श्रेयस अय्यरच्या झंझावाती शतकाने पंजाबचा दमदार विजय

लखनौवर ७ विकेट्सने मात : पंजाबच्या प्लेऑफच्या आशा कायम

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
23rd May, 11:59 pm
श्रेयस अय्यरच्या झंझावाती शतकाने पंजाबचा दमदार विजय

धर्मशाळा : आयपीएलमधील महत्त्वाच्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने लखनौ सुपर जायंट्सवर सात विकेट्सने शानदार विजय मिळवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यर याने नाबाद शतक झळकावत संघाला १८ षटकांत ३ बाद २०० धावांपर्यंत पोहोचवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद शमीने पंजाबला २२ धावांवर २ धक्के दिले. प्रियांश आर्याचा शून्यावर अर्जुनने झेल टिपला, तर कूपर कॉनली (१८) त्रिफळाचीत झाला. प्रभसिमरन सिंगला २० धावांवर अर्जुन तेंडुलकरने झेलबाद केलेच होते, परंतु रिषभ पंतने झेल टाकला. त्याच प्रभसिमरनने अर्धशतक झळकावून कर्णधार श्रेयस अय्यरसह शतकी भागीदारी केली.
श्रेयसनेही ३३ चेंडूंत पन्नास धावा पूर्ण केल्या, परंतु १४ व्या षटकात प्रिंस यादवला गोलंदाजीला आणण्याचा डाव यशस्वी ठरला असता. प्रभसिमरन ३४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांवर बाद झाला होता, परंतु आयुष बदोनीने टिपलेला चेंडू जमिनीवर टेकल्याने तिसऱ्या अम्पायरने नाबाद निर्णय दिला. अर्जुनने त्याच्या तिसऱ्या षटकात भन्नाट यॉर्कवर अखेर प्रभसिमरनला पायचित करून विकेट मिळवली. पंजाबचा फलंदाज ३९ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६९ धावांवर बाद झाला आणि श्रेयससह त्याची ७६ चेंडूंत १४० धावांची भागीदारी तुटली.
पंजाबला आता ३० चेंडूंत ३५ धावा करायच्या होत्या आणि श्रेयसने हात मोकळे करताना शमीच्या षटकात २० धावा कुटल्या. अर्जुनने पाच धावा देऊन, त्याची स्पेल ४-०-३६-१ अशी संपवली. श्रेयसने ५१ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह आयपीएलमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. नाबाद १०१ धावांसह त्याने पंजाबला १८ षटकांत ३ बाद २०० धावा करून विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी पंजाबविरुद्ध प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर लखनौने निर्धारित २० षटकांत ६ बाद १९६ धावांचा डोंगर उभारला आहे. लखनौची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अर्शिन कुलकर्णी पहिल्याच षटकात शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरनलाही (२) मार्को जानसेनने लवकर बाद केले. मात्र, एका बाजूने जोश इंग्लिसने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेणे सुरूच ठेवले. त्याने अवघ्या ४४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची उत्कृष्ट खेळी केली.
जोश इंग्लिस बाद झाल्यानंतर आयुष बदोनीने सामन्याची सूत्रे हाती घेतली. बदोनीने पंजाबच्या गोलंदाजांवर प्रतिआक्रमण करत अवघ्या १८ चेंडूंत ५ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांसह २३८.८९ च्या स्ट्राईक रेटने ४३ धावा ठोकल्या. कर्णधार ऋषभ पंतने २२ चेंडूंत २६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये अब्दुल समदने २० चेंडूंत नाबाद ३७ धावा (३ चौकार, ३ षटकार) कुटून लखनौला पावणेदोनशेच्या पार पोहोचवले. अर्जुन तेंडुलकर ५ धावांवर नाबाद राहिला.
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना सुरुवातीला धावा रोखण्यात अपयश आले असले, तरी फिरकीपटू युझवेंद्र चहलने महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. चहलने ४ षटकांत आयुश बदोनी आणि कर्णधार ऋषभ पंतला बाद करत २ बळी घेतले. वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने देखील दोन गडी बाद केले. तर अझमतुल्ला ओमरझाई आणि शशांक सिंग यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
श्रेयस अय्यरचे पहिले आयपीएल शतक
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा फटकावत आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीमुळे पंजाबने सहज विजय मिळवला.

आयपीएल पदार्पणाच्या हंगामात
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

६१६ : शॉन मार्श (पंजाब किंग्स, २००८)
४९१ : कूपर कॉनोली (पंजाब किंग्स, २०२६)*
४७५ : प्रियांश आर्य (पंजाब किंग्स, २०२५)
४७३ : देवदत्त पडिक्कल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०२०)
४३९ : श्रेयस अय्यर (दिल्ली डेअरडेव्हिल्स, २०१५)

पंजाबकडून ५०+ धावा
सर्वाधिक वेळा देणारे गोलंदाज

७ वेळा : अर्शदीप सिंग
४ वेळा : सॅम करन
३ वेळा : कागिसो रबाडा
३ वेळा : मोहम्मद शमी
३ वेळा : झेवियर बार्टलेट

संक्षिप्त धावफलक
लखनौ : २० षटकांत ६ बाद १९६ धावा
पंजाब : १८ षटकांत ३ बाद २०० धावा
सामनावीर : श्रेयस अय्यर