तिलारी घाटातील 'त्या' अज्ञात महिलेच्या खूनप्रकरणाचा अखेर उलगडा

बेळगावातील बाप-लेकासह तिघांना अटक

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
22 mins ago
तिलारी घाटातील 'त्या' अज्ञात महिलेच्या खूनप्रकरणाचा अखेर उलगडा

दोडामार्ग : कोदाळी ते दोडामार्ग मार्गावरील तिलारी घाटातील प्रेशर पॉइंटजवळ २९ मे २०२६ रोजी सडलेल्या अवस्थेत आढळलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. हा प्रकार अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून नियोजनपूर्वक केलेला खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

यल्लाप्पा महिलाप्पा करणावर (५७), बसवराज यल्लाप्पा करणावर (३३, दोघेही रा. राजकोटे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) आणि लगमाप्पा अंकलगी (३७, रा. केनवट्टी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील यल्लाप्पा आणि बसवराज हे बाप-लेक आहेत. पोलिसांच्या तपासात मृत महिलेची ओळख गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी (२५, रा. वंटमोरी, जि. बेळगाव) अशी पटली आहे.

तिलारी घाटातील झाडीझुडपात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत खुनाचा संशय गृहित धरून तपास सुरू केला. तपासात आरोपींनी स्टीलच्या शॉक अ‍ॅब्झॉर्बर पाईपने महिलेच्या डोक्यावर वार करून तिचा खून केल्याचे समोर आले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तिलारी घाटातील निर्जन भागात फेकण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके स्थापन केली होती. मृत महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते. महिलेच्या अंगावरील मोरपिसी रंगाची साडी, दागिने आणि पायातील पैंजण यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. पोलिसांनी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, गोवा तसेच कर्नाटक राज्यातील तब्बल १९९ बेपत्ता महिलांची माहिती तपासली.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी केली. २५ मे रोजी तिलारी घाटात गेलेली एक संशयास्पद क्रूझर गाडी अवघ्या २० मिनिटांत परतताना आढळून आली. त्यानंतर बेळगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृत गंगव्वा एका पल्सर मोटारसायकलवरून संशयितासोबत जाताना दिसली. पोलिसांनी बेळगाव ते हुबळी या सुमारे ११० किलोमीटर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित बसवराजपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या खूनामागील नेमके कारण, आरोपींमधील परस्पर संबंध आणि गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा