लखनौचा पराभव करत राजस्थान रॉयल्स प्ले-ऑफच्या शर्यतीत

जयपूर : १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या ७ चौकार आणि तब्बल १० षटकारांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ७ गडी राखून निर्णायक विजय मिळवला. वैभवचे या हंगामातील दुसरे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले असले, तरी त्याची ९३ धावांची ही वादळी खेळी लखनौने दिलेले विशाल आव्हान मोडून काढण्यासाठी पुरेशी ठरली. या विजयासह राजस्थानने आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली असून, आपले प्ले-ऑफचे आव्हान जिवंत ठेवले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौने ५ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला होता. लखनौची सुरुवात खराब झाली असली, तरी जॉश इंग्लिस आणि मिचेल मार्श यांनी संघाचा डाव सावरला. इंग्लिसने २९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६० धावा कुटल्या.
दुसऱ्या बाजूने मिचेल मार्शने ५७ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह ९६ धावांची उत्कृष्ट खेळी केली. मात्र, दुर्दैवाने तो शेवटच्या षटकात धावचीत झाला आणि सलग दुसऱ्या सामन्यात त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. कर्णधार रिषभ पंतने २३ चेंडूंत ३५ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून यश राज पुंजाने २ विकेट्स घेतल्या.
जैस्वालची आक्रमक सुरुवात
२२१ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात २३ धावा ठोकून आपले इरादे स्पष्ट केले होते. तो २३ चेंडूंत ४३ धावा करून बाद झाला. त्याने वैभव सूर्यवंशीसोबत ७५ धावांची सलामी दिली.
वैभव-ध्रुवची शतकी भागीदारी
त्यानंतर मैदान गाजवले ते वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांनी. दोघांनी अवघ्या ४५ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी रचली. १४ व्या षटकात लखनौच्या मोहसिन खानला वैभवला (९२ धावांवर असताना) धावचीत करण्याची सोपी संधी मिळाली होती, परंतु घाईगडबडीत डायरेक्ट हिट मारण्याच्या नादात त्याने ती संधी गमावली. या जीवदानाचा फायदा घेत वैभवने धावसंख्या पुढे नेली, पण अखेर मोहसिननेच त्याला ३८ चेंडूंत ९३ धावांवर झेलबाद केले. वैभव बाद झाला तेव्हा राजस्थानला ३६ चेंडूंत ४१ धावांची गरज होती, जी नंतर सहज पूर्ण करण्यात आली.
ध्रुव जुरेलने एक बाजू लावून धरत ३७ चेंडूंत या हंगामातील आपले पाचवे अर्धशतक झळकावले. तो ३८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. तर डोनोव्हर फरेराने नाबाद १६ धावा करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
लखनौवर मिळवलेल्या या विजयामुळे राजस्थान रॉयल्सचे आता १४ गुण झाले असून ते चौथ्या स्थानावर आहेत. राजस्थानचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकल्यास राजस्थानचे १६ गुण होतील आणि ते अधिकृतपणे प्ले-ऑफमधील आपली जागा पक्की करतील.
वैभवने मोडले दिग्गजांचे विक्रम
* आयपीएलच्या एकाच हंगामात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वैभव ४२६ धावांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने ट्रॅव्हिस हेडचा (४०२ धावा, २०२४) विक्रम मोडला. (या यादीत डेव्हिड वॉर्नर ४६७ धावांसह, २०१६ अव्वल स्थानी आहे).
* आयपीएलच्या इतिहासात ३ वेगवेगळ्या डावांत १० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारण्याचा पराक्रम वैभवने केला आहे. त्याने अभिषेक शर्मा आणि फिन एलन (प्रत्येकी २ वेळा) यांना मागे टाकले असून आता तो ख्रिस गेलच्या (३ वेळा) बरोबरीत आला आहे.
* या हंगामात वैभवच्या नावावर आता ५३ षटकार झाले आहेत. त्याने आंद्रे रसेल (५२ षटकार, २०१९) आणि ख्रिस गेल (५१ षटकार, २०१३) यांचा रेकॉर्ड मोडला आहे. आता तो गेलच्या ५९ षटकारांच्या (२०१२) अगदी जवळ आहे.
* मिचेल मार्शचा ‘९०’ च्या घरातील दुर्दैवी विक्रम
या सामन्यात मिचेल मार्श ९६ धावांवर दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. एकाच आयपीएल हंगामात ९० ते ९९ धावांच्या दरम्यान सर्वाधिक वेळा बाद होण्याच्या बाबतीत तो ग्लेन मॅक्सवेलनंतर दुसऱ्या स्थानावर आला आहे. मॅक्सवेल २०१४च्या हंगामात ३ वेळा बाद झाला होता.
* आयपीएल इतिहासात नव्वदीत धावबाद झालेले खेळाडू
९२ धावा : मनविंदर बिसला (वि. चेन्नई सुपर किंग्स, २०१३)
९९ धावा : विराट कोहली (वि. दिल्ली कॅपिटल्स, २०१३)
९६ धावा : ख्रिस गेल (वि. कोलकाता नाईट रायडर्स, २०१५)
९० धावा : मिचेल मार्श (वि. चेन्नई सुपर किंग्स, २०२६)
९६ धावा : मिचेल मार्श (वि. राजस्थान रॉयल्स, २०२६)*
* लखनौसाठी सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज
४० षटकार : निकोलस पूरन (२०२५)
३७ षटकार : मिचेल मार्श (२०२५)
३६ षटकार : मिचेल मार्श (२०२६)*
३६ षटकार : निकोलस पूरन (२०२४)
३० षटकार : के.एल. राहुल (२०२२)