ऐतिहासिक ब्यूफोर्ट किल्ल्यावर इस्रायलचा ताबा

Story: विश्वरंग |
12th June, 11:33 pm
ऐतिहासिक ब्यूफोर्ट किल्ल्यावर इस्रायलचा ताबा

इस्रायल आणि लेबनान यांच्यात संघर्षविराम लागू असतानाही दोन्ही देशांतील तणाव कमी झालेला नाही. इराणवर इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने इराणला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर इस्रायलने लेबनानमधील विविध भागांवर कारवाया सुरू ठेवल्या असून, अलीकडेच इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनानमधील ऐतिहासिक ब्यूफोर्ट कैसल आणि त्याच्या परिसरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.

या कारवाईचे महत्त्व अधोरेखित करताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः विजयाची घोषणा केली. किल्ल्यावर इस्रायली ध्वज फडकवल्यानंतर त्यांनी हा इस्रायलसाठी मोठा रणनीतिक विजय असल्याचे म्हटले. मात्र, फ्रान्स आणि ब्रिटनसह काही युरोपीय देशांनी या कारवाईवर टीका करत ती तणाव वाढवणारी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ब्यूफोर्ट किल्ला लेबनानमधील नबातियेह परिसरात लितानी नदीच्या वर उंच कातळावर वसलेला आहे. सुमारे ९०० वर्षांपूर्वी, १२व्या शतकात क्रूसेडरांनी या किल्ल्याची उभारणी केली होती. फ्रेंच भाषेत ‘ब्यूफोर्ट’ म्हणजे ‘सुंदर किल्ला’, तर अरबी भाषेत त्याला ‘कलाई अल-शकीफ’ असेही संबोधले जाते. मध्यपूर्वेतील सर्वाधिक सुरक्षित आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी तो एक मानला जातो.

लष्करी तज्ज्ञांच्या मते, ब्यूफोर्ट किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे भौगोलिक स्थान. उंच टेकडीवर असल्यामुळे येथून उत्तर इस्रायलमधील गॅलिली परिसर आणि दक्षिण लेबनानमधील विस्तीर्ण भागावर थेट नजर ठेवता येते. त्यामुळे शत्रूच्या हालचाली, सैन्याची जमवाजमव आणि लष्करी हालचालींवर दूरवरून लक्ष ठेवणे शक्य होते. यामुळे हा किल्ला युद्धनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

ब्यूफोर्ट किल्ला प्रथमच चर्चेत आलेला नाही. १९९२ लेबनन युद्धादरम्यान इस्रायलने हा किल्ला पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेकडून ताब्यात घेतला होता. त्यानंतर जवळपास १८ वर्षे इस्रायली सैन्याचा या किल्ल्यावर ताबा होता. पुढे हिजबुल्लाहने पुन्हा या परिसरावर नियंत्रण मिळवले. इस्रायली संरक्षण दलाच्या दाव्यानुसार, हिजबुल्लाहने इराणच्या मदतीने या किल्ल्याच्या परिसरात आणि भूमिगत भागात आधुनिक लष्करी तळ व बोगद्यांचे जाळे उभारले होते. या उंच भागाचा वापर करून इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्यात येत असल्याचा आरोपही इस्रायलकडून करण्यात आला आहे.

संघर्षविराम अस्तित्वात असतानाही ब्यूफोर्ट किल्ल्यावरून पुन्हा एकदा इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून येत असून, या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- सुदेश दळवी