खारफुटीचा विध्वंस रोखण्याची गरज

आज काही जणांना खारफुटी म्हणजे रिकामी जमीन वाटत असेल, पण प्रत्यक्षात ती पूर, वादळ, किनारी धूप आणि हवामान बदलाविरुद्ध उभी असलेली नैसर्गिक भिंत आहे. ही भिंत कोसळू दिली तर त्याची किंमत संपूर्ण गोव्याला मोजावी लागेल.

Story: संपादकीय |
2 hours ago
खारफुटीचा विध्वंस रोखण्याची गरज

गोव्याची ओळख केवळ समुद्रकिनारे, पर्यटन आणि हिरवाई एवढीच नाही. गोव्याच्या नद्या, खाड्या आणि किनारी भागांमध्ये पसरलेल्या खारफुटी (मँग्रोव्ह) वनस्पती हे या भूमीचे खरे नैसर्गिक संरक्षण कवच आहे. मात्र अलीकडे मेरशी, मयडे आणि यापूर्वी कुडतरी, दिवाडी, कांदोळी तसेच पणजी आणि पाटो या भागांत मोठ्या प्रमाणावर खारफुटी नष्ट केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही, तर गोव्याच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषय आहे. खारफुटी ही खाऱ्या पाण्यात वाढणारी विशेष वनस्पती आहे. समुद्र आणि जमीन यांच्या मधल्या संक्रमण क्षेत्रात ती वाढते. तिची मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे धूप रोखली जाते, पूर आणि वादळांपासून संरक्षण मिळते आणि जैवविविधतेला आश्रय मिळतो. मासे, खेकडे, कोळंबी यांसारख्या अनेक सागरी जीवांचे हे नैसर्गिक प्रजनन केंद्र असते. त्यामुळे मत्स्यव्यवसायालाही खारफुटीचे मोठे योगदान आहे. अलीकडच्या काळात मेरशी आणि मयडे परिसरात मोठ्या प्रमाणावर खारफुटी कापल्याच्या आणि भराव टाकल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. काही ठिकाणी बांधकामे, रस्ते, व्यावसायिक प्रकल्प किंवा भू-रूपांतर करण्यासाठी खारफुटी हटविण्याचा प्रयत्न होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात भू-रूपांतरे होऊन बांधकामे होत असल्याबद्दल राज्यात आंदोलनाचे वातावरण तापले असतानाच, दुसरीकडे खारफुटी नष्ट करण्याचा सपाटा ज्या पद्धतीने सुरू आहे, ते पाहता प्रशासकीय यंत्रणा मुद्दामहून डोळेझाक तर करीत नाही ना, अशी शंका उत्पन्न होते. हा प्रकार केवळ काही झाडे तोडण्यापुरता मर्यादित नाही. एकदा खारफुटी नष्ट झाली की संपूर्ण परिसंस्था उद्ध्वस्त होते. अनेक पक्षी, मासे आणि इतर जीवांचे अधिवास नष्ट होतात. भविष्यातील पूर आणि पर्यावरणीय संकटांची बीजे त्यातून पेरली जातात.

विकासाची गरज कोणीही नाकारत नाही. रस्ते, पूल, घरे आणि उद्योग आवश्यक आहेत. पण विकासाचा अर्थ निसर्गाचा बळी देणे असा असू शकत नाही. आज जगभरातील विकसित देश खारफुटीचे संवर्धन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत, कारण हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर खारफुटी ही कार्बन शोषून घेणारी आणि किनारी भागांचे संरक्षण करणारी अत्यंत प्रभावी यंत्रणा मानली जाते. गोव्यात मात्र अनेकदा विकासाच्या नावाखाली अशा नैसर्गिक संपत्तीचा नाश होताना दिसतो. अल्पकालीन आर्थिक फायद्यासाठी दीर्घकालीन पर्यावरणीय नुकसान स्वीकारणे ही दूरदृष्टी नसल्याचे स्पष्ट होते. दरवर्षी पावसाळ्यात गोव्यात अनेक भाग जलमय होतात. शहरांत आणि गावांमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे खारफुटीचा नाश हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत. खारफुटी पावसाचे आणि भरतीचे पाणी नियंत्रित करते. ती नैसर्गिक स्पंजसारखे काम करते. जेव्हा ती नष्ट होते तेव्हा पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद होतो आणि पूरस्थिती निर्माण होते.

आज मेरशी किंवा मयडेतील खारफुटी कापली जात असेल तर त्याचे परिणाम उद्या संपूर्ण परिसराला भोगावे लागू शकतात. मेरशी येथील बायपासलगत असलेली खारफुटी कापण्यामागे कारण शोधण्याची नितांत गरज आहे. प्रत्यक्षात खारफुटी क्षेत्रांना विविध पर्यावरणीय कायद्यांद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. किनारी नियमन क्षेत्र नियमांनुसार अशा भागांमध्ये अनधिकृत हस्तक्षेपावर निर्बंध आहेत. तरीही जर मोठ्या प्रमाणावर खारफुटी नष्ट होत असेल, तर संबंधित यंत्रणांनी त्वरित चौकशी करणे आवश्यक आहे. मयडे येथील पाहणी संबंधित संस्थेने केली असली तरी राज्यात याचे प्रमाण मोठे आहे, त्यावर अंकुश कसा ठेवायचा याचा विचार व्हायला हवा. प्रश्न असा आहे की, हे सर्व प्रशासनाच्या नजरेआड कसे होते? स्थानिक नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जाते? दोषींवर कठोर कारवाई का होत नाही?

पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. स्थानिक नागरिक, ग्रामसभा, पर्यावरण संघटना आणि माध्यमांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. जेव्हा एखादे झाड तोडले जाते तेव्हा त्याची भरपाई करता येते. पण संपूर्ण खारफुटी परिसंस्था नष्ट झाली तर ती पुन्हा उभारण्यासाठी दशके लागतात. त्यामुळे नुकसान होण्यापूर्वीच प्रतिबंध करणे आवश्यक आहे. मेरशी, मयडे आणि इतर भागांतील खारफुटी नष्ट करण्याचे कोणतेही कारस्थान तातडीने हाणून पाडले पाहिजे. गोव्याच्या पर्यावरणाचा प्रश्न हा पक्षीय राजकारणाचा विषय नाही; तो भावी पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आज काही जणांना खारफुटी म्हणजे रिकामी जमीन वाटत असेल. पण प्रत्यक्षात ती पूर, वादळ, किनारी धूप आणि हवामान बदलाविरुद्ध उभी असलेली नैसर्गिक भिंत आहे. ही भिंत कोसळू दिली तर त्याची किंमत संपूर्ण गोव्याला मोजावी लागेल. म्हणूनच विकासाच्या नावाखाली चालणारा खारफुटीचा विध्वंस थांबवणे, दोषींवर कारवाई करणे आणि नष्ट झालेल्या भागांचे पुनरुज्जीवन करणे, ही काळाची गरज आहे. गोव्याच्या पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे गोव्याच्या भवितव्याचे रक्षण करणे होय.