शेळ मेळावलीची गांजेश्वरी

सत्तरीतील मेळावली गावातील सातेरी देवीच्या पंचायतनात गांजेश्वरीचा समावेश होत असल्याने, तिच्या मुलभूत स्वरूपाशी निगडित मूर्तीविज्ञान आणि पारंपरिक लोकधर्म यांचा समाजशास्त्रीय आणि पुरातत्वीय अभ्यास इथल्या नौकास्थित दैवतांच्या इतिहासाचा उहापोह करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल

Story: विचारचक्र | गोवन वार्ता |
9 hours ago
शेळ मेळावलीची गांजेश्वरी

पूर्वीच्या काळी गोवा कदंब राजे शिवचित्त पेरमाडीदेव यांची पट्टराणी कमलादेवी ज्या पारंपरिक मार्गाने हळशी ते गोवापुरी ये-जा करायची, त्यालाच 'राणीची पाज' ही संज्ञा वापरण्यात आलेली आहे. म्हादई नदी काठावरचे पूर्वाश्रमीचे गांजे बंदर आज गेल्या अर्धशतकाहून विस्मृतीत गेल्याने म्हादई नदीच्या उजव्या काठावरच्या गांजे आणि डाव्या काठावरच्या आंबेशी परिसरातील नानाविध व्यापार, उद्योगानिमित्त स्थायिक झालेली साखरदांडे, लंवदे आदी कुटुंबे अन्यत्र मार्गस्थ झाली. तिसवाडी, बार्देश आणि अन्य प्रांतातून मीठ, सुके मासे तर घाटावरच्या प्रदेशातून लाकडे, कडधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू यांची ने-आण केली जायची. कधी शिडाची गलबते उसगावच्या जलमार्गातून गांजेत यायची, तर कुडशेहून धामशेमार्गे तलंगी मोठ्या प्रमाणात लाकडे तोल सावरत आणायचे. 

शेळ-मेळावलीसह फोंड्यातील गांजे येथे एक आणि सत्तरीतील अन्य ठिकाणी अशा ज्या एकूण तेरा नौकास्थित देवीच्या मूर्ती आढळलेल्या आहेत. त्या मूर्तीतून देवीचे तारिणी स्वरूप की जलमार्गाची पोषणकर्तीचे तत्व अभिव्यक्त होते, हे निश्चित सांगणे कठीण आहे. आज धामशे, भुईपाल, भिरोंडा आणि गुळेली येथील नौकास्थित देवीच्या उल्लेखनीय मूळ पाषाणी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्याने, अनमोल असे पुरातत्वीय संचित विस्मृतीत गेलेले आहे. त्यामुळे शेळ-मेळावली, नागवे आणि सावर्डे येथील नौकास्थित देवीच्या मूळ स्वरूपातील मूर्तींचे संरक्षण होणे भारतीय मूर्तीविज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

धडा जाण्याच्या वाटेवर शेळ-मेळावलीच्या जुन्या मंदिरात ग्रामदेवी सातेरीची त्रिशूळ, ढाल आणि खड्ग अशी शस्त्रे तीन हातांनी आणि चौथा हात रेड्याच्या तोंडावर ठेवलेल्या स्थितीत मूर्ती आहे, तिच्याच शेजारी असलेल्या खोलीत चतुर्हस्त गांजेश्वरी उभ्या स्थितीत त्रिशूळ, ढाल आणि खड्गासहित दाखवलेली आहे.

शेळ-मेळावली गावातली गांजेश्वरी रिपुमर्दिनी, क्षात्रतेजी आणि संहारक स्वरूपात असून, तिला नौकेत उभ्या स्थितीत दाखवलेली आहे. एकंदर मूर्तीतली नौकेची कलाकृती, नौकेतील होडी वल्हवणारे पुरुष आणि देवीचे एकंदर स्वरूप यावरून या मूर्तीचे वेगळेपण प्रकर्षाने लक्षात येते. गांजेतील मंदिरात जी नौकास्थित चतुर्हस्त देवीची जुनी मूर्ती होती, ती चक्क नौकेवर आसनस्थ स्थितीत दाखवलेली असून, नौकेवर माशाचे चित्र कोरले होते. गांजे येथील शांतादुर्गा परिवारातील गांजेश्वरी आणि शेळ-मेळावलीतील सातेरी परिवारातील गांजेश्वरी यांच्यात पूर्वापार ऋणानुबंध अस्तित्वात असले पाहिजे आणि त्याचेच संचित दोन्ही गावांत आजतागायत पहायला मिळत आहे.

मुंबईतील उमरखाडीतील नौकेत विराजमान झालेली दुर्गादेवी तेथील लोकमानस देवीने आपणाला विविध संकटांतून तारून नेणारी म्हणून पुजलेले आहे. महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील विरार येथे डोंगरावर नौकारूढ जीवदानी माता जलमार्गातील अडथळे दूर करणारी देवी म्हणून पुजली जाते. गांजे आणि सत्तरीत एकूण ज्या देवीच्या नौकास्थित मूर्ती आढळलेल्या आहेत, त्यांच्या पूजन परंपरेमागे एकेकाळी लोकांना म्हादईच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेणाऱ्या नावाड्यांच्या समूहाची अधिष्ठात्री देवता होत्या की प्रचलित जलमार्गाला घाटमार्गाशी जोडून निर्विघ्न व्यापार उद्योगाला चालना देणाऱ्या माता आहेत, याविषयी निश्चित सांगण्यासाठी या पुरातत्वीय संचितांचा नव्याने संशोधन करण्याची नितांत गरज आहे.

सत्तरीतील म्हादई आणि रगाडो त्याचप्रमाणे तिच्या छोट्या मोठ्या ओहळांनी वेढलेल्या गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील मेळावली गावात मुख्य ग्रामदेवी सातेरीसमवेत वैशिष्ट्यपूर्ण अशी गांजेश्वरी देवीची मूर्ती पुजली जाते. ही मूर्ती गोव्यात आढळलेल्या मूर्तींपैकी महिषासुर मर्दिनीच्या आगळ्या वेगळ्या रूपाचे दर्शन घडवते. फोंडा तालुक्यातील उजगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील गांजेत शांतादुर्गेसमवेत गांजेश्वरीचा तेथील पंचायतनात समावेश होतो. परंतु असे असताना, त्या गावापासून काहीशा दूर असलेल्या सत्तरीतील मेळावली गावातील सातेरी देवीच्या पंचायतनात गांजेश्वरीचा समावेश होत असल्याने, तिच्या मुलभूत स्वरूपाशी निगडित मूर्तीविज्ञान आणि पारंपरिक लोकधर्म यांचा समाजशास्त्रीय आणि पुरातत्वीय अभ्यास इथल्या नौकास्थित दैवतांच्या इतिहासाचा उहापोह करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. 

गांजे आणि सत्तरीत एकूण ज्या देवीच्या नौकास्थित मूर्ती आढळलेल्या आहेत, त्यांच्या पूजन परंपरेमागे एकेकाळी लोकांना म्हादईच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेणाऱ्या नावाड्यांच्या समूहाची अधिष्ठात्री देवता होत्या की प्रचलित जलमार्गाला घाटमार्गाशी जोडून निर्विघ्न व्यापार उद्योगाला चालना देणाऱ्या माता आहेत याविषयी निश्चित सांगण्यासाठी या पुरातत्वीय संचितांचा नव्याने संशोधन करण्याची नितांत गरज आहे.


-राजेंद्र पां. केरकर : पर्यावरणतज्ज्ञ