दामोदर स्पोर्ट्स क्लबतर्फे फातोर्डा स्टेडियममध्ये आयोजन

मडगाव : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मडगाव येथील दामोदर स्पोर्ट्स क्लबचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त क्लबतर्फे रविवार दि. २४ मे रोजी फातोर्डा येथील एसएजी इनडोअर स्टेडियममध्ये अखिल गोवा पुरुष कबड्डी स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले आहे. वी फॉर फातोर्डा यांच्या सहकार्याने आणि द स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा तसेच गोवा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही भव्य स्पर्धा होणार असल्याची माहिती क्लबचे सचिव मोहन प्रभुदेसाई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत हे सामने खेळवले जातील. स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामने हे कृत्रिम प्रकाशझोत अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅट्सवर खेळवले जाणार आहेत. गोव्यातील नामांकित संघ या स्पर्धेत विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार असल्याने क्रीडाप्रेमींना अटीतटीचे सामने पाहायला मिळतील. या स्पर्धेला राज्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख आणि आकर्षक फिरता चषक देऊन गौरविण्यात येईल. उपविजेत्या संघाला ३१ हजार रुपये रोख आणि चषक मिळणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैयक्तिक खेळाडूंनाही रोख बक्षिसे व चषक देऊन सन्मानित करण्यात येईल.
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल. याप्रसंगी 'एसएजी'चे सहाय्यक संचालक राजेश नाईक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर रात्री होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभाला आमदार विजय सरदेसाई मुख्य अतिथी म्हणून आणि 'एसएजी'चे खजिनदार विनय तुबकी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहून विजेत्यांना पुरस्कृत करतील.
क्लबचे सचिव मोहन प्रभुदेसाई यांनी गोव्यातील तमाम कबड्डी शौकिनांना या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ५० वर्षांचे भरीव योगदान
दामोदर स्पोर्ट्स क्लबने गेल्या ५० वर्षांत गोव्यात कबड्डी, हँडबॉल, ज्युडो, कुस्ती, बॉडीबिल्डिंग, क्रिकेट, अॅथलेटिक्स आणि मल्लखांब यांसारख्या खेळांच्या प्रसारासाठी मोठे योगदान दिले आहे. क्लबने आजवर अनेक उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा संघटक, पीई शिक्षक आणि प्रशिक्षक घडवले आहेत, जे आज क्रीडा खाते, गोवा विद्यापीठ, विविध महाविद्यालये आणि शाळांमध्ये सेवा बजावत आहेत. क्लबच्या नावावर ५ राज्य क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. हे सुवर्ण महोत्सवी वर्ष अधिक संस्मरणीय करण्यासाठी क्लबतर्फे वर्षभर कबड्डी, हँडबॉल आणि बॉडीबिल्डिंगच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.