विधानसभेचा आखाडा : कळंगुट

गोवन वार्ता
म्हापसा : कळंगुट मतदारसंघ राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांचा सत्ता असलेला मतदारसंघ. आमदार मायकल लोबो यांनी या मतदारसंघात हॅट् ट्रीक साधण्याची किमया केली आहे. मात्र दोन पक्षांच्या तिकिटांवर. आगामी विधानसभा निवडणुकीत लोबो यांना शह देण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न चालवला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांची एकजूट झाल्यास कळंगुटची निवडणूक रंगतदार ठरेल.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यास विद्यमान आमदार मायकल लोबो इच्छुक आहेत. या तिकिटावर त्यांचाच दावा आहे. गेल्या वेळी दोनवेळा आमदार बनवलेल्या भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. भाजपचे पराभूत उमेदवार कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा यांचेही भाजपच्या उमेदारीवर लक्ष आहे. गेल्यावेळी प्रमाणे यावेळी लोबो भाजपसोबत बंड करण्याची शक्यता कमी असल्याने सिक्वेरा यांनी सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’ भूमिका घेतली आहे. पंच गीता परब या भाजप तिकिटासाठी दावेदार आहेत. गोवा पंचायत महिला शक्ती अभियानाच्या उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्या भरीव सामाजिक कार्य करत आहेत.

लोबोंचा पराभव करण्यासाठी अनेकजण इच्छुक
काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, जिल्हा पंचायत सदस्य लॉरेन्स सिल्वेरा, विवेक डिसिल्वा, राजेंद्र कोरगावकर हे यंदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तसेच माजी उपसरपंच सुदेश मयेकर, हडफडे नागवाचे माजी सरपंच रोशन रेडकर हेही सध्या निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. मयेकर यांनी गेल्यावेळी आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. आमदार लोबोंसोबत मतभेद निर्माण होण्यासह बर्च क्लब दुर्घटनेमध्ये रोशन रेडकर यांना गोवल्याबद्दल त्यांचे समर्थक नाराज असून त्यांनी रेडकर यांच्याकडे निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. आपचे उत्तर गोवा पदाधिकारी मॅन्युअल कार्दोज पक्षाचे उमेदवार असतील. तर आरजीपीचा उमेदवार हा अद्याप निश्चित झालेला नाही. कळंगुटचे पंच तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शिरोडकर हेदेखील निवडणुकीची तयारी करत आहेत.
माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, सुदेश मयेकर व रोशन रेडकर हे या निवडणुकीमध्ये मायकल लोबो यांना शह देण्यासाठी एकत्रित येण्याची चिन्हे दिसत आहेत. या तिघांचाही त्यादृष्टीने संपर्क वाढला आहे. आरजीपीचे मार्सेलिनो गोन्साल्विस यांनी गत निवडणुकीत तिसरे स्थान मिळवले होते. त्यामुळे यावेळी पक्षातर्फे त्यांनाच मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
मतदारसंघातील प्रमुख समस्या
कांदोळी, कळंगुट, हडफडे-नागवा व पर्रा अशा चार गावांमध्ये विभागलेल्या कळंगुट मतदारसंघात मागील चार वर्षांत एकही मोठी प्रकल्प उभा राहिलेला नाही. या मतदारसंघात वीज आणि पाणी समस्या कायम आहे. पिळर्ण जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर कळंगुट मतदारसंघातील पाणी समस्या काहीअंशी सुटणार आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला असला तरी हा प्रश्न सुटलेला नाही. हा मतदारसंघ किनारी भागात येत असल्याने किनारपट्टीतील कचरा व्यवस्थान, अनैतिक व्यवहार, गुंडागर्दी, ध्वनिप्रदूषण, पर्यटक टॅक्सीवाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. मागील १० ते १२ वर्षांत येथील शेतजमिनी बुजवून बेकायदेशीररीत्या व्यावसायिक बांधकामे उभारण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
भाजप-काँग्रेस यांच्यात थेट लढाई
गोवा मुक्ती नंतरच्या सुरुवातीच्या काळात युनायटेड गोवन्स पार्टीचा या मतदारसंघावार दबदबा होता. हाच एकमेव पक्ष इथे हॅट् ट्रीक साधण्यात यशस्वी ठरलेला आहे. त्यानंतर चारवेळा काँग्रेस व प्रत्येकी दोनवेळा मगो आणि भाजपला हा मतदारसंघ मिळवता आला होता. यावेळी या मतदारसंघातील निवडणूक लढाई ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होण्याची शक्यता आहे.
कळंगुट मतदारसंघातील आमदार
१९६३ : जॉन डिसोझा (युनायटेड गोवन्स पार्टी)
१९६७ : वालेन्ते सिक्वेरा (युनायटेड गोवन्स पार्टी)
१९७२ : जगदीश राव (युनायटे गोवन्स पार्टी)
१९७७ : राऊल फर्नांडिस : महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९८० : व्हिल्फ्रेड डिसोझा (काॅंग्रेस)
१९८४ : श्रीकांत मळीक (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९८९ : सुरेश परूळेकर (काँग्रेस)
कळंगुट मतदारसंघातील विजयी व दुसऱ्या स्थानावर राहिलेले उमेदवार
१९९४ : तोमाझिन कार्दोज (काँग्रेस) ७,७१६, सुरेश परूळेकर (भाजप) ३,७६४ मते.
१९९९ : सुरेश परूळेकर (यूजीडीपी) ७,६७०, तोमाझिन कार्दोज (काँग्रेस) ६,९२१ मते.
२००२ : आग्नेल फर्नांडिस (काँग्रेस) ९,७११, सुरेश परूळेकर (भाजप) ७,६४१ मते.
२००७ : आग्नेल फर्नांडिस (काँग्रेस) ८,३१९ मते, जोजफ सिक्वेरा (यूजीडीपी) ५,५५८ मते.
२०१२ : मायकल लोबो (भाजप) ९,८९१, आग्नेल फर्नांडिस (काँग्रेस) ८,०२२ मते.
२०१९ : मायकल लोबो (भाजप) ११,१३६, जोजफ सिक्वेरा (काँग्रेस) ७,३११ मते.
२०२२ : मायकल लोबो (काँग्रेस) ९,२८५, जोजफ सिक्वेरा (भाजप) ४,३०६ मते.