गवंडाळी-कुंभारजुवे येथील प्रकार : भंडारी समाजाकडून निषेध

पणजी : गवंडाळी-कुंभारजुवे येथे खासगी मालकीच्या जागेत विहीर बांधण्याच्या प्रकरणात जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी मनमानी व भेदभावपूर्ण भूमिका घेतल्याचा आरोप करत गोमंतक भंडारी समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यासंदर्भात समाजातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
भंडारी समाजाचे सक्रिय सदस्य आणि कायदेशीर सल्लागार अॅड. आतिश मांद्रेकर यांचे मोठे भाऊ रुतेश मांद्रेकर आणि नीलांगी मांद्रेकर यांनी कायदेशीररीत्या खरेदी केलेल्या प्लॉटवर आपल्या निवासी घराचे आणि विहिरीचे बांधकाम सुरू केले आहे. स्थानिक भागात पिण्याच्या पाण्याचे नळ उपलब्ध नसल्यामुळे, घरगुती वापरासाठी पाण्याचा एकमेव स्रोत म्हणून त्यांनी विहीर खणण्याचे काम हाती घेतले होते. यासाठी त्यांनी सर्व आवश्यक सरकारी परवानग्याही घेतल्या होत्या.
न्यायालयाने याचिका फेटाळली
विहीर बांधण्यास विरोध करत शेजारील जमीन मालकाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावल्याचे समाजाने म्हटले आहे. त्यानंतरही या प्रकरणात जलस्रोत खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या आणि खात्याने कारणे दाखवा नोटिसा बजावल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जलस्रोत खात्याच्या अधिकारक्षेत्रावर प्रश्न
निवासी बांधकामास आवश्यक मंजुरी मिळालेली असताना अशा कामांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार जलस्रोत खात्याला आहे का, असा प्रश्न भंडारी समाजाने उपस्थित केला आहे. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतरही संबंधित प्रकरणात खात्याकडून कारवाईची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
जलस्रोत मंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी
रुतेश मांद्रेकर यांना विहीर बांधण्यास आवश्यक सहकार्य मिळावे आणि या प्रकरणात योग्य तो निर्णय व्हावा यासाठी जलस्रोत खात्याच्या मंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी गोमंतक भंडारी समाजाने केली आहे. तसेच या प्रकरणात निष्पक्ष आणि न्याय्य भूमिका घेण्याचे आवाहनही समाजाने केले आहे.