मृतांमध्ये पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचाही समावेश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : समुद्रकिनारे, नद्या, तलाव, तसेच इतर जलस्रोतांमध्ये पोहण्यासाठी किंवा मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तींच्या बुडून मृत्यू होण्याच्या घटना राज्यात सातत्याने घडत आहेत. यंदाच्या जानेवारीपासून साडेपाच महिन्यांच्या कालावधीत गोव्यात तब्बल ५७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे.
शनिवारी कुळे येथील नदीत बुडून वास्को येथील चौघांना मृत्यू झाला. मृतांपैकी तिघे सख्खे भाऊ असल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. सरकारकडून वारंवार आवाहन करूनही अनेक तरुण आणि पर्यटक अनोळखी व धोकादायक ठिकाणी पोहण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे.जून महिन्यातच ८ मृत्यू
जून महिन्यात आतापर्यंत ८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यापूर्वी मे महिन्यात ५, तर एप्रिलमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी ते मार्च या कालावधीत ३३ जणांनी बुडून जीव गमावला.
जून महिन्यातील प्रमुख घटना :
१३ जून : वास्को येथील कुळे नदीत चौघांना मृत्यू.
११ जून : श्रीस्थळ येथे मासेमारीसाठी गेलेल्या सुशांत सुमेद यांचा बुडून मृत्यू.
१० जून : बिर्ला-झुवारीनगर येथे पोहताना अमृत परवार यांचा मृत्यू.
५ जून : मळा, पणजी येथे दुचाकीसह पाण्यात पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू.
१ जून : कांदोळी समुद्रकिनारी सोलापूरचे पर्यटक सतीश भोसले यांचा बुडून मृत्यू.
बालकांचाही बळी
२५ एप्रिल रोजी भाटपाल येथील वज्रे नदीत बुडून ऋत्विक नायक (११) आणि ध्रुव वडार (७) या मुलांचा मृत्यू झाला होता. त्याआधी केपे येथे डोशियस शॅरी आणि हरजितसिंग धून यांचाही पोहताना मृत्यू झाला होता. याशिवाय विहिरी, कालवे, बंधारे, खाड्या, समुद्र तसेच स्विमिंग पूलमध्येही बुडून मृत्यू झाल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. यंदा अवघ्या १० महिन्यांच्या बालकाचाही बादलीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
लोकांना सांगून सांगून थकलो : मुख्यमंत्री
राज्यात वाढत्या दुर्घटनांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, अनोळखी ठिकाणी किंवा पाण्याची खोली माहिती नसलेल्या जलस्रोतांमध्ये पोहण्यासाठी जाऊ नये, असे लोकांना वारंवार सांगितले आहे. सरकार किती ठिकाणी रक्षक तैनात करणार? प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः पावसाळ्यात अनोळखी ओढे, नद्या आणि इतर जलस्रोतांमध्ये उतरणे टाळावे.