गुजरात टायटन्स अंतिम फेरीत

गिलचे वादळी शतक : राजस्थान रॉयल्सचा ७ गड्यांनी पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
1 hours ago
गुजरात टायटन्स अंतिम फेरीत

मुल्लानपूर : कर्णधार शुभमन गिलच्या शतकी धमाक्याच्या आणि साई सुदर्शनच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ गड्यांनी पराभव केला. या दणदणीत विजयासह गुजरातने आयपीएल २०२६ च्या अंतिम फेरीत (फायनल) दिमाखात प्रवेश केला आहे. राजस्थान रॉयल्सने विजयासाठी दिलेले २१९ धावांचे मोठे आव्हान गुजरातने अवघ्या १८.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
राजस्थानच्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने अत्यंत स्फोटक सुरुवात केली. सलामीवीर साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी राजस्थानच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी अवघ्या ७७ चेंडूत १६७ धावांची भक्कम भागीदारी रचली. साई सुदर्शनने ३२ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. तो ‘हिट विकेट’ होऊन बाद झाला.
दुसऱ्या बाजूने कर्णधार शुभमन गिलने राजस्थानच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. त्याने अवघ्या ५३ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि ३ गगनभेदी षटकार ठोकून १०४ धावांची उत्कृष्ट शतकी खेळी केली. या शतकी खेळीमुळे गुजरातचा विजय सुकर झाला. जोफ्रा आर्चरने गिलला बाद करत राजस्थानला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने ९ चेंडूत १६ धावा केल्या.
अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवतियाने ९ चेंडूत १७ धावा (२ चौकार, १ षटकार) आणि जोस बटलरने (९ धावा) नाबाद राहत १८.४ षटकांतच गुजरातला ७ गड्यांनी विजय मिळवून दिला.
गुजरातच्या फलंदाजांसमोर राजस्थानची बलाढ्य गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. जोफ्रा आर्चरने ४ षटकांत ४५ धावा देऊन १ बळी घेतला, तर नांद्रे बर्गरने ४ षटकांत ३५ धावा देत १ गडी बाद केला. ब्रिजेश शर्माने ३.४ षटकांत ४४ धावा मोजून १ बळी मिळवला.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानने १७.२ षटकांत ६ बाद १७२ धावा करत मजबूत धावसंख्या उभारली आहे.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल केवळ १ धाव करून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ ध्रुव जुरेलही अवघ्या ७ धावा करून कागिसो रबाडाचा बळी ठरला. राजस्थानने अवघ्या ९ धावांवर आपले २ महत्त्वाचे फलंदाज गमावले होते.
२ गडी लवकर गमावल्यानंतर तरुण सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. वैभव सूर्यवंशीने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत अवघ्या ४७ चेंडूत ८ चौकार आणि ७ गगनभेदी षटकारांच्या मदतीने ९६ धावांची तुफानी खेळी केली. त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले असले, तरी त्याने संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्याला रवींद्र जडेजाने उत्तम साथ दिली. जडेजाने ३० चेंडूत ४१ धावा करत एका बाजूने खिंड लढवून ठेवली आहे.
कर्णधार रियान पराग (११ धावा) आणि दासुन शनाका (३ धावा) यांना जेसन होल्डरने झटपट बाद करून राजस्थानला मोठे झटके दिले. तर जोफ्रा आर्चर ७ धावा करून प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला. 
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीला आणि मधल्या षटकांमध्ये चांगला अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. जेसन होल्डरने ४ षटकांत २७ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. कागिसो रबाडाने ३.२ षटकांत ३१ धावा देऊन २ गडी बाद केले. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला. रशीद खान आज महागडा ठरला, त्याने आपल्या एकमेव षटकात १८ धावा दिल्या.