पाटीदारचे अर्धशतक व्यर्थ : अभिषेक, इशान, क्लासेनची फटकेबाजी

हैदराबाद : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या ६७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५५ धावांनी पराभव करत एका दणदणीत विजयाची नोंद केली. हैदराबादने दिलेल्या २५६ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या फलंदाजांनी चांगली फाईट दिली, परंतु निर्धारित २० षटकांत ४ बाद २०० धावांपर्यंतच त्यांची मजल मारता आली.
विशाल धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बंगळुरूला व्यंकटेश अय्यरने धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या १९ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४४ धावांची स्फोटक खेळी केली. दुसऱ्या बाजूने स्टार फलंदाज विराट कोहली ११ चेंडूंत १५ धावा करून बाद झाला. देवदत्त पडिक्कलनेही १४ चेंडूंत २१ धावांचे योगदान दिले.
सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने डाव सावरत उत्कृष्ट फलंदाजी केली. पाटीदारने ३९ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्याला कृणाल पंड्याची चांगली साथ मिळाली. कृणालने ३१ चेंडूंत नाबाद ४१ धावा (५ चौकार) केल्या, तर शेवटी टिम डेव्हिडने ७ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या. मात्र, हैदराबादच्या अचूक गोलंदाजीमुळे धावगती राखणे बंगळुरूला कठीण गेले.
हैदराबादच्या गोलंदाजांनी २५५ धावांच्या मोठ्या धावसंख्येचा बचाव अतिशय चोखपणे केला. इशान मलिंगाने घातक गोलंदाजी करत ४ षटकांत ३३ धावा देऊन २ महत्त्वाचे बळी टिपले. त्याला साकिब हुसैनने ४ षटकांत अवघ्या ३१ धावा देत १ बळी मिळवून उत्तम साथ दिली. अष्टपैलू ट्रॅव्हिस हेडने १ षटकात ७ धावा देत १ बळी घेतला. कर्णधार पॅट कमिन्स महागडा ठरला (४ षटकांत ४८ धावा), तर शिवंग कुमारने २ षटकांत ३२ धावा दिल्या.
हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत ४ बाद २५५ धावांचा विशाल डोंगर उभा केला. हैदराबादच्या अव्वल फळीतील फलंदाजांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे बंगळुरूच्या गोलंदाजांची पुरती दाणादाण उडाली.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादला सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी नेहमीप्रमाणेच स्फोटक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या २४ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी केली. ट्रेव्हिस हेड १६ चेंडूंत २६ धावा (५ चौकार) करून बाद झाला.
त्यानंतर अभिषेक शर्माने अधिक आक्रमक रूप धारण करत बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अवघ्या २२ चेंडूंत ५ चौकार आणि ५ गगनभेदी षटकारांच्या मदतीने ५६ धावांची वादळी खेळी खेळली. त्याचा स्ट्राईक रेट २५४.५५ इतका प्रचंड होता.
सलामीवीर बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन यांनी सामन्याची सूत्रे हाती घेतली आणि बंगळुरूच्या अडचणीत अधिक भर घातली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या ४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी रचली. हेन्रिक क्लासेनने अवघ्या २४ चेंडूंत २ चौकार आणि ५ षटकारांसह ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. इशान किशनने एका बाजूने खिंड लढवत ४६ चेंडूंत ७९ धावांची सर्वोत्तम खेळी साकारली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार ठोकले. शेवटच्या षटकांमध्ये नितीश कुमार रेड्डीने अवघ्या १२ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद २९ धावा कुटून संघाला २५५ धावांच्या ऐतिहासिक धावसंख्येवर पोहोचवले.
हैदराबादच्या फलंदाजांसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एकही गोलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. रसिक सलाम दारने ४ षटकांत ५२ धावा देत सर्वाधिक २ बळी घेतले. तर सुयश शर्माने ३ षटकांत ३६ धावा देत १ बळी आणि कृणाल पंड्याने २ षटकांत २४ धावा देत १ बळी मिळवला. अनुभवी भुवनेश्वर कुमार (४ षटकांत ५१ धावा) आणि जोश हेझलवूड (४ षटकांत ५५ धावा) हे दोन्ही प्रमुख गोलंदाज महागडे ठरले. बाॅक्स
सामन्याचा संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत २५५/४ (इशान किशन ७९, अभिषेक शर्मा ५६, हेन्रिक क्लासेन ५१)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ४ बाद २०० (रजत पाटीदार ५६, व्यंकटेश अय्यर ४४, कृणाल पंड्या नाबाद ४१; इशान मलिंगा २/३३, ट्रॅव्हिस हेड १/७, साकिब हुसैन १/३१).