विरोधकांचे विलिनीकरण

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, राष्ट्रवादी, राष्ट्रीय जनता दल, बिजू जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष एकत्र आले किंवा यातील काही पक्षांनी काँग्रेससारख्या मोठ्या पक्षात विलिनीकरण केले, तरच विरोधकांचा निभाव लागणे शक्य आहे.

Story: संपादकीय |
11th June, 11:48 pm
विरोधकांचे विलिनीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सत्तेची बारा वर्षे पूर्ण केली. २०१४ मध्ये भाजपला सत्ता मिळाली तेव्हापासून आतापर्यंत भाजपने तीनवेळा सत्ता स्थापन केली. प्रचंड निधी असूनही २०२४ ची निवडणूक भाजपला बरीच जड गेली, पण राजकीय उत्तरार्धात असलेले नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपला साथ दिल्यामुळे सत्तेचा मार्ग बराच सुकर झाला. मोदींनी १२ वर्षांत देशाला विकासाच्या दिशेने नेल्याच्या निमित्ताने भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हे सुरू असताना विरोधी पक्षांना हतबल करण्याचे कामही भाजपने सुरू ठेवले आहे. विस्कळित विरोधक एकत्र येत नसल्यामुळे आणि योग्य वेळी एकमेकांची साथ देत नसल्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांना सत्तेच्या जवळ येता आले नाही. भाजपने मात्र आपला विजयाचा रथ अजून नेटाने सुरू ठेवला. ओडिशा, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा काँग्रेस, तृणमूल, आप, बीजेडीकडे असलेल्या राज्यांमध्ये भाजपने सत्ता हस्तगत केली. दक्षिण भारतातील मतदार भाजपच्या अजेंड्याला अद्याप स्वीकारत नाहीत, मात्र अन्य ठिकाणी भाजप विरोधकांना चारीमुंड्या चीत करत आहे. फक्त सत्ता स्थापन करत नाही, तर सत्ता मिळवल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये पडणारी फूट भाजप आपला पक्ष मोठा करण्यासाठी वापरत असते. आज तृणमूल पक्षाची हीच स्थिती झाली आहे. तृणमूलचे आमदार, खासदार वेगळा गट करून ममता बॅनर्जींपासून फारकत घेत आहेत. आम आदमी पक्षातही अशाच प्रकारची स्थिती आहे. त्यांचे नेतेही फुटून भाजपलाच जाऊन मिळत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेनेने वेगळे गट करून भाजपला पाठिंबा दिला. इतके सारे होत असतानाही विरोधी पक्षांमध्ये एकमत होत नाही किंवा ते एकत्रही येत नाहीत. भाजप मात्र विरोधी पक्षांतील मतभेदांचा लाभ उठवत पक्ष मोठा करत चालला आहे. 

विरोधकांना केंद्रात सत्ता स्थापन करायची असेल तर त्यासाठी आता २०२९ पर्यंत वाट पाहावी लागेल. तीन वर्षे विरोधकांकडे आहेत. या तीन वर्षांत विरोधकांनी एकत्र येण्यासाठी काही उपाय केले, तरच त्यांचा निभाव लागेल; अन्यथा भाजपसमोर त्यांचा टिकाव लागणे कठीण आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत. मात्र, आजही त्यांनी काही तडजोड केली, तर ही फूट रोखली जाऊ शकते. भाजपसमोर कुठल्याच विरोधी पक्षाने तग धरलेला नाही. काँग्रेसचे अनेक नेते फुटून भाजपात गेले. इतर पक्षांचेही अनेक नेते भाजपात गेले आहेत. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी जो एकसूत्री कार्यक्रम हवा, तो विरोधकांकडे नाही. उलट, भाजप चुकांमधून सुधारतो आणि सावरतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने अपेक्षित जागा दिल्या नाहीत याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम राबवणे सुरूच ठेवले.

विरोधकांचे मात्र काही वेगळेच सुरू असते. राज्यांच्या निवडणुका लागल्या की विरोधक एकमेकांच्या विरोधातच उभे राहून भाजपला सत्तेचा मार्ग दाखवतात. पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये एकमेकांच्या विरोधात विरोधी पक्ष लढले. सध्या सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची गरज असताना, विरोधक मात्र फक्त बैठका आणि पत्रकार परिषदा घेण्यात धन्यता मानत आहेत. 'नीट'सारख्या विषयावरून मंत्र्यांचे राजीनामे देण्याची वेळ यायला हवी होती, पण विरोधकांनी फक्त सोशल मीडियावरूनच 'डायलॉगबाजी' केली. सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद एकट्या काँग्रेस किंवा आम आदमीसारख्या पक्षात नाही. त्यासाठी सर्व विरोधकांनी एका छताखाली येणे हेच गरजेचे आहे. किंबहुना सध्याच्या घडीला एकच पक्ष मजबूत करण्यासाठी विरोधकांचे विलिनीकरण होणे त्याहूनही जास्त गरजेचे आणि फायद्याचे आहे. तृणमूल, राष्ट्रवादीसारखे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे आणि त्या पक्षांतील नेत्यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे स्थान देण्याचे मोठेपण काँग्रेसने दाखवायला हवे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, डीएमके, राष्ट्रवादी, राष्ट्रीय जनता दल, बिजू जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष एकत्र आले किंवा यातील काही पक्षांनी काँग्रेससारख्या मोठ्या पक्षात विलिनीकरण केले, तरच विरोधकांचा निभाव लागणे शक्य आहे. अन्यथा "आपण भाजपला बहुमतापासून रोखले," या आनंदातच रहायचे असेल आणि एकमेकांच्या विरोधातच लढायचे असेल, तर विरोधकांना सत्तेची चावी सापडणे अशक्यच आहे.