ईडीने नोंदविलेल्या गुन्ह्यात राहणार तुरुंगातच

पणजी : गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणात संशयित शिवशंकर मयेकर याला अटक केली होती. त्याला बार्देश येथील प्रथमवर्ग न्यायालयाने ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश न्या. पूजा सरदेसाई यांनी दिला. मात्र, ईडी प्रकरणात मयेकर न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.
हणजूण कोमुनिदादच्या अॅटर्नी सॅबेस्तीयन डिसोझा यांनी हणजूण कोमुनिदादची जमीन बनावट दस्तावेजाद्वारे हडप केल्याची तक्रार प्रथम हणजूण पोलीस स्थानकात दिली होती. ही तक्रार म्हापसा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार, सर्वे क्रमांक ४९६/१ व ४९६/१-ए मधील २ लाख चौ.मी. जमिनीच्या १९५२ मधील हंगामी ताबा प्रमाणपत्र, सीमांकन कार्यवाही पत्र, आदेश पत्र आणि १९५८ च्या अंतिम ताबा प्रमाणपत्र बनावट करून त्यावर कोमुनिदादच्या अधिकार्यांची बनावट स्वाक्षरी आणि हस्तलिखिताची नक्कल केली. ही जमीन संशयितांनी आपल्या मालकीची असल्याचे भासवून सरकारी कार्यालयात नोंदवून हडप केली होती. याची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी संशयित यशवंत सावंत व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, अॅटर्नी सॅबेस्तीयन डिसोझा यांनी सर्व्हे क्र. ४३६/१ मधील जमीन हडप केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार, म्हापसा पोलिसांनी सुदेश पार्सेकर, शिवशंकर मयेकर, राजेश पार्सेकर व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला.
ईडीने गोव्यासह, नवी दिल्ली, चंडीगढ मिळून सहा ठिकाणी छापे टाकले. या संदर्भात ईडीने ‘थिंकींग आॅफ यू’ चे भागीदार उमर जाहूर शाह आणि नीरज शर्मा यांच्यासह पर्पल मार्टिन एंटरटेनमेंट प्रा. लि. चे राजेश कुमार यांच्यावर कारवाई केली. यात दीड लाख अमेरिकन डाॅलर्सची (१.२५ कोटी रुपये) क्रिप्टो करन्सी गोठवली. त्यानंतर ईडीने १ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवशंकर मयेकर याला अटक केली. त्यानंतर एसआयटीने २३ एप्रिल २०२६ रोजी संशयित मयेकर याला अटक केली. या प्रकरणी मयेकर यांनी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. अॅड. यज्ञेश कोठकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने शिवशंकर मयेकर याला ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.
दरम्यान, ईडी प्रकरणात संशयित मयेकर न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.
३.५ लाख चौ.मी. जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश
मनी लाँड्रिगचा संशय व्यक्त करून ईडीने ९ सप्टेंबर २०२५ रोजी हणजूण, आसगाव, हैदराबाद येथे मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. ईडीने यशवंत सावंत याच्यासह स्थानिक पंच आणि शिवशंकर मयेकर याच्या घरावर आणि कार्यालयावर कारवाई केली. यात हणजूण कोमुनिदादची १२०० कोटी रुपये किमतीची ३.५ लाख चौ.मी. जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला.