केसांनी झाकलेले असल्यामुळे तो हातात घेतला तरी अगदी गुळगुळीत वाटतो. मात्र, वर्षभर तो आपल्याला दिसत नाही. तो मातीत सुप्त अवस्थेत असतो. पहिल्या पावसामुळे जेव्हा जमिनीत ओलावा निर्माण होतो, तेव्हाच तो बाहेर येतो. त्यानंतर फक्त दोन ते तीन आठवडेच तो आपल्याला दिसतो. हा त्याचा प्रजननाचा काळ असतो. या काळात तो जोडीदार शोधतो, ओल्या मातीत अंडी घालतो आणि पुन्हा मातीत अदृश्य होतो. मृग नक्षत्र लागले की हे किडे दिसू लागावेत, अशी पूर्वीची समजूत होती.

दिसायला छोटा असला, तरी निसर्गचक्रात या किड्याची भूमिका फार मोठी आहे. जंगलातील गवत, पाने, फांद्या जमिनीवर पडतात. या पालापाचोळ्याचे विघटन होऊन त्यातून सुपीक काळी माती तयार होते. हे काम बुरशी करत असल्या, तरी त्या बुरशीला खाणारे सूक्ष्म जीवही मातीत असतात. या जीवांची अंडी हे मृगाचे किडे आवडीने खातात. त्यामुळे बुरशी खाणाऱ्या जीवांची संख्या नियंत्रित राहते आणि बुरशीचे कार्य सुरळीत चालते. थोडक्यात, हा छोटासा मखमली मित्र नसता, तर पालापाचोळा कुजणे मंदावले असते, नवीन झाडे रुजणे कठीण झाले असते आणि जंगलांच्या पुनरुत्पादनाला खीळ बसली असती. म्हणूनच तो फक्त एक किडा नसून, निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
असे असले तरी, हा सहज दिसणारा जीव आता मात्र दुर्मिळ होत चालला आहे. शहरांमध्ये तर तो पूर्णपणे दिसेनासा झाला आहे. ग्रामीण भागातही पूर्वीसारखे त्याचे थवे दिसत नाहीत. त्यामागची कारणे अनेक आहेत. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर, जमिनीचे अतिचराईकरण, गवत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नांगरट करणे आणि गावे शहरांमध्ये रूपांतरित होत असल्याने त्याच्या राहण्याच्या जागा नष्ट होत आहेत. बदलते हवामान आणि कमी पडणारा पाऊसही याला कारणीभूत आहे.
हा मखमली मित्र पुन्हा आपल्यामध्ये परत आणायचा असेल, तर त्यासाठी फार मोठी उपाययोजना न करता छोट्या-छोट्या गोष्टी करणे पुरेसे आहे. आपल्या अंगणात, शेतात किंवा आजूबाजूच्या मोकळ्या जागेत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर टाळावा. जमिनीची नांगरट जास्त न करता, शक्यतो नैसर्गिक पद्धतीने शेती करावी. गवत, पालापाचोळा जाळू नये, कारण त्याच्यातूनच हा किडा बाहेर येतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तो दिसला की त्याला हात लावून त्रास देऊ नये. फक्त लांबून त्याचे तेजस्वी सौंदर्य न्याहाळून, त्याला आपला आदर अर्पण करावा.
जेव्हा पुढच्या पावसाच्या पहिल्या सरी कोसळतील, तेव्हा जमिनीवर नजर ठेवा. एखादा लाल मखमली जीव तुरुतुरु चालताना दिसला, तर समजा निसर्गाने आपल्याला आपला आशीर्वादच पाठवला आहे. तो फक्त बालपणाची आठवण नाही, तर भविष्यातील जंगलांचे जिवंत आश्वासन आहे. तो टिकला पाहिजे!