कुठे गेले माझे हिराण्णा, राम आणि लक्ष्मण...

नदीत बुडून मरण पावलेल्या युवकांचे पार्थिव पाहून मातेने फोडला हंबरडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
42 mins ago
कुठे गेले माझे हिराण्णा, राम आणि लक्ष्मण...

वास्को : दूधसागर नदीत बुडून मरण पावलेल्या हिराण्णा, रामाण्णा व लक्ष्मण यांचे पार्थिव नवेवाडे येथे रविवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान आणल्यावर त्यांच्या आईने काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचे मनही हेलकावले. काहीजणांचे डोळे पाणावले. नवेवाडेच्या चाळीसमोर काही वेळ त्यांचे पार्थिव तेथील नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवल्यावर खारीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवेवाडे येथील विजय साजिली याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे.


दूधसागर नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पाचपैकी चारजण शनिवार, दि. १३ रोजी सकाळी बुडाले होते. त्यामध्ये हिराण्णा मदार (२१), रामाण्णा मदार (१९), लक्ष्मण मदार (१९) हे तीन सख्खे भाऊ मरण पावले होते. त्यापैकी रामाण्णा व लक्ष्मण हे जुळे होते. नवेवाडे येथे राहणारा विजय साजिली (२०) हा त्यांचा मित्रही त्यांच्यासह बुडाला होता. राहुल हरिजन (२०) हा सुदैवाने बचावला. हिराण्णा, रामाण्णा, लक्ष्मण व विजय यांच्या मृतदेहांची चिकित्सा करण्यात आल्यावर पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.


हिराण्णा, रामाण्णा व लक्ष्मण यांचे पार्थिव घेऊन दोन शववाहिका नवेवाडेत आल्या. त्यांच्या घरापर्यंत शववाहिका नेणे शक्य नसल्याने त्या शववाहिका तेथील चाळीसमोर ठेवण्यात आल्या. यावेळी त्यांच्या नातेवाईक, शेजारीपाजारी तसेच इतर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आपल्या तीनही मुलांचे पार्थिव पाहताच त्यांच्या आईने मोठा हंबरडा फोडला. ती या घटनेबद्दल देवाला जाब विचारत होती.


खारीवाडा येथे पार्थिव आणल्यावर तेथे त्या तिघांचे वडील पारशू मदार यांनी अंत्यसंस्कार केले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना आपले अश्रू आवरता आले नाही. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हेही वाचा