
नवी दिल्ली: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्राहकांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने बड्या कंपन्यांना दणका दिला आहे. मॅगीमध्ये अळ्या सापडणे, रेस्टॉरंटमधील अस्वच्छता आणि खजूरमध्ये किडे आढळल्याच्या व्हायरल तक्रारींनंतर 'एफएसएसएआय'ने नेस्ले इंडिया, केएफसी, फ्लिपकार्ट आणि 'ओपन सीक्रेट' या कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
प्राधिकरणाने एकूण तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ही कारवाई केली आहे:
मॅगीमध्ये अळ्या आढळल्याचा आरोप: नेस्ले इंडियाच्या 'मॅगी' नूडल्सच्या पाकिटात अळ्या किंवा कीटक आढळल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. यावर 'एफएसएसएआय'ने कंपनीकडून 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' मागवला असून, संबंधित बॅचचे गुणवत्ता अहवाल आणि हे उत्पादन पुरवठा साखळीतून हटवण्यासाठी काय पावले उचलली, याची माहिती मागवली आहे. दरम्यान, नेस्लेने हे आरोप फेटाळले असून तक्रारदार व्यक्तीशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे म्हटले आहे. तसेच कंपनीने आपले उत्तर प्राधिकरणाकडे सादर केले आहे.
केएफसी आउटलेटमध्ये अस्वच्छता: आंध्र प्रदेशातील एलुरु येथील एका केएफसी आउटलेटमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात काम सुरू असल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी प्राधिकरणाने स्वच्छता, अन्न साठवणूक आणि कीटक नियंत्रणाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. केएफसीचे संचालन करणाऱ्या 'देवयानी इंटरनॅशनल'ने या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे.
खजूरमध्ये कीटक: 'फ्लिपकार्ट मिनिट्स'द्वारे घरपोच मागवण्यात आलेल्या 'ओपन सीक्रेट' कंपनीच्या ‘अन-जंकड डेट्स’ (खजूर) मध्ये कीटक आढळल्याची तिसरी तक्रार होती. यावर फ्लिपकार्ट आणि ओपन सीक्रेट दोन्ही कंपन्यांकडून अंतर्गत गुणवत्ता तपासणीचे रेकॉर्ड मागवण्यात आले आहेत.
सोशल मीडियावरील जनक्षोभाची 'सुओ मोटो' दखल घेण्याची प्राधिकरणाची ही सक्रिय भूमिका अन्न सुरक्षा क्षेत्रातील कंपन्यांसाठी कडक इशारा मानली जात आहे. सध्या या केवळ प्राथमिक नोटिसा असून कंपन्यांच्या उत्तरांनंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल. या बातमीनंतर नेस्ले इंडियाच्या समभागांमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली आहे.