राजस्थानचा हैदराबादवर ४७ धावांनी विजय : आता गाठ गुजरातशी

मुल्लानपूर : वैभव सूर्यवंशीच्या वादळी ९७ धावांच्या जोरावर पहिल्या डावात २४३ धावांचा डोंगर उभारणाऱ्या राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या डावातही आपले वर्चस्व कायम राखले. सनरायझर्स हैदराबादचा डाव १९६ धावांवर रोखत राजस्थानने ‘एलिमिनेटर’ सामना ४७ धावांनी जिंकला. आता क्वालीफायर २ सामन्यात राजस्थानचा सामना २९ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार असून हा सामना याच मैदानावर खेळविण्यात येणार आहे.
२४४ धावांच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. हैदराबादचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत १९६ धावाच करू शकला आणि राजस्थान रॉयल्स ४७ धावांनी विजयी झाला.
हैदराबादतर्फे नितीश कुमार रेड्डी ३८ धावा (२० चेंडू), सलील अरोरा ३५ धावा (२१ चेंडू) आणि इशान किशनने ३३ धावा (११ चेंडू) काहीशी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने ४ षटकांत ५८ धावा देत ३ बळी, रवींद्र जडेजाने ३ षटकात २१ धावा देत २ बळी आणि सुशांत मिश्रा २.२ षटकांत २१ धावा देत २ बळी घेतले.हैदराबादने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, जो वैभवने पूर्णपणे चुकीचा ठरवला. त्याने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि १२ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने तब्बल ९७ धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले असले, तरी या डावात त्याने ख्रिस गेल, सुरेश रैना आणि डेव्हिड वॉर्नर यांचे अनेक वर्षांपूर्वीचे जागतिक विक्रम उद्ध्वस्त केले.
राजस्थान रॉयल्सने २० षटकात ८ बाद २४३ धावांचा डोंगर उभा केला. वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूत ५ चौकार, १२ षटकारांच्या मदतीने ९७ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ५० धावा (२१ चेंडू), तर यशस्वी जैस्वालने २९ धावांचे (२९ चेंडू) योगदान दिले. हैदराबादकडून प्रफुल हिंगेने ४ षटकात ५४ धावा देऊन ३ बळी घेतले.
वैभवने अवघ्या १६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने आयपीएल प्ले-ऑफ/नॉकआऊटच्या इतिहासात सर्वांत वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या सुरेश रैनाच्या २०१४ मधील विक्रमाची बरोबरी केली.
ख्रिस गेलचा १४ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत
वैभवने चालू हंगामात आपल्या षटकारांची संख्या तब्बल ६५ वर पोहोचवली आहे. यासह त्याने ख्रिस गेलचा २०१२ मधील एकाच हंगामात सर्वाधिक ५९ षटकार मारण्याचा ऑल-टाइम रेकॉर्ड मोडला.
डेव्हिड वॉर्नरचा १० वर्षांपूर्वीच्या विक्रमचा धुरळा
वैभव सूर्यवंशी आता आयपीएलच्या एकाच हंगामात पॉवरप्लेमध्ये (पहिली ६ षटके) सर्वाधिक धावा करणारा जगातील नंबर १ फलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचा २०१६ मधील ४६७ धावांचा विक्रम मागे टाकला.
सनथ जयसूर्याचा १८ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड उद्ध्वस्त
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिल्या ६ ओव्हर्सचा खेळ संपला, तेव्हा वैभवच्या बॅटमधून तब्बल ८ षटकार पाहायला मिळाले. यासह त्याने आयपीएलच्या इतिहासात एकाच डावात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्याचा २००८ मधील ७ षटकारांचा विक्रम मोडीत काढला.