Home >> गोवा >> ‘रेंट अ कॅब’, टॅक्सींमधील स्पीड गव्हर्नर निष्क्रिय केल्यास परवाना निलंबित

‘रेंट अ कॅब’, टॅक्सींमधील स्पीड गव्हर्नर निष्क्रिय केल्यास परवाना निलंबित

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th June, 11:50 pm
‘रेंट अ कॅब’, टॅक्सींमधील स्पीड गव्हर्नर निष्क्रिय केल्यास परवाना निलंबित

पणजी : राज्यात ‘रेंट अ कॅब’ आणि टॅक्सी वाहनांमधील ‘स्पीड गव्हर्नर’ निष्क्रिय करण्यात आल्याचे वाहतूक खात्याच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असून, स्पीड गव्हर्नर बसविण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक संचालनालयाने दिला आहे.
सर्व व्यावसायिक वाहने, ‘रेंट अ कॅब’ आणि टॅक्सींसाठी स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या यंत्रामुळे वाहनाचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत मर्यादित राहतो. मात्र, काही वाहनांमध्ये हे यंत्र निष्क्रिय करून भरधाव वेगाने वाहने चालवली जात असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ११८ अंतर्गत वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या ‘एआयएस ०१८/२००१’ मानकांनुसार प्रत्येक वाहतुकीच्या वाहनात पूर्वनिश्चित कमाल वेग मर्यादा असलेला स्पीड गव्हर्नर बसविणे अनिवार्य आहे. यासंदर्भात सार्वजनिक सूचना जारी करून सर्व चालकांना माहिती देण्यात आली आहे, असे वाहतूक संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
कार्यक्षमता तपासण्याचे निर्देश
सध्या काही वाहनांमध्ये स्पीड गव्हर्नर बसविलेले नाहीत किंवा ते कार्यरत नसल्याचे खात्याच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व ‘रेंट अ कॅब’ आणि टॅक्सी चालकांनी आपल्या वाहनांमध्ये हे यंत्र बसविले असून ते कार्यक्षम स्थितीत आहे, याची खात्री करावी, असे निर्देश वाहतूक संचालनालयाने दिले आहेत.      

हेही वाचा
सर्व पहा