राहुल गांधी पेपरफुटीविरोधात थोपटणार दंड

१७ जूनपासून राजस्थानातून देशव्यापी आंदोलनाचा शंखनाद

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
13th June, 07:09 pm
राहुल गांधी पेपरफुटीविरोधात थोपटणार दंड

जयपूर: ‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून देशभरातील वातावरण तापले असतानाच, आता काँग्रेसने या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेस पक्ष देशभरात व्यापक आंदोलन छेडणार असून, या मोहिमेची सुरुवात १७ जून रोजी राजस्थानमधील कोटा येथून होणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या आंदोलनाचे नेतृत्व करणार असून, ते १७ जूनला कोट्यात आयोजित ‘विद्यार्थी संमेलना’द्वारे देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या देशव्यापी आंदोलनाची अधिकृत घोषणा केली. राहुल गांधी हे देशातील विद्यार्थी आणि तरुणांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले आहेत, असे वेणुगोपाल यावेळी म्हणाले.
कोटा येथील पहिल्या जाहीर सभेने या आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर, पुढील टप्प्यात देशातील इतर प्रमुख शैक्षणिक केंद्रांवर ही संमेलने आयोजित केली जातील.
१७ जून: कोटा (राजस्थान) : मोहिमेचा प्रारंभ,
१० जुलै: प्रयागराज (उत्तर प्रदेश)
११ जुलै: पटणा (बिहार)
१४ जुलै: दिल्ली.
पीडित विद्यार्थी, शिक्षकांना एकाच मंचावर आणणार
के. सी. वेणुगोपाल यांनी माहिती दिली की, या विद्यार्थी संमेलनांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, युवा संघटना, शिक्षक आणि पेपरफुटी घोटाळ्यांमुळे थेट फटका बसलेल्या सर्व घटकांना एकत्र आणले जाईल. पेपरफुटी, परीक्षांचा वाढता खर्च आणि पारदर्शक भरती प्रक्रियेचा अभाव यामुळे ज्या लाखो तरुण भारतीयांचे भविष्य धोक्यात आले आहे, त्यांच्या समस्यांना या मोहिमेद्वारे वाचा फोडली जाईल.
या परिषदांच्या माध्यमातून प्रभावित तरुणांना त्यांचे अनुभव आणि व्यथा मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, पेपरफुटी घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी याद्वारे केली जाईल. या देशव्यापी मोहिमेअंतर्गत ‘एनएसयूआय’, युवक काँग्रेससह सर्व प्रदेश आणि जिल्हा काँग्रेस समित्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी सक्रिय काम करणार आहेत.
आंदोलनाची सुरुवात ‘कोटा’मधून का?
काँग्रेसने या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी राजस्थानमधील कोटा शहराची निवड करण्यामागे मोठे धोरणात्मक आणि राजकीय महत्त्व आहे. कोटा हे देशातील सर्वात मोठे ‘कोचिंग हब’ मानले जाते. येथे ‘नीट’ आणि ‘जेईई’ परीक्षांच्या तयारीसाठी देशभरातून, विशेषतः उत्तर भारतातील लाखो विद्यार्थी वास्तव्यास असतात. त्यामुळे पेपरफुटीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी आणि देशातील तरुणांचा रोष अधोरेखित करण्यासाठी हे ठिकाण सर्वात प्रभावी ठरणार आहे.

हेही वाचा