अपघात झाल्यानंतर कार चालक फरार

म्हापसा : सावतावाडा बागा येथे भरधाव आय २० कारने स्कुटरला चुकीच्या दिशेने जाऊन धडक देत फरफटत नेल्याने झालेल्या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल केतन गावडे (२८, रा. कुंभारजुवे) याचा मृत्यू झाला. पर्यटन पोलीस विभागाशी संलग्न असलेला कॉन्स्टेबल ड्यूटी संपवून घरी जाताना काळाने त्याच्यावर घाला घातला. अपघातानंतर फरार झालेल्या साजिद शेख (रा. कोल्हापूर) याचा शोध कळंगुट पोलीस घेत आहेत.
अपघात रविवार, १४ रोजी पहाटे ४.११ वा. सुमारास सावतावाडा येथील कँडेलारिया चॅपेलजवळ घडला. कॉ. केतन गावडे हा कांदोळी समुद्रकिनारी सेवा बजावत होता. पहाटे ड्यूटी संपल्यानंतर आपल्या जीए ०५ एच ३००२ क्रमांकाच्या अॅक्टिव्हा स्कुटरने कळंगुटहून बागाच्या दिशेने जात होता. तर एमएच ०२ सीडी ५९६६ क्रमांकाची आय २० कार घेऊन संशयित आरोपी सादीक शेख हा बागाहून कळंगुटच्या दिशेने जात होता.
घटनास्थळी भरधाव कारवरील संशयिताचे नियंत्रण सुटले व समोरून येणाऱ्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. धडक बसल्यानंतर कारने सुमारे ५० मीटरवर दुचाकीसह चालकाला फरफटत नेले. नंतर रस्त्याच्या कडेला वीज खांबाला दोन्ही वाहने धडकली.
अपघातात पोलीस कॉन्स्टेबल गंभीर झाला. त्याला रुग्णवाहिकेतून प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथून त्याला पुढील उपचारार्थ गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना सकाळी त्याचे निधन झाले.
अपघात घडताच कार चालक सादीक शेख याने घटनास्थळावरून पळ काढला. कारमध्ये संशयिताचा एक मित्र व मैत्रिण होती. कोल्हापूरातील तिघेही मित्र मैत्रिण गेल्या ११ रोजी गोव्यात पर्यटनासाठी आले होते. कांदोळीतील एका व्हिलामध्ये ते उतरले होते. शनिवार, १३ रोजी रात्री त्यांनी घरी जाण्यासाठी हा व्हिला सोडला होता. नंतर ते रात्री बागा समुद्रकिनारी आले. तिथे त्यांनी मद्यप्राशन करत मौजमजा केली व पहाटे ते कळंगुटच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच कळंगुट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार साळगावकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत ढवळीकर हे करीत आहेत.
फरार चालकाची मित्र- मैत्रिण ताब्यात
फरार कार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत संशयित पोलिसांना सापडला नव्हता. पोलिसांनी संशयिताच्या मित्र -मैत्रिणीला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.