'थर्ड डिग्री' सोडाच पण त्या तरुणाला पोलिसांनी एक थप्पडही लगावली असेल, तर त्या पोलिसावर कारवाई व्हायला हवी. तो तरुण काही गुन्हेगार नव्हता. या प्रकरणाची सखोल चौकशी सरकारने करायला हवी. पोलिसांनी त्या तरुणाला मारहाण केली नाही, हे पोलिसांना सिद्ध करावेच लागेल. पण एका घटनेला फाटे फोडून जे समाजात चुकीचे घडते त्याचे समर्थन कोणी करू नये.

उघड्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल झाल्यानंतर त्या तणावातून ज्या पद्धतीने त्या तरुणाने आत्महत्या केली, त्यानंतर उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचा विषयच बाजूला पडला. या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अनेकजण भावनिक होऊन 'असे व्हायला नको होते' असाच सूर आळवत आहेत. व्हिडिओ काढणारा अद्यापही समोर आलेला नाही; पण त्याच्या कृतीमुळे एकाचा बळी गेला, असाच या घटनेतून निष्कर्ष निघतो. त्या व्यक्तीने तो व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा पोलिसांना दिला असता तर ही घटना घडली नसती. या घटनेनंतर अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्यापेक्षा संबंधितांचे व्हिडिओ त्या भागातील संबंधित सरकारी खात्यांना पाठवायचे, असेच सर्वांचे मत झाले. दुसऱ्या बाजूने हा २३ वर्षांचा तरुण कुठून तरी बेकायदा पद्धतीने विकले जाणारे पिस्तूल आणतो आणि आत्महत्या करतो. हे पिस्तूल कुठून आले, त्याचा छडा लावण्याची गरज आहे. त्या तरुणाने आत्महत्या केली ती तणावातून. कचरा टाकण्याच्या विषयावरून कधी कोणाला मारहाण झाली किंवा मारहाण होते, असे झालेले नाही. पोलिसांनी त्याला हातही लावलेला नाही, असा दावा केला आहे. तो तरुण पोलीस स्थानकात असताना जे घडले ते त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांनाच माहीत असेल. पोलीस स्थानकातील सीसीटीव्हीचे फुटेज चौकशी अधिकाऱ्यांना दिली आहे. हे सगळे चित्र पाहता पोलिसांनी त्याला 'थर्ड डिग्री' दिल्याची कल्पना रंगवण्याचा प्रयत्न काही उतावीळवीरांकडून होत आहे. 'थर्ड डिग्री' म्हणजे काय आणि ती नेमकी कशी असते, त्याची काहीच माहिती नसलेले लोक त्याविषयी बोलत आहेत, हे दुर्दैवी आहे.
कचरा टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून एक तरुण आत्महत्या करतो आणि लगेच कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांबाबत सगळ्यांचेच बोलणे बंद होते. म्हणजे या घटनेने जणू काही उघड्यावर कचरा टाकण्याचा काहींना परवानाच दिला, अशाच हेतूने काहीजण मत व्यक्त करत आहेत. गोवा हे साक्षरतेत आघाडीवर असलेले राज्य आहे. पण, गोव्यात कितीतरी भागांत शिकलेल्या लोकांकडून उघड्यावर कचरा टाकला जातो. सकाळी कामाला निघताना बार्देश, तिसवाडी, फोंडा, डिचोली, सासष्टी, काणकोण आणि केपे या तालुक्यांतील रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्या सुशिक्षितांना काय म्हणावे? पणजीसारख्या भागात कचरा गोळा करणारे कामगार रोज घरी येतात, पण पणजीत कामाला येणारे कितीतरी लोक वाटेत कचरा टाकूनच पुढे येतात. कचरा उघड्यावर फेकणाऱ्यांचे यापूर्वी अनेक व्हिडिओ, फोटो समोर आलेले आहेत. हा काही पहिलाच प्रकार नाही.
आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे, 'आता आपल्याला तोंड दाखवायला जागा नाही', असा टोकाचा विचार करून त्या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेमुळे इतर काही लोक कचरा टाकायला मोकळे, आपण त्यांचे समर्थन करायचे, असा या घटनेचा अर्थ काढता येणार नाही. त्या तरुणाबाबत जे घडले ते दुर्दैवीच, पण उघड्यावर कचरा टाकून जबाबदारी झटकणाऱ्यांना माफ करता येणार नाही. तरुण मुले पटकन निष्कर्षापर्यंत येतात आणि निर्णय घेतात. तसाच विचार या तरुणाने केला असण्याची शक्यता आहे. जे घडले त्याला आता पर्याय नाही. पण त्याच्या मृत्यूचे खापर पोलिसांवर फोडणे, हे कितपत योग्य आहे? नेहमी पोलीसच टार्गेटवर असायला हवेत, असे निश्चितच नाही. व्हिडिओमुळे बदनामी झाली म्हणून तणावातून तरुण आत्महत्या करतो, पण त्याच्याविरुद्ध तक्रार येते आणि ती नोंदवली जाते म्हणून पोलिसांना लक्ष्य करणे चुकीचे आहे. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. त्यांनी कायद्याबाहेर काही कृत्य केले असेल, तर त्यांचीही सुटका नाही. पोलिसांनी त्याला मारहाण केली किंवा 'थर्ड डिग्री' वापरली, अशा प्रकारचे आरोप करण्यापूर्वी त्या तरुणासोबत त्याच्या कुटुंबाचे सदस्य पोलीस स्थानकात आले होते, हेही लक्षात घ्यायला हवे. कचऱ्यासारख्या विषयावरून पोलीस त्याला उलटा लटकवून मारहाण करू शकतात, असा विचार करणे हेच मुळात मूर्खपणाचे आहे. 'थर्ड डिग्री' सोडाच पण त्या तरुणाला पोलिसांनी एक थप्पडही लगावली असेल, तर त्या पोलिसावर कारवाई व्हायला हवी. तो तरुण काही गुन्हेगार नव्हता. या प्रकरणाची सखोल चौकशी सरकारने करायला हवी. पोलिसांनी त्या तरुणाला मारहाण केली नाही, हे पोलिसांना सिद्ध करावेच लागेल. पण एका घटनेला फाटे फोडून जे समाजात चुकीचे घडते त्याचे समर्थन कोणी करू नये. लोकांना कचरा उघड्यावर फेकण्याची वेळ येते, याला प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे.