गेल्या काही दिवसांत गोव्यात जे घडतेय, ते अपघाताने नाही, तर समाजात तेढ निर्माण करून स्वतःचे अस्तित्व टिकवू पाहणाऱ्यांकडून जाणीवपूर्वक केले जातेय. लोकांना कशामुळे राग येईल हे ठाऊक असल्याने, ते लोकांच्या प्रतिक्रियेचा वापर स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी करतात.

१९७० च्या दशकाच्या मध्यात केनियातून मोठ्या प्रमाणावर गोमंतकीय कुटुंबे बाहेर पडू लागली. मी खूप लहान असल्याने हे का घडत आहे हे समजण्याचे माझे वय नव्हते. पण ज्या देशावर आम्ही जीवापाड प्रेम केले, तिथली घरे, मैत्री आणि अनेक दशकांच्या आठवणी मागे सोडून आमची कुटुंबे तिथून निघत होती, एवढे मला जाणवत होते. त्या काळात गोव्यासाठी मोठ्या प्रमाणावर विमानसेवा नव्हती आणि प्रवासही खर्चिक होता. अशा वेळी भारत सरकारने मदतीचा हात पुढे करत 'एमव्ही हरियाणा' आणि 'एमव्ही करंजा' या दोन जहाजांची सोय केली. आमचा हा परतीचा प्रवास हिंदी महासागरातून तब्बल १२ दिवसांचा होता. खाण्यापिण्याच्या वस्तू आणि ताजे पाणी घेण्यासाठी जहाज वाटेत सेशेल्सला थांबायचे. आमच्यासारख्या लहान मुलांसाठी या क्लेशदायक भावनेपेक्षा एखाद्या मोठ्या अॅडव्हेंचर ट्रिपवर निघाल्यासारखे वाटत होते. आम्ही जहाजाचा कोपरा न् कोपरा, डेक आणि किचन पिंजून काढायचो. तिथल्या आचाऱ्यांशी मैत्री करायचो.
मायदेशी परतणाऱ्या शेकडो गोवेकरांसोबत आम्ही एप्रिल महिन्यात मडगाव बंदरावर उतरलो. तिथल्या प्रचंड गोंधळात घरी परतल्याचा आनंद आणि जुन्या लोकांना सोडण्याचे दुःख असे संमिश्र वातावरण होते. पुढे आम्ही जेव्हा कुठ्ठाळीला पोहोचलो, तेव्हा तिथे आंबे, काजू, फणस, करवंदे, चुन्ना अशा फळांचा सीझन सुरू होता. हे पाहून जणू या भूमीनेच आमच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे, असे वाटायचे. गोव्याच्या माझ्या सर्वात पहिल्या आणि सुखद आठवणींपैकी या काही आठवणी आहेत. पण घरात पाऊल ठेवल्यानंतर आम्ही जे अनुभवले, त्याने माझ्या मनावर अत्यंत खोल संस्कार केला.
गोव्यातले ते सुरुवातीचे दिवस
आम्ही केनियात असताना माझ्या वडिलांचे जवळचे मित्र रामचंद्र यांनी माझ्या वृद्ध काकांसोबत आमच्या वडिलोपार्जित घराची स्वतःच्या घरासारखी काळजी घेतली होती. रामचंद्र हे विधुर होते आणि ते जवळच त्यांची मुलगी रोहिणीसोबत राहायचे. शांत स्वभावाची रोहिणी नुकतीच शिक्षिका झाली होती. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावरच्या चष्म्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती एक वेगळेच आदरयुक्त आणि प्रेमळ वलय निर्माण झाले होते. घराला नुकताच नवा चुना लावला होता आणि देव्हारा मनापासून सजवला होता. देव्हाऱ्यातल्या मूर्त्या आणि हस्तिदंती क्रुसिफिक्स घासूनपुसून चकचकीत केला होता. आम्ही पहिल्यांदा घरात पाऊल ठेवले, तेव्हा रामचंद्र यांनी मेणबत्त्या पेटवल्या. ते आणि रोहिणी स्वाभाविकपणे आमच्या कुटुंबासोबत प्रार्थनेत सामील झाले; या नात्याला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नव्हती.
या पुनर्जन्म मिळालेल्या घराचा आणि गावाचा परिचय करून द्यायला रोहिणी आमची गाईड बनली. आम्ही कुठ्ठाळी आणि साकवाळमधली मंदिरे, चर्च, चॅपेल, बाजारांमध्ये भटकायचो. टेकड्यांवरून फिरताना काजू गोळा करायचो. वाटेतल्या घरांबाहेर दिसणारी तुळशी वृंदावने आणि अवर लेडीचे ग्रोटो म्हणजे सामायिक श्रद्धेचे सुंदर रूपच होते. सण-उत्सव, भजन आणि चर्चच्या टोलमधून सर्वत्र विहार करणाऱ्या हवेसारखी प्रवाहीपणे श्रद्धा जाणवायची.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर रोहिणीच्या आग्रहामुळे वडिलांनी आम्हा भावंडांना मडगावच्या लोयोला हायस्कूलमध्ये घातले. शाळेच्या पहिल्या दिवशी ठाणा बस स्टॉपवर ती आम्हाला सोडायला आली. बस येण्यापूर्वी तिने शांतपणे अगरबत्तीचे पाकीट काढले आणि आम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लहानशा देवळापाशी घेऊन गेली. तिथेच दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा व्हायचा. तिथे अगरबत्ती लावून आमचे वर्ष चांगले जावे म्हणून प्रार्थना केली. या क्षणात होते ते फक्त निखळ प्रेम. शाळेत सुरुवातीला आमची गोची झाली, कारण आम्हाला हिंदी लिहिता-वाचता येत नव्हते. अशा वेळी रोहिणी पुन्हा मदतीला धावली. स्वतःची शाळा संपवून आल्यावर ती संध्याकाळी संयमाने आम्हाला देवनागरी लिपी शिकवायची. रात्री आम्ही 'अ, आ, इ'च्या उजळणीत गुंग असताना मागच्या टेकड्यांवरून येणारा कोल्ह्यांचा ओरडण्याचा आवाज जणू आमच्या धड्यांना साथ द्यायचा. तिने आमची शेजाऱ्यांशी ओळख करून दिली. कंपाऊंडच्या भिंतीवरून फळांची देवाणघेवाण व्हायची. पावसाळ्यापूर्वी आम्ही अंगणात एकत्र लोणची घालायचो; सुकी मच्छी, मिरच्या, कोकम, चिंच सुकवायचो आणि कांद्यांच्या वेण्या विणायचो. ख्रिसमस आणि दिवाळीला एकत्र खोबरे खवून नेवऱ्या तळायचो. या गोष्टी म्हणजे आमच्या जगण्याचा आणि अस्तित्वाचाच भाग होता.
समजूतदारपणाची परीक्षा
आता मागे वळून पाहताना जाणवते की, ते दिवस फक्त मायदेशी परतण्याचे नव्हते. ते दिवस होते लोकांनी आम्हाला आणि जगण्याच्या अशा एका पद्धतीला कवेत घेण्याचे, जिथे काळजी किंवा श्रद्धेभोवती कसल्याच सीमा नव्हत्या. हाच खरा गोवा होता. एकमेकांबद्दलचा समजूतदारपणा हीच गोव्याला एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट होती. लोकांना आपल्या मर्यादा आणि त्या कधी ओलांडायच्या नाहीत, हे चांगले ठाऊक होते. पण आज त्याच समजूतदारपणाची परीक्षा घेतली जातेय. गेल्या काही दिवसांत वातावरण किती पटकन तापू शकते, हे आपण पाहिलेय. काही शब्द, एखादे कृत्य किंवा जाणीवपूर्वक ओलांडलेल्या मर्यादांमुळे लगेच तीव्र प्रतिक्रिया उमटतात; तक्रारी दाखल होतात, गट एकत्र येतात आणि विचार विखारी बनतात. गेल्या काही दिवसांत गोव्यात जे घडतेय, ते अपघाताने नाही, तर समाजात तेढ निर्माण करून स्वतःचे अस्तित्व टिकवू पाहणाऱ्यांकडून जाणीवपूर्वक केले जातेय. लोकांना कशामुळे राग येईल हे ठाऊक असल्याने, ते लोकांच्या प्रतिक्रियेचा वापर स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी करतात. यावेळी आपण त्यांच्या जाळ्यात अडकलो आणि तो प्रसंग शांत करण्याऐवजी आणखी वाढवला. जी गोष्ट सोडून देता आली असती, तिचे रूपांतर रस्त्यावर आणि ऑनलाईन जाहीर संघर्षात झाले. असे करून आपण 'आपण कोण आहोत' यावरून लक्ष हटवून, 'आपल्याला काय बोलले गेलेय' यावर केंद्रित केले. हा बदल घातक आहे. मोठ्या आवाजात प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांतपणे आपली बाजू लावून धरण्यात गोव्याची खरी ताकद आहे. सलोखा टिकवणे आणि संतापाचा तमाशा करणे यात मोठा फरक असतो. एक गोष्ट समाज जोडते, तर दुसरी आग लावते.
दुसरीकडे, महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण डोळेझाक करतोय. वाढती महागाई, तरुणांना न परवडणारी घरे, रोजच्या गरजांशी मेळ न घालणारे पगार, पर्यावरणाचा ऱ्हास, पाण्याचे प्रदूषण, जमिनीवर येणारा ताण, वाढती गुन्हेगारी आणि धोकादायक रस्ते, हे आपल्या दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत. कदाचित आपण फक्त शांतताच गमावत नाहीये, तर आपल्या आठवणीही विसरत चाललोय. अशा एका जागेची आठवण, जिथे रामचंद्र यांच्यासारखा माणूस दुसऱ्या कुटुंबाच्या घराची काळजी घ्यायचा, त्यांचा देव्हारा सजवायचा आणि कोणताही विचार न करता त्यांच्यासोबत प्रार्थनेला उभा राहायचा.
रोहिणीच्या लग्नानंतर आमचा संपर्क तुटला, पण मी अनेकदा तिचा विचार करतो. मला कधीतरी तिच्या मुलांना अन् नातवंडांना भेटून सांगायचे की, त्यांचे आजी-आजोबा आणि आई-वडील किती थोर होते. मला त्यांना सांगायचेय की, एकेकाळी श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी कोणी स्पष्टीकरणे देत नव्हते, ती फक्त लोकांच्या मनात जिवंत होती. कदाचित हीच गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. गोव्याला स्वतःची ओळख सिद्ध करत राहण्यापेक्षा सलोखा टिकवून ठेवण्याची गरज आहे. एकदा का हा सलोखा नष्ट झाला, तर आपण या वादात तर पराभूत होऊच, पण आपण जगण्याची ती सहजसोपी पद्धतही कायमची गमावून बसू.
- ज्योकिम गोएस
(लेखक अमेरिकेतील कोलंबिया
विद्यापीठात प्राध्यापक असून मूळचे
कुठ्ठाळी-गोवा येथील आहेत.)