येत्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या युतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, जागावाटपाचा पेच आणि प्रत्यक्ष कृतीचा अभाव यामुळे काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून विरोधक पुन्हा गाफील राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोव्यात विधानसभा निवडणूक येत्या जानेवारी वा फेब्रुवारीत होईल अशी चर्चा सुरू झाली आहे, तर काहींच्या मते मुख्यमंत्री येत्या डिसेंबरमध्येच मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. पण राजकीय गोटाच्या मते मुख्यमंत्र्यांना वाटले म्हणून तसे होणार नाही. मात्र, भाजप श्रेष्ठींनी तसे ठरविले तर मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते, पण सध्याचे देशातील एकंदर वातावरण व राजकीय अस्वस्थता पाहिली तर भाजप श्रेष्ठी तो धोका पत्करतील असे वाटत नाही. त्यामुळे कार्यकाल पूर्ण झाल्यावरच निवडणूक होईल असा विचार करता येईल. पण मुद्दा तो नाही, तर या निवडणुकीत तरी विरोधी पक्ष सरकार विरुद्ध एकत्र येतील का? हा खरा मुद्दा आहे.
परवा गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी सर्व विरोधी पक्षांची नव्हे तर काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्यातील युती कायम ठेवण्याची दोन्ही पक्षांची इच्छा असल्याचे सांगितले व त्यामुळे हे दोन्ही पक्ष तरी एकत्र राहतील असे संकेत मिळाले, पण पुढच्याच क्षणी त्या संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये लवकरच बोलणी सुरू होतील, असे जे सांगितले त्यामुळे पुन्हा अनिश्चिततेचे ढग तयार झाल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. कारण निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना बोलण्यासाठी का वेळ लावता, असे प्रश्न जो तो करू लागला आहे व ते साहजिकच आहे.
या दोन्ही पक्षांनी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी युती केली होती, वास्तविक तीच युती विधानसभा निवडणुकीसाठी पुढे ठेवण्याचे आणि त्यासाठी आवश्यक ती पुढील पावले उचलायला हवी होती; परंतु ती उचलली गेली नाहीत आणि त्यामुळे युतीबाबत त्यानंतर कोणतीच विशेष प्रगती अद्याप झालेली नाही.
प्रत्येक जण युती हवी असे म्हणतो, पण प्रत्यक्षात कोणतीच पावले त्या दिशेने उचलली गेलेली नाहीत. प्रदेश काँग्रेसची तर पुनर्रचनाही झालेली आहे. नव्या जिल्हा व गट समित्याही स्थापन झालेल्या आहेत, पण युती पुढे रेटण्याच्या दिशेने काहीच झालेले नाही, की कोणी नेताही त्या दिशेने काही बोलताना दिसत नाही. त्यामुळे त्या पक्षाला खरेच युती हवी आहे की काय, असा मुद्दाही आता उपस्थित होऊ लागला आहे.
परवा विजय सरदेसाई यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या वाढदिवशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अन्य पदाधिकारीही होते. वास्तविक युतीबाबत थोडीफार बोलणी करण्याची ती एक चांगली संधी होती, पण तशी ती झाली नाहीत असेच दिसते. उभयतांनी युतीबाबत लवकरच बोलणी होतील, असे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. मात्र, ही बोलणी नेमकी कधी होतील हे त्यांनी स्पष्ट केले नाही आणि पत्रकारांनीही त्याबद्दल त्यांना विचारले नाही. त्यामुळे निवडणुकीची घोषणा झाल्यावर तर ती होणार नाही ना, अशी चिकित्सा काही जण करताना दिसत आहेत. समाज माध्यमांवरही तशा बोलण्याची मागणी कोणी करताना दिसत नाही, त्यामुळे खरेच विरोधकांची युती होणार का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
वास्तविक सध्या दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनातून जी राजकीय अस्वस्थता तयार झालेली आहे, त्याचा लाभ गोव्यातील विरोधी पक्षांना घेण्याची संधी होती, पण तो घेण्याचे चातुर्य त्यांच्याकडे दिसत नाही, हीच तर खरी गोम आहे.
आणखी एक मुद्दा म्हणजे, काँग्रेस व गोवा फॉरवर्डनेही युती संदर्भात जागा वाटून न घेता विविध तालुक्यांत व मतदारसंघांत आपले बळ वाढविण्यासाठी जी पावले उचलली आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या लोकांमध्ये-कार्यकर्त्यांमध्ये अविश्वासाची भावना तयार होऊ लागली आहे त्यातून युती अस्तित्वात येण्यापूर्वीच ती बिघडणार तर नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. परवा अनेक भागातील युवा नेत्यांना गोवा फॉरवर्डने पक्षात सामील करून घेतल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहीजण खासगीत तशी विचारणाही करत आहेत व तशी ती करणे स्वाभाविकही आहे.
दुसरा एक मुद्दा म्हणजे, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी या तिघांची युती झाली तर भाजपविरोधी मतांची विभागणी होणार नाही हे खरे आहे, पण सध्या आरजी पक्षच मुळी जाग्यावर उरलेला नाही. त्या पक्षाची तर दोन शकले झाली आहेत. त्यामुळे आरजीचे मतदार विभागून जातील, मग कोणत्या आरजीकडे युती करायची असा मुद्दाही उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे विरोधी युतीचे नेमके काय होणार की काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड हे दोन पक्षच या युतीत उरतील, असा मुद्दाही उपस्थित होतो. पण ते दोनच पक्ष मिळून अशी युती करणार असतील तर त्यांनी खरे म्हणजे आता ती आणखी वेळ न गमावता करणे गरजेचे आहे. कारण युतीसाठी महत्त्वाचा - कळीचा मुद्दा ठरणार तो जागा वाटपाचा. कारण अनेक मतदारसंघांत त्या दोन्ही पक्षांच्या अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करत आहेत आणि म्हणून उमेदवारीवरून बिघाड होण्याची भीती नाकारता येत नाही. यास्तव बोलण्यासाठी आता आणखी वेळ काढून चालणार नाही.
सत्ताधारी भाजप व मगो या पक्षांमधील युतीचीही हीच स्थिती आहे, पण सत्तेत असल्याने त्यांची गोष्ट वेगळी आहे. मगो पक्षाला मनात नसतानाही ती करावीच लागेल. कारण त्या पक्षाच्या काही मर्यादा आहेत. पण त्यांच्या मधील युतीची वाट पाहत बसण्याचे विरोधी पक्षांना कारण नाही. २०१७ आणि २०२२ च्या निवडणुकीची उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवून कंबर कसली, तरच धडगत आहे. अन्यथा 'बैल गेला अन् झोपा केला' अशीच त्यांची गत होण्याचा धोका आहे.
- प्रमोद ल. प्रभुगावकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व राजकीय
विश्लेषक आहेत)