धारबांदोडा तालुक्यात दोन अपघातात दोघांचा मृत्यू, युवक गंभीर जखमी

विविध दुर्घटनांत दोन दिवसांत ६ जणांचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
धारबांदोडा तालुक्यात दोन अपघातात दोघांचा मृत्यू, युवक गंभीर जखमी

फोंडा : धारबांदोडा तालुक्यात रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक युवक गंभीर जखमी झाला. अनमोड घाटात ट्रक दरीत कोसळून सुदीप कापोझ (पश्चिम- बंगाल) या ट्रक चालकाचा मृत्यू झाला. तर धारबांदोडा येथे दोन मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत विजय चव्हाण (६९, पणसुले-धारबांदोडा) यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी चालक निखिल नाईक (डोंगरी) हा गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले. शनिवारी कुळे येथे ४ युवकांचा बुडून मृत्यू तर रविवारी दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे धारबांदोडा तालुक्यात दोन दिवसांत ६ जणांचा मृत्यूची नोंद झाली.

धारबांदोडा येथील चैतन्य पेट्रोल पंप समोरील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी ९.३० वा.च्या सुमारास स्कुटर व दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातात विजय चव्हाण याला पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकी चालक निखिल नाईक हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए-१२- बी - १०४९ क्रमांकाची स्कुटर घेऊन विजय चव्हाण हा धारबांदोडा येथे दूध खरेदी करण्यासाठी गेला होता. दूध घेऊन माघारी जात असताना त्याने पेट्रोल घालण्यासाठी स्कुटर उजव्या बाजूने वळविली. त्यावेळी समोरून येणाऱ्या जीए - ०७- एएम- १४७२ क्रमांकाच्या दुचाकीची धडक स्कुटरला बसली. यात दोघेही चालक रस्त्यावर कोसळून जखमी झाले. त्यांना पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. विजय चव्हाण याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अंजली धुळापकर, आशिष वेळीप, सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास भोमकर व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.

कुळे पोलीस हद्दीतील अनमोड घाटात शनिवारी रात्री रेतीवाहू ट्रक दरीत कोसळून सुदीप कापोझ (पश्चिम बंगाल) या चालकाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसामुळे अपघाताचा प्रकार उघडकीस आला. पोलीस कर्मचाऱ्याच्या हुशारीमुळे रेतीत गाढलेल्या चालकाचा शोध लागला.

रविवारी सकाळी कुळे पोलीस स्थानकाचे कर्मचारी अनमोड घाटात गस्त घालण्यासाठी गेले होते. सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप गावस, हवालदार दिनेश सातपालकर, तुळशीदास गावकर, चालक रामा दमेकर व गृहरक्षक बारकेलो गावकर यांचा समावेश होता. घाटात ट्रक दिसून आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अंदाजे ५० खोल दरीत उतरून ट्रक जवळ जात तपासणी केली. पण ट्रक चालक परिसरात आढळला नाही. सर्व रेती परिसरात पसरली होती. पसरलेल्या रेतीमध्ये पोलिसांना एक लाल रंगाचा कपडा दिसून आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी लाल कपड्याची तपासणी केली असता त्यात एक व्यक्ती असल्याचे आढळले. त्यांनी त्वरित फोंडा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा करण्यात आला.

रायडर्सना बंदी घालण्याची मागणी

धारबांदोडा भागातून दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को व अन्य भागातील रायडर्स सुसाट वेगाने धावतात. दोन वर्षांपूर्वी धारबांदोडा येथील धोकादायक जंक्शन जवळ सुद्धा रायडर्स मुळे अपघातात स्थानिक युवकांचा बळी गेला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा दुसरी घटना घडली. या भागातून रायडर्सना बंदी घालण्याची मागणी धारबांदोडा सरपंच दामोदर नाईक व पंच बालाजी उर्फ विनायक गावस यांनी सरकारकडे केली आहे. 

हेही वाचा