सगळ्या गोंधळात काँग्रेस जो देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे त्या पक्षात नेमके काय चाललेय याचा जरासा अंदाज घेतला, तर एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे आजही काँग्रेस आत्ममग्न आहे.

कवी ग्रेस यांची 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे' नावाची एक उत्कृष्ट साहित्यकृती आहे. यात संध्याकाळच्या अतिरम्य अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाचे अचूक निरीक्षण केले आहे. हा ललित लेखसंग्रह कवी ग्रेस यांच्या सौंदर्यशास्त्राच्या अत्युच्च जाणिवांची प्रचिती देतो. पण याचा इथे संबंध जोडण्याचे कारण थोडेसे विशेष आहे. आपल्या वैभवशाली, गौरवशाली व शक्तिशाली अशा भूतकाळात रममाण झालेल्या काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, हे ते कारण आहे. देशातील एकूण विरोधी पक्षांची परिस्थिती, ज्यात राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष आले, राजकीय विचारसरणी, राजकीय मुद्दे, पक्षांची संघटनात्मक बांधणी, राजकीय रणनीती या सर्वांचा विचार केला असता असे दिसून येते की, काँग्रेस आणि काँग्रेसमधून यथावकाश निर्माण झालेले प्रादेशिक पक्ष यांच्यात इंडिया आघाडी म्हणून संवाद, समन्वय आणि एकवाक्यता नसल्याची प्रचिती काँग्रेस आणि आघाडीतील घटक पक्ष वारंवार देतात. काँग्रेसने विश्वासघात केल्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवून निवडून आलेल्या विजय सरदेसाई यांनी २०१७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थापन केलेला गोवा फॉरवर्ड, अल्पसंख्याक आणि बहुजन समाज तसेच अनिवासी गोमंतकीयांचा पाठिंबा असलेला आरजी, मूळचा दिल्लीतील पण वेळ्ळी आणि बाणावली हे काँग्रेसचे सासष्टी तालुक्यातील दोन बालेकिल्ले काबीज केलेला आप यांना खिजगणतीत न घेता 'एकला चलो रे' अशी अव्यवहार्य भूमिका काँग्रेस घेऊ शकते, याला कारणे तशी अनेक आहेत. आपण एक राष्ट्रीय पक्ष असल्याचा अहंकार काँग्रेस नेहमीच दाखवत आली आहे. आपण कितीही हरलो तरीही आपण राष्ट्रीय पक्ष आहोत, हा काँग्रेसचा नेहमी दावा असतो.
पक्षांतर्गत हेवेदावे व जातीय गटबाजी, थोड्याशा यशाने हुरळून जाणे, वास्तवाचे भान नसणे, जनमानसाशी नाळ जुळलेली नसणे, संघटनात्मक पातळीवर संरचना गावपातळीपर्यंत तयार नसणे व नेतृत्वाचा संपूर्ण पक्षावर वचक नसणे या सर्व रोगांनी जर्जर झालेला हा पक्ष राज्याच्या राजकारणाला खरोखरच दिशा देऊ शकेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. केरळमध्ये पूर्ण सत्ता, तमिळनाडूमध्ये सत्तेत सहभाग, या दोन नगण्य मानाव्यात अशा अतिसामान्य घटनांनी हुरळून जाऊन काँग्रेसने राज्यात जी विजयी मिरवणूक काढली, ते पाहता पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांतील तसेच पुदुच्चेरी या संघप्रदेशातील मिळालेल्या घवघवीत यशानंतरही भाजपची विजयोत्तर वागणूक ही त्यांच्यातील राजकीय पोक्तपणा दाखवते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ २४० जागांवर अडला, तर काँग्रेसने लोकसभेत दहा वर्षांनी कशीबशी शंभरी गाठली. काँग्रेस व इंडिया आघाडीने या अपयशाचे आत्मचिंतन करण्याची वेळ होती पण, तसे काही न करता आपण भाजपला 'अब की बार चारसौ पार'पासून रोखले यातच विरोधी पक्षांचा वेळ, शक्ती आणि विचार खर्च झाले. पण या अपयशातून योग्य तो धडा घेत भाजपने महाराष्ट्राची विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या सर्व राज्यांच्या निवडणुकांमध्ये सरस व सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. प्रादेशिक पक्ष अधिकाधिक अवास्तव महत्त्वाकांक्षी होत गेले, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप व तृणमूल काँग्रेस हे आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश कॉंग्रेससहित इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या डोक्यात गेले आणि याची परिणती त्या त्या पक्षांची राज्यातील सत्ता जाण्यात झाली. आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांचे पक्षात इतके स्तोम माजले की, आप दिल्लीतील सत्ता गमावून बसला आणि ममता बॅनर्जी यांचे पक्षाच्या नेत्यांसाठी अनुपलब्ध असणे, भाचे अभिषेक बॅनर्जी यांची पक्षांतर्गत निरंकुश एकाधिकारशाही आणि अल्पसंख्याकांचे अमर्यादित लांगुलचालन, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राज्यभर चाललेली गुंडगिरी, हे असे मुद्दे आयते कोलित म्हणून भाजपच्या हाती लागले.
या सगळ्या गोंधळात काँग्रेस जो देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे त्या पक्षात नेमके काय चाललेय याचा जरासा अंदाज घेतला, तर एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे आजही काँग्रेस आत्ममग्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एकदा कॉंग्रेसची तुलना उत्तर भारतातील हवेल्या व राजवाड्यातील जमीनदार आणि नवाबांशी केली होती. त्यात ते म्हणतात की, 'कॉंग्रेसची अवस्था ही या लोकांसारखी झाली आहे. या सरंजामशहांसारखीच कॉंग्रेस आपल्याच ऐतिहासिक भूतकाळात जाऊन बसली आहे. वर्तमानकाळात या गतवैभवाला कोणीही हिंग लावून विचारत नाही. जुने वैभव आठवत आपल्याच तोऱ्यात राहणाऱ्या माणसांना, संस्थांना व राजकीय संघटनांना जनमानसात कोणतेही स्थान नसते हे मतदारांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे.' कॉंग्रेसला आजही स्वीकारार्हता आहे हे इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या मतांची संख्या आणि टक्केवारी तपासल्यास दिसून येते.
गोव्यात कॉंग्रेसमध्ये अचानक व अनाकलनीय असा नेतृत्वबदल झाल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्षांची देहबोली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या एकांगी विचाराची आणि वाटचालीची आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. गोव्यात समविचारी राजकीय पक्षांची निवडणूकपूर्व युती व्हावी यासाठी गोवा फॉरवर्ड, आरजीपी, आप हे पक्ष आग्रही आहेत असे संकेत गेल्या सहामाहीत वरील सर्व पक्षांनी दिले आहेत. पण कॉंग्रेस सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याकारणाने हे पक्ष 'अगतिक मित्रा'प्रमाणे हतबल असल्याचे दिसून येते. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी कॉंग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची पदच्युती होताच कॉंग्रेसच्या एकूण भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली, हाही एक दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. पाटकर, सरदेसाई, प्रभव नाईक, स्व. केतन भाटीकर, उत्पल पर्रीकर असा एक गट तयार होत असल्याच्या चर्चेची किनारही याबाबतीत होती.
वर्तमान परिस्थितीत एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेण्याची आपली वैचारिक पात्रता आणि राजकीय अवस्था नाही, हे कॉंग्रेसने वेळोवेळी सिद्ध केले आहे यात संशय नाही. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांचे एकीकरण हे कोणत्याही सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणणारे ठरते, पण त्याऐवजी सत्ताधाऱ्यांना साहाय्यभूत ठरणारी ताठर भूमिका घेऊन वावरायचे असे ठरविल्यास लोकशाहीत विरोधी पक्षांचे महत्त्व गौण होईल, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसकडे असलेला एकतर्फी ओढा हा किती अमर्यादित, अव्याहत, अवास्तव आणि आंधळा आहे हे कॉंग्रेसने गेल्या पंधरा वर्षांत सिद्ध केले आहे. गोव्यातील सामाजिक कार्यकर्ता हा बहुतांश, डाव्या विचारांचा आणि समाजवादी असल्याकारणाने या स्वाभाविक आकर्षणाला तसेच पूरक प्रमाणात वैचारिक अधिष्ठान आहे, हे सिद्ध होते. तरीही आत्ममग्न कॉंग्रेसची लक्षणे ही समविचारी पक्षांकडे दोस्ती न करता कुस्ती करणारी आहेत, हे खरे. ज्या दिवशी या भाग्यवंत 'सुशेगाद' पक्षाला जाग येईल तोपर्यंत उशीर झालेला असेल.
- प्रा. विघ्नेश शिरगुरकर
(लेखक कथालेखक, अनुवादक
आणि कवी आहेत.)