शालेय शिक्षणात आता ‘एआय’चे धडे

Story: राज्यरंग |
27th July, 10:28 pm
शालेय शिक्षणात आता ‘एआय’चे धडे

शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने पंजाब सरकारने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा मुख्य विषय सुरू करणारे देशातील पहिले राज्य बनण्याचा मान मिळवला आहे. पंजाब स्कूल एज्युकेशन बोर्ड ‘सरबत.एआय’ प्रकल्पाअंतर्गत हा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने राबवणार असून, देशातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय एआय शिक्षण मोहिमांपैकी हा एक उपक्रम मानला जात आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ पंजाबचे शालेय शिक्षणमंत्री हरजोत सिंह बैंस यांच्या हस्ते झाला. 

पंजाबमधील प्रत्येक पीएसईबी शाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता हा मुख्य विषय असणार आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला जगातील आघाडीचे देश आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असलेली आधुनिक कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत एआय मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सिंगापूर, फिनलंड, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेतील सर्वोत्तम शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच तो युनेस्कोच्या नैतिक एआय मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत ठेवण्यात आला असून, विद्यार्थ्यांना सुरक्षित, जबाबदार आणि नैतिक पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता यावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

या उपक्रमाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीमध्ये संगणकशास्त्र विषयासोबत एआयचा समावेश केला जाईल. विद्यार्थ्यांना थेट ऑनलाइन वर्ग, रेकॉर्डेड व्याख्याने, प्रकल्पाधारित शिक्षण, सातत्यपूर्ण मूल्यमापन तसेच स्वतंत्र लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एआय शिक्षण सुरू करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम ‘एफए-एआय’च्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या यशस्वी पायलट प्रकल्पावर आधारित असून, ‘नीव एआय’ संस्थेमार्फत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच गुगल, इंटेल, कॅनव्हा आणि एफए-एआय यांच्या सहकार्याने एआय साक्षरता, शिक्षक प्रशिक्षण, नवोपक्रम आणि भविष्यातील रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

या उपक्रमाचा लाभ राज्यातील २५,१७२ शाळांमधील सुमारे ३१.५ लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२,४२४ संगणकशास्त्र शिक्षक या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करतील. त्यानंतर सर्व विषयांतील दोन लाखांहून अधिक शिक्षकांना अध्यापन, शिक्षण आणि मूल्यमापनात एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

चीन आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी प्राथमिक शिक्षणात एआयचा समावेश केल्यानंतर पंजाबनेही या क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.

- प्रसन्ना कोचरेकर