४८ संघ, १०४ सामने : तीन देशांचे संयुक्त यजमानपद

न्यू याॅर्क : जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात होत असून १९ जुलैपर्यंत हा फुटबॉलचा महाकुंभ रंगणार आहे. यंदाची स्पर्धा अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश संयुक्तपणे यजमानपद भूषवत असून स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदाच एकापेक्षा अधिक देश यजमान म्हणून एकत्र आले आहेत.
यंदाच्या स्पर्धेत तब्बल ४८ संघ सहभागी होत असून एकूण १०४ सामने खेळवले जाणार आहेत. सुमारे १,२४८ खेळाडू या स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे फुटबॉलप्रेमींसाठी पुढील एक महिना रोमांचक ठरणार आहे.
यंदाच्या विश्वचषकात काही नवोदित संघ इतिहास रचणार आहेत. केप व्हर्डे, कुरासाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान हे संघ प्रथमच फिफा विश्वचषकात सहभागी होत आहेत. या संघांच्या कामगिरीकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
उद्घाटन सामना मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका
फिफाने यंदा तीन वेगवेगळ्या देशांत स्वतंत्र उद्घाटन समारंभ आयोजित केले आहेत. मेक्सिको येथे ११ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता, कॅनडा (टोरोंटो) येथे १२ जून, रात्री ११ वाजता आणि अमेरिका (लॉस एंजेलिस) येथे १३ जून, पहाटे ५ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे.
मेक्सिकोतील उद्घाटन सोहळ्यात ग्रॅमी पुरस्कार विजेता प्रसिद्ध पॉप बँड ‘माना’ विशेष सादरीकरण करणार आहे. याशिवाय शकीरा, जे बाल्विन, रायन कॅस्ट्रो, बर्ना बॉय, बेलिंडा, लीला डाउन्स आणि लॉस एंजेल्स अझुलेस यांसारखे आंतरराष्ट्रीय कलाकारही सहभागी होणार आहेत.
कॅनडातील समारंभात प्रसिद्ध गायिका अॅलनिस मॉरिसेट, अलेसिया कारा, जेसी रेयेज, मायकेल बुब्ले, नोरा फतेही आणि इतर कलाकार रंगत वाढवतील. तसेच अभिनेता व विनोदी कलाकार विल आर्नेट चाहत्यांचे स्वागत करणार आहेत. अमेरिकेतील उद्घाटन सोहळ्यात जागतिक ख्यातीची गायिका केटी पेरी आणि लोकप्रिय रॅपर फ्युचर यांचे विशेष सादरीकरण होणार आहे.
भारतात कुठे पाहता येणार सामने?
भारतात फिफा विश्वचषक २०२६ चे थेट प्रक्षेपण युनाइट ८ स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. युनाइट ८ स्पोर्ट्स १ (हिंदी समालोचन), युनाइट ८ स्पोर्ट्स १ एचडी, युनाइट८ स्पोर्ट्स २ (इंग्रजी समालोचन), युनाइट८ स्पोर्ट्स २ एचडी वर थेट प्रक्षेपण होणार आहे. फुटबॉल चाहत्यांना सर्व सामने झी५ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येणार आहेत. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवरून चाहत्यांना स्पर्धेतील प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येणार आहे.
फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी
तीन देशांचे यजमानपद, ४८ संघांचा सहभाग, १०४ सामन्यांची रेलचेल आणि जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंची उपस्थिती यामुळे फिफा विश्वचषक २०२६ हा आतापर्यंतच्या सर्वात भव्य स्पर्धांपैकी एक मानला जात आहे. पुढील महिनाभर जगभरातील फुटबॉल चाहत्यांवर या स्पर्धेचीच मोहिनी राहणार आहे.
स्पर्धेचा पहिला सामना मेक्सिको सिटीतील एस्टाडिओ बॅनॉर्टे स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. यजमान मेक्सिकोचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार असून भारतीय वेळेनुसार हा सामना १२ जूनच्या पहाटे पाहता येणार आहे.
अर्जेंटिना, फ्रान्स आणि पोर्तुगालकडे विशेष लक्ष
गतविजेता अर्जेंटिना विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. तर फ्रान्स संघ मागील अंतिम सामन्यातील पराभवाची भरपाई करण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे पोर्तुगाल संघालाही विश्वविजेतेपदाची आशा असून दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याला संस्मरणीय निरोप देण्याचे लक्ष्य संघासमोर असेल.