योग्य प्रकारे तयार केलेल्या विभूतीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचे स्पंदन असते. त्यामुळे, तिच्यामागे असलेले विज्ञान पुन्हा एकदा जागृत करून, त्याचा योग्य प्रकारे उपयोग करण्याची आज गरज आहे.

सद्गुरू : विभूती किंवा पवित्र भस्म यांचा उपयोग करण्यामागे अनेक पैलू सामावले आहेत. सर्वप्रथम, जीवन ऊर्जेचे प्रसारण किंवा जीवन ऊर्जा प्रक्षेपित करण्यासाठी ते एक प्रभावी माध्यम आहे आणि ऊर्जा-शरीराला योग्य ती दिशा देण्यासाठी आणि तसेच ऊर्जा-शरीराला योग्य प्रकारे नियंत्रित करण्याची क्षमता त्यामध्ये सामावलेली असते. याशिवाय, शरीरावर विभूती लावण्याच्या पाठीमागे एक प्रतीकात्मक महत्त्व देखील आहे. विभूती आपल्याला आपल्या जीवनाच्या नश्वर स्वरूपाची सतत आठवण करून देत असते - हे असे आहे की, तुम्ही तुमच्या शरीरावर नेहमीच मृत्यूचे एक स्मरण घेऊन वावरत आहात.
साधारणपणे योगी स्मशानभूमीतून आणलेले भस्म वापरतात. जर असे भस्म उपलब्ध नसेल, तर त्यानंतरचा पर्याय म्हणजे गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार केलेले भस्म वापरणे. यामध्ये इतर काही पदार्थांचा देखील वापर केला जातो, परंतु त्याचा मूलभूत घटक गाईच्या शेणाच्या गोवऱ्याच असतात. जर हे भस्म देखील उपलब्ध नसेल, तर त्यानंतरचा पर्याय म्हणजे तांदळाच्या टरफलापासून विभूती तयार करणे. यामागील संकेत असा आहे की,आपले शरीर हा काही मुख्य घटक नाही; ते केवळ टरफलासारखे एक बाह्य आवरण आहे.
जर विभूती योग्य प्रकारे तयार केली गेली असेल, आणि ती कुठे आणि कशी लावावी हे जर तुम्हाला माहीत असेल, तर ती विभूती तुम्हाला अधिक ग्रहणशील बनवते आणि शरीरावर ज्या ठिकाणी ही विभूती लावली जाते, शरीराचा तो भाग अधिक संवेदनशील बनतो. ही संवेदनशीलता अधिक सूक्ष्म बनत जाते आणि उच्च स्वरूपाकडे वाटचाल करू लागते. या कारणामुळेच सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी, शरीरावरील काही विशिष्ट बिंदूंवर विभूती लावली जाते, जेणेकरून तुमच्या सभोवतालच्या दैवी तत्वाचे तुम्ही ग्रहण करू शकाल आणि दुष्ट तत्वांचे ग्रहण टाळले जाईल. त्या ठराविक क्षणी तुमच्या आतील कोणता पैलू ग्रहणशीलतेसाठी उपलब्ध आहे, त्यानुसार तुम्ही जीवनाला वेगवेगळ्या प्रकारे आणि तुमच्या अस्तित्वाच्या विविध आयामांद्वारे अनुभवू शकता. कधीकधी तुम्ही हे पाहिले असेल की, एखाद्या वेळी तुम्ही एखादी गोष्ट पाहिली आणि त्या गोष्टीचा एका विशिष्ट प्रकारे अनुभव घेतला आहे. पण, दुसऱ्या वेळी तीच गोष्ट पाहिल्यानंतर तुमचा अनुभव संपूर्णपणे वेगळा होता. तुम्ही जीवनाला कशा प्रकारे ग्रहण करता, यावरच सर्व काही अवलंबून असते. तर, तुमच्या आतील कनिष्ठ पैलू नव्हे, तर उच्च पैलू ग्रहणशील झाले पाहिजेत अशी अपेक्षा असते.
तुमच्या या भौतिक शरीरामध्ये जीवनाचा अनुभव घेण्याच्या दृष्टीने सात आयामांचे प्रतिनिधित्व करणारी सात मूलभूत केंद्रे आहेत. या मूलभूत केंद्रांना चक्रे असे म्हणतात. चक्र म्हणजे ऊर्जा यंत्रणेतील एक विशिष्ट संगमबिंदू. ही चक्रे भौतिक स्वरूपाची नसून ती सूक्ष्म स्वरूपाची आहेत. एखाद्या व्यक्तीला अनुभवाच्या माध्यमातून या चक्रांची जाणीव होऊ शकते; परंतु जर शरीराचे विच्छेदन करून पाहिले, तर तुम्हाला असे कोणतेही चक्र सापडणार नाही. जसजसे तुम्ही अधिक तीव्र स्वरूपाच्या अवस्थांकडे जात असता, तसतशी ऊर्जा स्वाभाविकपणे एका चक्रातून पुढील चक्राकडे विकसित होत जाते. जर तुम्ही उच्च चक्रांद्वारे या जीवनाचे ग्रहण केले, तर तीच परिस्थिती तुम्हाला खालच्या चक्रांमधून जीवन ग्रहण करण्याच्या तुलनेत पूर्णपणे वेगळ्या प्रकारे अनुभवायला मिळेल.
परंपरेनुसार, विभूती ही अंगठा आणि अनामिका यांच्या मदतीने किंवा अंगठा, मधले बोट आणि अनामिका यांच्या साहाय्याने घेतली जावी असे सांगितले जात असे - असे करताना जास्त प्रमाणात विभूती घेण्याची गरज नाही, अगदी थोडीशी विभूती देखील पुरेशी आहे - आणि ही विभूती भुवयांच्या मधोमध असलेल्या आज्ञा चक्रावर, गळ्याच्या खालील खोलगट भागात असलेल्या विशुद्धी चक्रावर आणि छातीच्या समोरच्या बाजूला बरगड्या जिथे एकत्र येतात त्याच्या मध्यभागी असलेल्या अनाहत चक्रावर लावावी. भारतामध्ये हे अगदी सर्वसामान्य माहित होते की, शरीराच्या अशा ठराविक भागांवर विभूती लावलीच पाहिजे. विभूती विशिष्ट बिंदूवर लावण्यामागचे एक कारण हे होते की, या ठिकाणी विभूती लावल्यामुळे शरीराचे हे भाग अधिक संवेदनशील बनतात.
साधारणपणे अनाहत चक्रावर विभूती लावली जाते, जेणेकरून तुम्ही जीवनाला प्रेमाच्या स्वरूपात ग्रहण करू शकाल. विभूती विशुद्धी चक्रावर लावली जाते, जेणेकरून तुम्ही जीवनाला सामर्थ्याच्या स्वरूपात ग्रहण करू शकाल. इथे सामर्थ्य या शब्दाचा अर्थ केवळ शारीरिक शक्ती किंवा मानसिक शक्ती असा नाही; मानव अनेक प्रकारे सामर्थ्यवान असू शकतो. या पाठीमागे असा उद्देश आहे की, जीवनऊर्जा इतकी प्रबळ आणि प्रभावशाली बनली पाहिजे की, केवळ तुमच्या उपस्थितीचा देखील सभोवतालच्या जीवनावर प्रभाव पडायला हवा. तुम्हाला काही बोलण्याची किंवा एखादी कृती करण्याची देखील गरज भासणार नाही - तुम्ही असे अगदी सहज शांतपणे जरी बसलात, तरी तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीवर तुमचा प्रभाव पडेल. अशा प्रकारचे सामर्थ्य मानवामध्ये विकसित होऊ शकते. आज्ञा चक्रावर विभूती लावली जाते, जेणेकरून तुम्ही जीवनाला ज्ञानाच्या स्वरूपात ग्रहण करू शकाल. हे एक अत्यंत गहन विज्ञान आहे. पण आजच्या काळात, त्यामागील विज्ञान समजून न घेता आपण कपाळावर केवळ एक पट्टी म्हणून विभूती लावत आहोत. एखादी व्यक्ती स्वतःच्या कपाळावर ज्या प्रकारे पट्टे लावते, तीच व्यक्ती दुसऱ्या प्रकारे पट्टे लावणाऱ्या व्यक्तीसोबत सहमत नसते - हा केवळ एक मूर्खपणा आहे.
विभूती ही भगवान शिवाने आपल्याला प्रदान केलेली एक गोष्ट आहे किंवा अमुक-तमुक देवाने प्रदान केली आहे, असे नाही. हा काही श्रद्धेचा विषय नाही. आपल्या या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या उत्कर्षासाठी असणारे एक साधन म्हणून तिच्याकडे अत्यंत सखोलपणे पाहिले गेले आहे. योग्य प्रकारे तयार केलेल्या विभूतीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचे स्पंदन असते. त्यामुळे, तिच्यामागे असलेले विज्ञान पुन्हा एकदा जागृत करून, त्याचा योग्य प्रकारे उपयोग करण्याची आज गरज आहे.
- सद््गुरू, ईशा फाऊंडेशन