तीन नावे शर्यतीत, संजू सॅमसनला मुख्य प्रशिक्षक गंभीरचा पाठिंबा

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या टी-२० संघात सध्या मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. गेल्या १८ महिन्यांतील टी-२० क्रिकेटमधील अत्यंत निराशाजनक कामगिरी पाहता निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने अखेर कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून अधिकृतपणे हटवण्यात येणार असून, त्याचे संघातील स्थानही आता धोक्यात आले आहे. मात्र, सूर्यकुमारच्या गच्छंतीनंतर भारतीय संघाची धुरा कोणाकडे सोपवायची, यावरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि वरिष्ठ निवड समिती यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. निवड समिती दीर्घकालीन भविष्याचा विचार करत असतानाच, गौतम गंभीरने एका वेगळ्याच खेळाडूचे नाव पुढे केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून पायउतार करण्यासाठी केवळ त्याचे नेतृत्व नव्हे, तर गेल्या दीड वर्षातील त्याची वैयक्तिक घसरलेली कामगिरी मुख्य कारण ठरली आहे. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचा संयम आता संपला असून, आगामी महत्त्वाच्या दौऱ्यांपूर्वी संघात मोठे फेरबदल करण्याचे निश्चित झाले आहे. सूर्याला केवळ कर्णधारपदावरूनच नाही, तर टी-२० च्या अंतिम ११ खेळाडूंच्या संघातूनही वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात मजबूत आणि अनुभवी दावेदार म्हणून श्रेयस अय्यरचे नाव अग्रस्थानी मानले जात आहे. डिसेंबर २०२३ नंतर अय्यरने भारतीय संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही, ही वस्तुस्थिती असली, तरी त्याच्या आयपीएलमधील नेतृत्वगुणांची सातत्याने प्रशंसा केली जाते. श्रेयस अय्यरने गेल्या तीन आयपीएल हंगामांत दोन वेगवेगळ्या संघांना (दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स) अंतिम फेरीत पोहोचवले आहे. विशेषतः २०२४ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरले होते.
परंतु, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे श्रेयस अय्यरला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यास अनुकूल नसल्याचे सूत्रांकडून समजते. २०२४ च्या आयपीएलमध्ये गंभीर हा केकेआर संघाचा मार्गदर्शक होता आणि अय्यर कर्णधार होता. केकेआरने आयपीएल जिंकल्यानंतरही विजेतेपदामध्ये माझ्या कर्णधारपदाच्या आणि फलंदाजीच्या योगदानाला पुरेसे महत्त्व मिळाले नाही, अशी उघड नाराजी श्रेयस अय्यरने सार्वजनिकपणे व्यक्त केली होती. या अंतर्गत वादाची पार्श्वभूमी पाहता, गंभीर आता अय्यरच्या नावावर पूर्णपणे समाधानी नाही.
गंभीरचा संजू सॅमसनला थेट पाठिंबा
बीसीसीआय आणि क्रीडा वर्तुळातील विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरने श्रेयस अय्यर किंवा इतर कोणत्याही नावाऐवजी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याच्या नावाचा प्रस्ताव निवड समितीसमोर ठेवला आहे. गंभीरच्या या भूमिकेमागे संजू सॅमसनची यंदाच्या टी-२० विश्वचषकातील अद्भूत आणि मॅच-विनिंग कामगिरी कारणीभूत आहे. संजू सॅमसनने विश्वचषकात मिळालेल्या संधीचे सोने करत अवघ्या ५ डावांमध्ये तब्बल ३२१ धावा कुटल्या होत्या. या संपूर्ण स्पर्धेत त्याची फलंदाजीची सरासरी ८०.२५ तर स्ट्राईक रेट तब्बल १९९.३७ इतका विध्वंसक होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, विश्वचषकाच्या बाद फेरीतील सलग तीन अत्यंत दबावाच्या सामन्यांमध्ये सॅमसनने सलग तीन अर्धशतके झळकावून भारताला विश्वविजेते बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. संजूचा हाच आक्रमक दृष्टिकोन आणि आयपीएलमधील कर्णधारपदाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन गंभीर त्याला भारतीय टी-२० संघाचा नवा सेनापती बनवण्यासाठी आग्रही आहे.
निवडकर्त्यांची पहिली पसंती तिलक वर्मा
दुसरीकडे, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भविष्यातील दूरगामी नियोजन करत आहे. निवड समितीतील बहुतांश सदस्यांचा कल युवा फलंदाज तिलक वर्मा याच्याकडे आहे. तिलक वर्माचे वय कमी असून, त्याच्याकडे पुढील ५ ते ७ वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, निवड समितीने तिलक वर्माच्या नेतृत्वगुणांची आणि दबावातील कामगिरीची चाचणी घेण्यासाठीच त्याला आगामी श्रीलंका दौऱ्यावरील भारत ‘अ’ संघाचा कर्णधार बनवले आहे. तिथे त्याची कामगिरी कशी राहते, यावर बरेच काही अवलंबून असेल. निवडकर्त्यांच्या मते, जर आत्ताच एका युवा खेळाडूला तयार केले, तर आगामी दोन-तीन विश्वचषक स्पर्धांसाठी भारताला एक स्थिर कर्णधार मिळू शकेल.
शनिवारच्या बैठकीत होणार अंतिम फैसला
आगामी अफगाणिस्तानविरुद्धची मालिका, यूके (इंग्लंड) दौरा आणि एशियन गेम्स २०२६ या तिन्ही अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धांसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी शनिवारी निवड समितीची अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात टी-२० कर्णधारपदाच्या नावावर एकमत घडवून आणण्याचे मोठे आव्हान बीसीसीआयसमोर असणार आहे. गंभीर आपल्या संजू सॅमसन या नावावर ठाम राहतो की निवडकर्ते तिलक वर्मा किंवा श्रेयस अय्यर यांच्या नावावर गंभीरला राजी करतात, याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे डोळे लागले आहेत.