आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे पर्वरीत उद्घाटन

महिला-पुरुषांचे ७० हून अधिक संघ सहभागी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
21st May, 11:59 pm
आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे पर्वरीत उद्घाटन

पणजी : पुरुष व महिला क्रिकेट संघांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित आमदार चषक लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी संध्याकाळी पर्यटन व आयटी मंत्री तसेच पर्वरीचे आमदार रोहन अशोक खंवटे यांच्या हस्ते साल्वादोर द मुंद मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले.
ही स्पर्धा दिनांक २१ मे पासून सुरू झाली असून २४ मे पर्यंत याच मैदानावर खेळली जाईल. आमदार चषक स्पर्धेबाबत संपूर्ण मतदारसंघात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्वरी मतदारसंघातील ७० हून अधिक पुरुष व महिला संघ या लीग स्पर्धेत सहभागी झाले असून अंतिम सामने रविवार, २४ मे रोजी होतील.
या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य संदीप साळगावकर, अमित अस्नोडकर, सरपंच स्वप्नील चोडणकर, सोनिया पेडणेकर, पर्वरी भाजप मंडळ अध्यक्ष विनीत परब, पंच सदस्य, सहभागी संघ, क्रिकेटप्रेमी तसेच विविध मान्यवर आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेच्या औपचारिक प्रारंभाचा भाग म्हणून बुधवारी आर्ट पार्क, पर्वरी येथे स्पर्धेची अधिकृत ट्रॉफी आणि सहभागी संघांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला खेळाडू, समर्थक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यातून पर्वरीतील वाढती क्रीडा संस्कृती अधोरेखित झाली.
उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले की, आमदार चषक ही केवळ स्पर्धा नसून क्रीडाभावना, एकता आणि युवा प्रतिभेचा उत्सव आहे. खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींमध्ये दिसणारा उत्साह, पर्वरीत विकसित होत असलेल्या सशक्त क्रीडा संस्कृतीचे प्रतीक आहे.
पर्वरी रायझिंगच्या वतीने सर्व कर्णधार, खेळाडू, समर्थक आणि पर्वरीवासीयांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करणार असून संपूर्ण मतदारसंघात उत्साही क्रिकेटमय वातावरण निर्माण झाले आहे.