पावसाची मोठी तूट; पेरणीवर संकटाचे ढग गडद

सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस : उकाडा कायम; खरीप हंगाम, जलसाठ्यांवर परिणाम


28 mins ago
पावसाची मोठी तूट; पेरणीवर संकटाचे ढग गडद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : यंदा मान्सूनचे आगमन दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या वेळेत झाले असले तरी पावसाला जोर नसल्याने दिवसेंदिवस पावसाची तूट वाढत आहे. राज्यात आतापर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा सुमारे ५० टक्के कमी आहे. पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून खरीप पेरणीही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
१ जून ते १४ जून या कालावधीत राज्यात सरासरी ३२६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ १६२.३ मिमी (६.३८ इंच) पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के कमी आहे. १ जूननंतर राज्यात अद्याप एकाही दिवशी १ इंचापेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली नाही. १० जून रोजी सर्वाधिक २४.७ मिमी पाऊस पडला, जो एक इंचापेक्षाही कमी आहे.
दरवर्षी वाळपई आणि साखळी येथे सर्वाधिक पाऊस पडतो. यंदा वाळपईची आकडेवारी उपलब्ध नसली तरी गेल्या वर्षांच्या तुलनेत तेथील पावसाचे प्रमाण कमी असल्याचे मानले जात आहे. यंदा काणकोण आणि मुरगाव येथे तुलनेने अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. सध्या दररोज दुपारी किंवा रात्री एखादी सरी पडत असली तरी ती फार काळ टिकत नाही. त्यामुळे दिवसा तापमान वाढून उकाडाही वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
काणकोणमध्ये सर्वाधिक पाऊस
यंदा काणकोण येथे सर्वाधिक ३९२.२ मिमी (१५.४४ इंच) पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यानंतर मुरगाव येथे २२५.४ मिमी (८.८७ इंच), जुने गोवा येथे १७७.६ मिमी (६.९९ इंच), पेडणे येथे १६९.८ मिमी (६.६८ इंच) आणि धारबांदोडा येथे १५२ मिमी (५.९८ इंच) पावसाची नोंद झाली आहे. काणकोण, जुने गोवा आणि पेडणे या तीन भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
वाळपईची आकडेवारी उपलब्ध नाही
हवामान खात्याकडे पणजी आणि मुरगाव येथेच पावसाचे मोजमाप करणारी यंत्रणा आहे. पेडणे, म्हापसा, वाळपई, साखळी, जुने गोवा आणि इतर ठिकाणांवरील पावसाची आकडेवारी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत संकलित करून हवामान खात्याला पाठवली जाते. मात्र, वाळपईची माहिती पाठवण्यात न आल्याने त्या भागातील पावसाची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती गोवा हवामान खात्याचे प्रमुख नहुष कुलकर्णी यांनी दिली.