राजस्थान रॉयल्सचा प्लेऑफमध्ये धडाकेबाज प्रवेश!

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी लाजिरवाणा पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
24th May, 11:55 pm
राजस्थान रॉयल्सचा प्लेऑफमध्ये धडाकेबाज प्रवेश!

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२६ (आयपीएल) च्या बाद फेरीची तिकिटे निश्चित करणाऱ्या अत्यंत अटीतटीच्या आणि थरारक ६९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर म्हणजेच ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर ३० धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह राजस्थान रॉयल्सने १६ गुणांची कमाई करत प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा आणि अंतिम संघ म्हणून आपले स्थान पक्के केले. राजस्थानच्या या विजयामुळे प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत असलेल्या पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित २० ओव्हर्समध्ये ८ गडी गमावून २०५ धावांचा विशाल डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या ६० धावांच्या झुंजार खेळीनंतरही २० ओव्हर्समध्ये ९ गडी बाद केवळ १७५ धावांपर्यंतच मजल मारता आली.
२०६ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक झाली. राजस्थानच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर मुंबईची बलाढ्य अव्वल फळी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. मुंबईचा माजी कर्णधार आणि हुकमी एक्का रोहित शर्मा हा सामन्याच्या पहिल्याच षटकात शून्य (०) धावांवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. या धक्क्यातून मुंबईचा संघ सावरत नाही तोच दुसरा सलामीवीर रायन रिकल्टन अवघ्या १२ धावा करून बाद झाला. फॉर्मात असलेल्या नमन धीरला ६ धावांवर राजस्थानच्या गोलंदाजांनी बाद केले. तर, युवा फलंदाज तिलक वर्मा केवळ ३ धावा काढून स्वस्तात माघारी परतला. अवघ्या काही ओव्हर्समध्ये मुंबईची अवस्था ४ बाद ३० अशी बिकट झाली होती.
४ गडी लवकर बाद झाल्यानंतर मुंबईचा पराभव निश्चित मानला जात होता. मात्र, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स यांनी मिळून मुंबईचा डाव सांभाळला आणि राजस्थानच्या गोलंदाजांवर प्रतिआक्रमण करण्यास सुरुवात केली. दोघांनी मैदानाभोवती चौफेर फटकेबाजी करत महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या. धोकादायक ठरू पाहणारा विल जॅक्स वैयक्तिक ३३ धावांवर बाद झाला आणि ही जोडी तुटली. त्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पंड्याने १५ चेंडूंत ३४ धावांची आक्रमक खेळी करत सूर्यकुमारला चांगली साथ दिली. दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने वानखेडे स्टेडियम गाजवत आपले धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६० धावांची अप्रतिम खेळी करून मुंबईला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, राजस्थानच्या कल्पक गोलंदाजीसमोर त्याची ही झुंज अपयशी ठरली. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव घसरला आणि त्यांना ३० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. राजस्थानची सुरुवातही खराब झाली होती. आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वाल २७ धावांवर बाद झाला, तर युवा ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशी केवळ ४ धावा करून स्वस्तात माघारी परतला. दोन गडी लवकर गमावल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ध्रुव जुरेलने जबाबदारीने फलंदाजी करत ३८ धावांची उपयुक्त खेळी केली. रियान पराग १४ धावांवर बाद झाला. मात्र, दासून शनाका (२९ धावा) आणि डोनोवन फरेरा (१८ धावा) यांनी डाव पुढे नेला. अंतिम ओव्हर्समध्ये जोफ्रा आर्चरने फलंदाजीत आपली ताकद दाखवत ३२ धावांची मौल्यवान आणि स्फोटक खेळी केली. त्याला अष्टपैलू रवींद्र जडेजाने १९ धावा करत चांगली साथ दिली. या सांघिक कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २० ओव्हर्समध्ये ८ बाद २०५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले, जे अखेर विजयी ठरले.
अंतिम चार संघ निश्चित
आयपीएल २०२६ च्या यंदाच्या हंगामात शेवटच्या दिवसापर्यंत बाद फेरीत जाणारे ४ संघ कोणते, यावर सस्पेन्स कायम होता. रविवारच्या या अंतिम सामन्यावर राजस्थान, पंजाब आणि केकेआर या तिन्ही संघांचे भवितव्य अवलंबून होते. मुंबईने हा सामना जिंकला असता, तर समीकरणे बदलली असती. मात्र, मुंबईच्या पराभवामुळे राजस्थानने थेट प्लेऑफचे तिकीट मिळवले. गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १८ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर १८ गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर १८ गुणांसह सनरायझर्स हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. या तिन्ही संघांमध्ये नेट रनरेटचा फरक आहे. तर १६ गुणांसह राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
‘प्लेऑफ’चे वेळापत्रक
क्वालिफायर १ सामना : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स
दिनांक व वेळ : २६ मे , संध्याकाळी ७.३० वा. स्थळ : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला
एलिमिनेटर सामना : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
दिनांक व वेळ : बुधवार, २७ मे, संध्याकाळी ७.३० वा. मैदान: मुल्लानपूर स्टेडियम, न्यू चंडीगड
क्वालिफायर २ सामना : क्वालिफायर १ मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरचा विजेता संघ
दिनांक व वेळ : शुक्रवार, २९ मे, संध्याकाळी ७.३० वा. मैदान: मुल्लानपूर स्टेडियम, न्यू चंडीगड
महाअंतिम सामना सामना : क्वालिफायर १ चा विजेता विरुद्ध क्वालिफायर २ चा विजेता
दिनांक व वेळ: रविवार, ३१ मे, संध्याकाळी ७.३० वा. मैदान: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
एकाही अर्धशतकाशिवाय २०० हून अधिक धावा केलेले संघ
२०७/६ - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई (वानखेडे स्टेडियम), २०२६
२०६/८ - पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर, २०२५
२०५/८ - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई (वानखेडे स्टेडियम), २०२६
२०१/८ - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, गुवाहाटी, २०२६
२००/७ - पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, अहमदाबाद, २०२४
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज
१९ - ग्लॅम मॅक्सवेल
१९ - रोहित शर्मा
१८ - दिनेश कार्तिक
१८ - सुनील नरेन
१६ - पियुष चावला
१६ - रशीद खान