भारतीय संघात निवड झालेला ठरला सर्वात तरुण खेळाडू : सूर्यकुमार यादवला डच्चू, श्रेयस अय्यरकडे नेतृत्व

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसह आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली असून, यादरम्यान क्रिकेट विश्वाचा थरकाप उडवणारे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याला संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या सर्वात मोठा धमाका ठरला आहे तो म्हणजे, अवघ्या १५ वर्षीय ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात झालेली निवड! या निवडीसह वैभवने ‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये जेव्हा पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले होते, तेव्हा त्याचे वय १६ वर्षे आणि २०५ दिवस इतके होते. गेल्या ३७ वर्षांपासून हा विक्रम अबाधित होता. मात्र, अवघ्या १५ वर्षे आणि ७१ दिवस वय असलेल्या वैभव सूर्यवंशीने भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवून सचिनचा हा प्रदीर्घ काळाचा विक्रम मोडीत काढला. भारतीय पुरुष क्रिकेट संघात निवड झालेला तो आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीच्या या ऐतिहासिक निवडीचा पाया आयपीएल २०२६ च्या हंगामात रचला गेला. या हंगामातील १६ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ४८.५० च्या सरासरीने तब्बल ७७६ धावा ठोकल्या. विशेष म्हणजे, संपूर्ण हंगामात त्याचा स्ट्राईक रेट २३७.३० चा राहिला. वैभवने आयपीएलमध्ये ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही मोडीत काढला. वैभवने या मोसमात विक्रमी ७२ षटकार खेचले. या अद्भूत कामगिरीमुळेच त्याला भारतीय संघात घेण्याची मागणी क्रीडा जगतातून जोर धरू लागली होती.
वैभवच्या निवडीवर शिक्कामोर्तब करताना बीसीसीआयचे मुख्य निवडक अजित आगरकर म्हणाले, वैभव सूर्यवंशीने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची दमदार कामगिरी केली आहे, त्याने आम्हाला विचार करण्यास आणि त्याला संघात स्थान देण्यास भाग पाडले. मला त्याचे वय माहीत आहे, त्याला ही संधी खूप लवकर मिळाली आहे, यात शंका नाही, पण त्याची गुणवत्ता नाकारता येणारी नाही.
या संघ निवडीत निवड समितीने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. टी-२० फॉरमॅटमधील भारताचा हुकमी एक्का सूर्यकुमार यादवला संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करेल, तर फॉर्मात असलेल्या तिलक वर्माला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. संघात संजू सॅमसन आणि इशान किशनच्या रूपाने दोन यष्टीरक्षक फलंदाज असून, फिरकीची धुरा वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई सांभाळणार आहेत.
आयर्लंड आणि इंग्लंड टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.