बांगलादेशच्या डरकाळीसमोर ऑस्ट्रेलिया भुईसपाट

इतिहासात पहिल्यांदाच कांगारूंच्या विरोधात मालिका विजय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
11th June, 11:14 pm
बांगलादेशच्या डरकाळीसमोर ऑस्ट्रेलिया भुईसपाट

मीरपूर : जागतिक क्रिकेटमध्ये गुरुवारी एका महाउलटफेराची नोंद झाली असून, बांगलादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारत एक नवा इतिहास रचला. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रभावित झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने कांगारूंवर दिमाखदार विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयासह बांगलादेशने आपल्या क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याचा अभूतपूर्व पराक्रम केला आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत बांगलादेशने आता २-० अशी विजयी आघाडी घेतली असून, त्यांनी कांगारूंचे वर्चस्व मोडून काढले आहे. काही दिवसांपूर्वीच पहिल्या वनडेत बांगलादेशने तब्बल २१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याची किमया केली होती, तोच फॉर्म त्यांनी याही सामन्यात कायम ठेवला.
मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बांगलादेशच्या धारदार गोलंदाजीसमोर त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या दोन षटकांतच मॅथ्यू शॉर्ट, कूपर कॉनली आणि मॅट रेनशॉ हे तिन्ही आघाडीचे फलंदाज शून्य धावांवर तंबूत परतल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ० अशी दयनीय झाली होती. यानंतर कर्णधार जोश इंग्लिसने ३४ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याची विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाची आणखी घसरण होऊन स्थिती ६ बाद ८१ अशी झाली.
या कठीण प्रसंगी मार्नस लबूशेन (५५ धावा) आणि झेव्हियर बार्टलेट (५२ धावा) यांनी अर्धशतकी खेळी करत संघाची लाज राखली. या जोडीने सातव्या विकेटसाठी १०३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४२ षटकांचा करण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाने सर्वबाद १८२ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशकडून मुस्ताफिझूर रहमान आणि तास्किन अहमद यांनी प्रत्येकी ३ बळी घेत कांगारूंना जखडून ठेवले.
हृदॉयची नाबाद ४० धावांची खेळी
पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार बांगलादेशला ४१ षटकांत १९२ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी अत्यंत संयमी आणि चिवट फलंदाजी केली. सलामीवीर सौम्या सरकार आणि नजमुल होसेन शंटो यांनी प्रत्येकी ४२ धावांची खेळी करत संघाच्या ऐतिहासिक विजयाचा मजबूत पाया रचला. त्यानंतर तौहिद हृदॉयने नाबाद ४० धावांची परिपक्व खेळी करत बांगलादेशच्या शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला मोसादेक होसेन (१५ धावा) आणि कर्णधार मेहदी हसन मिराझ (२२ धावा) यांनी मोलाची साथ दिली.