आयपीएल प्लेऑफ : विजेत्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी

धर्मशाळा : ‘आयपीएल २०२६’ मधील सर्वात मोठ्या सामन्यासाठी आता रंगमंच पूर्णपणे सज्ज झाला आहे. मंगळवारी धर्मशाळा येथील एचपीसीए स्टेडियमवर गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि गुजरात टायटन्स (जीटी) यांच्यात 'क्वालिफायर १' चा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल, तर पराभूत होणाऱ्या संघाला 'क्वालिफायर २' च्या माध्यमातून फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सचे साहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी या लढतीचे वर्णन 'दोन दर्जेदार संघांमधील खरे युद्ध' असे केले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना विजय दहिया म्हणाले, जेव्हा तुम्ही या लढतीला युद्ध म्हणता, तेव्हा ते नक्कीच एक युद्ध असणार आहे. चालू हंगामात हे दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले असून निकाल १-१ असा बरोबरीत आहे. दोन्ही बाजूला काही मोठे खेळाडू आहेत आणि दोन्ही संघ एक युनिट म्हणून खेळतात. हेच या दोन्ही संघांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
गुणतालिकेत आरसीबी आणि गुजरात टायटन्स अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिले. दोन्ही संघांचे समान १८ गुण होते, मात्र सरस नेट रन रेटच्या जोरावर आरसीबीने अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही संघांमधील आतापर्यंतचा एकूण ‘हेड-टू-हेड’ रेकॉर्ड ४-४ असा बरोबरीत आहे.
गोलंदाजीच ठरणार सामन्याचा टर्निंग पॉईंट
आरसीबी आणि गुजरात दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाजांची फौज आहे. मात्र, दहिया यांच्या मते या बाद फेरीच्या सामन्यात गोलंदाजांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरेल. चालू हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल दोन्ही स्थानांवर याच दोन संघांचे गोलंदाज आहेत.
भुवनेश्वर, रबाडावर मोठी जबाबदारी
आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि गुजरातचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा या दोघांनीही प्रत्येकी २४ बळी घेतले असून, आपापल्या संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असेल. दहिया म्हणाले, संघाने धावफलकावर कितीही धावा लावल्या, तरी शेवटी तुमच्याकडे मजबूत गोलंदाजी असणे आवश्यक असते. दोन्ही संघांच्या गोलंदाजीत प्रचंड सातत्य आणि आत्मविश्वास आहे.
गिल मानसिकदृष्ट्या खंबीर
गिलचे कौतुक करताना माजी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज दहिया म्हणाले, विराट कोहलीने या दोघांपेक्षा जास्त क्रिकेट खेळले आहे. पण या हंगामात शुभमन गिलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, त्यावरून तो तांत्रिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही किती खंबीर आहे हे दिसते.
सिराज, नेहरा यांचे विशेष कौतुक
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची सध्याची लय अप्रतिम आहे. सिराजने १४ सामन्यांत १७ बळी घेतले असून आपल्या विविधतेने आणि आक्रमकतेने फलंदाजांना त्रास दिला आहे. दहिया यांनी सिराज आणि त्याच्या जोडीदाराच्या (रबाडा) केमिस्ट्रीचे कौतुक केले. तसेच, गुजरातचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या मॅन-मॅनेजमेंटला याचे श्रेय दिले. सामान्यतः भागीदारी फलंदाजीत पाहिली जाते, पण या दोघांमध्ये गोलंदाजीत उत्कृष्ट भागीदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या दबावाखाली खेळूनही हे दोघे आयपीएलमध्ये अव्वल कामगिरी करत आहेत आणि आशिष नेहरा त्यांना खूप छान हाताळत आहेत, असे दहिया म्हणाले.
धर्मशाळेची खेळपट्टी आणि फिरकीचा फॅक्टर
समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या धर्मशाळा मैदानाचा इतिहास हाय-स्कोअरिंग सामन्यांचा राहिला आहे. हवेच्या विरळतेमुळे येथे इतर मैदानांपेक्षा जास्त षटकार मारले जातात. चालू हंगामात येथे झालेल्या तीनही सामन्यांत संघांनी २०० धावांचा टप्पा पार केला आहे. आरसीबीने या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध २३ धावांनी विजय मिळवला आहे, तर गुजरातचा संघ या मैदानावर यंदाचा पहिला सामना खेळणार आहे.
धर्मशाळेत खेळपट्टीमुळे फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नाही, हे मान्य करतानाच दहिया यांनी स्पष्ट केले की, येथे स्पिनर्ससाठी फार मोठी भूमिका नसेल, तरीही दोन्ही संघांकडे असलेले फिरकीपटू खूप अनुभवी आणि परिपक्व आहेत. त्यामुळे खेळपट्टी कशीही असो, ते आपली भूमिका चोख बजावतील आणि सामन्यात प्रभाव पाडतील यात शंका नाही.
‘या’ खेळाडूंवर असणार विशेष लक्ष
- विराट कोहली या हंगामात १४ सामन्यांत ५०.६३ च्या सरासरीने आणि १६३.८२ च्या स्ट्राईक रेटने ५५७ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
- शुभमन गिलने १३ सामन्यांत ४७.३८ च्या सरासरीने आणि १६१.६७ च्या स्ट्राईक रेटने ६१६ धावा कुटल्या आहेत.
- साई सुदर्शनने ४९.०८ च्या सरासरीने १५७.९२ च्या स्ट्राईक रेटने ६३८ धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे.
- अनुभवी भुवनेश्वर कुमारच्या ४ षटकांच्या कोट्यावर क्वालिफायर-१ मधील आरसीबीचे यश बरेचसे अवलंबून असेल. आयपीएल २०२६ मध्ये भुवनेश्वर हा सर्वाधिक बळी घेणारा (पर्पल कॅपधारक) गोलंदाज आहे.
आरसीबीची मजबूत बाजू
- बंगळुरू आणि गुजरात हे आयपीएल २०२६ मधील सर्वात यशस्वी संघ ठरले आहेत. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने साखळी सामन्यात आक्रमक सुरुवात केली. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी प्रभावी दिसत आहे.
- आरसीबीने यंदाच्या हंगामात सातत्याने २०० धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीचा अनुभव तसेच जोश हेजलवुड आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या वेगवान गोलंदाजांचा संघाला मोठा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने घरच्या मैदानाबरोबरच प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावरही दमदार विजय मिळवले आहेत.
गुजरातने प्रतिस्पर्ध्यांवर कशी ठेवली पकड ?
- गुजरात टायटन्सने मजबूत फलंदाजी आणि धारदार गोलंदाजीच्या जोरावर प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि यष्टिरक्षक फलंदाज जोश बटलर या तिकडीने संघाला सातत्याने विजय मिळवून दिले.
- हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात गुजरातची गोलंदाजीही अधिक प्रभावी ठरली. मोहम्मद सिराज, कासिगो रबाडा आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी नव्या चेंडूने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण केला. तर राशिद खान आणि आर साई किशोर यांनी मधल्या षटकांत नियंत्रित गोलंदाजी करत संघाला संतुलन मिळवून दिले.