राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काँग्रेसशी अधिक जवळ जाऊ शकते, तर तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात स्वतंत्र ओळख टिकवण्याचा प्रयत्न करेल. मात्र भारतीय राजकारणातील पुढील दशक हे व्यक्तिकेंद्री पक्ष टिकतील की मजबूत संघटनाधारित पक्ष पुढे जातील, याचे उत्तर देणारे ठरणार आहे.

भारतीय राजकारणात घराणेशाही हा नवा विषय नाही. अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांमध्ये पक्षाची सूत्रे एका कुटुंबाभोवती फिरताना दिसतात. पक्षाची स्थापना करणाऱ्या नेत्यांनंतर त्यांची पत्नी, मुले, नातवंडे किंवा इतर नातेवाईक नेतृत्वाच्या केंद्रस्थानी येतात. मात्र ही प्रक्रिया नैसर्गिक नेतृत्वबदल म्हणून न होता, पक्षातील ज्येष्ठ, अनुभवी आणि जनाधार असलेल्या नेत्यांना डावलून होत असेल, तर त्याचे गंभीर परिणाम पक्षालाच भोगावे लागतात. कोणत्याही पक्षाचे खरे बळ हे त्याचे कार्यकर्ते आणि वर्षानुवर्षे पक्ष वाढविणारे ज्येष्ठ नेते असतात. हे नेते संकटाच्या काळात पक्षासाठी उभे राहिलेले असतात. परंतु पक्षाचे नेतृत्व कुटुंबापुरते मर्यादित ठेवण्याच्या प्रयत्नात अशा नेत्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जाते. त्यांच्या मतांना किंमत राहत नाही. परिणामी त्यांच्यात नाराजी निर्माण होते. राजकारणात अनुभवाला पर्याय नसतो. निवडणुका, जनतेची मानसिकता, प्रशासन आणि संघटन यांचा दीर्घ अनुभव असलेल्या नेत्यांकडे दुर्लक्ष केल्यास पक्षाचे नुकसान होऊ शकते. इतिहास पाहिला तर अनेक पक्षांमध्ये घराणेशाहीमुळे अंतर्गत संघर्ष निर्माण झाला. जेव्हा ज्येष्ठ नेत्यांना वाटते की त्यांच्यासाठी पक्षात भविष्य उरलेले नाही, तेव्हा ते बंडखोरीचा मार्ग स्वीकारतात किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. काही वेळा नवीन पक्षही स्थापन होतात. सध्या पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबाबत अशाच प्रकारच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचा वाढता प्रभाव पक्षासाठी धोक्याचा ठरत आहे, तर शिवसेनेत आदित्य ठाकरे यांच्या उदयानंतर पक्षाची घसरण सुरू झाली, असे दिसून येते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, अशाही शक्यता काही राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत. या सर्व दाव्यांकडे वस्तुनिष्ठपणे पाहणे आवश्यक आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची संपूर्ण ओळख आणि जनाधार ममता बॅनर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती उभा राहिला. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांचा पुतण्या अभिषेक यांचा पक्षातील प्रभाव झपाट्याने वाढला आहे. यामुळे तृणमूलमध्ये दुसऱ्या फळीतील अनेक नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याच्या चर्चा सातत्याने होत राहिल्या. तृणमूलमध्ये नेतृत्वाचा केंद्रबिंदू हळूहळू ममतांकडून अभिषेक यांच्याकडे सरकत आहे, त्यामुळे पक्षातील लोकशाही कमी होत आहे. तथापि, समर्थकांच्या मते, अभिषेक हे तरुण नेतृत्व असून पक्षाला आधुनिक राजकारणाशी जुळवून घेण्यास मदत करत आहेत. तरीही एक वस्तुस्थिती नाकारता येत नाही की तृणमूलचा राष्ट्रीय विस्तार अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला शिवसेना पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी शक्ती होता. त्यांच्या निधनानंतर नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. यानंतर त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा उदय झाला. आदित्य ठाकरे यांनी पक्षाला युवा चेहरा दिला. मात्र शिवसेनेचा पारंपरिक मतदार आणि कार्यकर्ता वर्ग यामध्ये काही प्रमाणात दुरावा निर्माण झाल्याची टीका झाली. महाविकास आघाडीचा प्रयोग, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेला वाद आणि नंतर झालेली मोठी फूट यामुळे शिवसेना कमकुवत झाली. या घडामोडींचे संपूर्ण खापर आदित्य ठाकरे यांच्यावर फोडले जात आहे. शिवसेनेच्या पारंपरिक शैलीत झालेला बदल आणि नव्या नेतृत्वाचा प्रभाव यामुळे पक्षाची जुनी ओळख धूसर झाली, अशी भावना काही शिवसैनिकांमध्ये आजही आहे.
शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी शक्ती होती. परंतु पक्षाचा बहुतांश आधार हा शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वावरच अवलंबून राहिला. अलिकडच्या काळात झालेली फूट आणि स्व. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट वेगळा झाल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षाची संघटनात्मक रचना कमकुवत झाली आहे. यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे टिकेल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे पाहता, विचारधारेच्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील अंतर फारसे राहिलेले नाही. त्यामुळे दीर्घकालीन राजकीय गणितात विलिनीकरणाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काँग्रेसशी अधिक जवळ जाऊ शकते, तर तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात स्वतंत्र ओळख टिकवण्याचा प्रयत्न करेल. मात्र भारतीय राजकारणातील पुढील दशक हे व्यक्तिकेंद्री पक्ष टिकतील की मजबूत संघटनाधारित पक्ष पुढे जातील, याचे उत्तर देणारे ठरणार आहे.