आगामी निवडणुकांतही मगो-भाजप युती कायम

दीपक ढवळीकर : दिल्लीतील एनडीए बैठकीनंतर भूमिका स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th June, 11:45 pm
आगामी निवडणुकांतही मगो-भाजप युती कायम

पणजी : सध्या राज्यात अस्तित्वात असलेली मगो आणि भाजप यांच्यातील युती आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही कायम राहणार असल्याचे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली येथे झालेल्या एनडीए बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील एनडीए सरकारने सलग १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने बुधवारी दिल्लीत एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपसह मित्रपक्षांचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते उपस्थित होते. मगो हा एनडीएचा घटक पक्ष असल्याने पक्षाध्यक्ष या नात्याने दीपक ढवळीकर यांनी बैठकीत सहभाग घेतला.
ढवळीकर यांनी सांगितले की, मगो-भाजप युती भविष्यातही कायम राहील. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
सुदिन ढवळीकर यांचाही दुजोरा
वीजमंत्री तथा मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनीही मगो-भाजप युती आगामी निवडणुकांपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील सध्याचे राजकीय संबंध अधिक दृढ असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी शिरोडा पोटनिवडणुकीत मगोने स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे मगो-भाजप युतीत तणाव निर्माण झाला होता. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे दोन्ही पक्ष आगामी निवडणुकांसाठी एकत्र राहण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
प्रियोळ मतदारसंघावरून युतीसमोर आव्हान?
राज्यात अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यास, प्रियोळ मतदारसंघ एसटी प्रवर्गासाठी राखीव होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दीपक ढवळीकर यांनी याच मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला असून, मागील निवडणूकही तेथूनच लढवली होती. त्यामुळे प्रियोळ मतदारसंघाच्या राजकीय गणितांवरून मगो-भाजप युतीमध्ये काही अंशी पेच निर्माण होण्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा