मीराबाई चानूचा आदर्श

विक्रम होत राहतील, पण मीराबाईसारख्या खेळाडूकडून होणारा विक्रम हा खास असतो. तिला एका रात्रीत हे यश मिळालेले नाही. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि खेळाकडे प्रामाणिक राहून इतिहास रचता येतो, हे मीराबाईने जगाला दाखवून दिले आहे. भारतात खेळात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी मीराबाई हीच आदर्श असायला हवी, अशी तिची कामगिरी आहे.

Story: संपादकीय |
27th July, 10:33 pm
मीराबाई चानूचा आदर्श

स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सध्या राष्ट्रकुल स्पर्धा सुरू आहेत. २ ऑगस्टपर्यंत या स्पर्धा सुरू राहतील. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि यजमान स्कॉटलंड सध्या या स्पर्धेच्या गुणतालिकेत पुढे आहेत. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक पदके घेऊन आघाडीवर आहे. कॉमनवेल्थमध्ये असलेले ७४ देश या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये भारताने तब्बल ६१ पदके मिळवली होती. त्यावेळी अंतिम यादीत भारत चौथ्या स्थानावर होता. यंदा अद्याप जरी पदकांच्या यादीत मोठी भर पडलेली नसली, तरी मीराबाई चानूसारख्या खेळाडूने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिच्या या विजयाचा जल्लोष भारतीय क्रीडा विश्वात सुरू आहे. सध्यातरी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक भारताच्या नावावर आहे. अजून सहा दिवस ही स्पर्धा आहे, त्यामुळे भारताच्या पदरात चांगल्यापैकी पदकांची भर पडेल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

२०२२ च्या तुलनेत यावेळी कॉमनवेल्थमध्ये सहभागी भारतीय खेळाडूंची संख्या कमी आहे. काही क्रीडाप्रकार वगळल्यामुळे भारतीय पथकातील खेळाडूंची संख्याही कमी झाली आहे आणि यामुळे पदकांची संख्याही कमी होऊ शकते. सध्यातरी म्हणावे तसे यश भारताच्या पदरात पडलेले नाही, पण अपेक्षा खूप आहेत. २०२२ मध्ये २१० खेळाडूंचे पथक होते, यावेळी ती संख्या जवळजवळ निम्म्यावर आली आहे. यावेळी १२५ च्या आसपास खेळाडू असल्यामुळे त्याचा परिणाम पदकांवरही होणारच आहे. विशेष म्हणजे यावेळी अनेक चांगल्या क्रीडाप्रकारांना कात्री लावली आहे. बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, नेमबाजी, क्रिकेट, टेबल टेनिस अशा डझनभर प्रकारांना कात्री लावल्यामुळे अनेक देशांच्या पदकांवरही मर्यादा आल्या आहेत. क्रीडाप्रकारांमध्ये कपात केल्यामुळे निश्चितच कॉमनवेल्थ गेम्सच्या प्रतिष्ठेवर आणि दर्जावरही त्याचा परिणाम होणार आहे. कॉमनवेल्थमध्ये पदक मिळवणे हे खेळाडूंसाठी प्रतिष्ठेचे मानले जाते. भारतीय खेळाडूंसाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिक, आशियाई गेम्स, पॅरा ऑलिम्पिक अशा क्रीडा स्पर्धा फार महत्त्वाच्या असतात. त्यात यावेळी कॉमनवेल्थने क्रीडाप्रकारांमध्ये कपात केल्यामुळे जगभरातील अनेक खेळाडूंवर तो थेट अन्याय ठरला आहे. खेळाडूंमध्ये या विषयावरूनच निराशा आहे. कॉमनवेल्थ संपताना भारताच्याही पदकांच्या यादीत यावेळी मोठा फरक जाणवेल. देशातील खेळाडूंमध्ये असलेली निराशा भरून काढण्यासाठी जे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, त्यांच्या खांद्यावर सारा भार आहे. 

सध्यातरी मेहनती मीराबाई चानूने सुवर्णपदक मिळवले आहे. चानूसह जांधू कुमार, ऋषिकांता सिंग, मुथुपांडी राजा या खेळाडूंनी आतापर्यंत भारताला चार पदके मिळवून दिली आहेत. गेल्या काही वर्षांतील कामगिरी पाहता, भारताच्या खेळाडूंना यंदाही प्रयत्नांची पराकाष्टा करून देशाचे नाव पदकांच्या यादीत पहिल्या पाच देशांमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करण्याचा दबाव निश्चितच असेल. त्यात मीराबाई चानूसारख्या खेळाडूकडून इतरांनीही बोध घ्यावा लागेल. २०१४ मध्ये कॉमनवेल्थमध्ये रौप्यपदकावर समाधान मानलेल्या मीराबाई चानू हिने त्यानंतरच्या तीन कॉमनवेल्थमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. २०१८, २०२२ आणि २०२६ असे सलगपणे तीनवेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाईने इतिहास रचला आहे. अत्यंत साध्या घरातून आलेली मीराबाई चानू हिने फक्त पदके जिंकून इतिहास रचलेला नाही, तर तिने आपल्या या कामगिरीतून कष्ट आणि त्यागाचे फळ कसे असते, ते दाखवलेले आहे. विक्रम होत राहतील, पण मीराबाईसारख्या खेळाडूकडून होणारा विक्रम हा खास असतो. तिला एका रात्रीत हे यश मिळालेले नाही. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि खेळाकडे प्रामाणिक राहून इतिहास रचता येतो, हे मीराबाईने जगाला दाखवून दिले आहे. भारतात खेळात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी मीराबाई हीच आदर्श असायला हवी, अशी तिची कामगिरी आहे. तिच्याकडूनच प्रेरणा घेऊन इतर खेळाडूही देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी कॉमनवेल्थमध्ये पुढील उर्वरित दिवसांत चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. यावेळी कॉमनवेल्थमध्ये क्रीडाप्रकार कमी असले आणि खेळाडू कमी असले तरीही भारताची कामगिरी समाधानकारक राहावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे.